Aug20
Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Thursday, 20th August 2015
एरवी कधीही नजरेला न येणारे: डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकरशिक्षक: कुंभ मेळ्याच्या निमित्ताने आपल्यासारख्या प्रापंचिक लोकांना हे कळू शकते; की सहजासहजी आढळणाऱ्या आणि सुप्रसिद्ध अशा परंपरापासून दूर; एरवी कधीही नजरेला न येणारे; आणि गावा-शहरापासून दूर; एकांतात नामसाधना करणारे असे शेकडो साधू आहेत. पूर्वापार अखंडपणे चालत आलेली त्यांची नामजपाची चैतन्यधारा, त्यांची तपश्चर्या; आपल्याला सहजासहजी दिसत नाही. पण तीच संजीवनी आपला, आपल्या समाजाचा, आपल्या देशाचा आणि संपूर्ण विश्वाचा; संपूर्ण अधोगतीपासून आणि अध:पतनापासून बचाव करीत आहे! आपणा सर्वांना; संकटात राखत आहे, अडचणीत मदत करीत आहे आणि बिकट परिस्थितीत सावरत आहे!
संत-महात्म्यांचे लोककल्याणकारी अंतरंग आणि त्यांची तपश्चर्या हे चैतन्यसूर्याप्रमाणे असतात. ते चर्मचक्षूना दिसत नाहीत! पण नामस्मरण करीत राहिल्याने ग्रहणक्षमता वाढली की डोळ्यांना प्रत्यक्ष न दिसणाऱ्या त्यांच्या तपश्चर्येची; आपल्याला अंत:प्रचीती येऊ लागते.
आज अंतर्बाह्य व्यापणाऱ्या चैतन्याचा शोध आणि अनुभूती घेण्याची जणूकाही जागतिक चळवळ सुरु झाली आहे. वेगवेगळे देश आणि वेगवेगळ्या संस्था वेगवेगळ्या नावांखाली ह्या चळवळीत सहभागी झाल्या आहेत आणि होत आहेत. योग, रेकी, ध्यान, भक्ती, सेवा इत्यादी विविध मार्गांनी प्रत्येकाच्या अंतरंगात चैतन्यसूर्याचा उदय होतो आहे. चैतन्यप्रभात होते आहे.
विद्यार्थी: कुंभ मेळ्यासंदर्भात देखील जागतिक पातळीवर प्रचंड कुतुहूल आहे! लाखो परदेशी पाहुणे देखील कुंभ मेळ्यात येताना आढळतात. पण सर, नामस्मरणासंदर्भातील तुमचा जो अनुभव तुम्ही सांगितला, त्याबद्दल मला विचारायचे आहे.
शिक्षक: विचार. असे प्रश्न विचारलेच पाहिजेत!
विद्यार्थी: तुमच्या अंतरात्म्यातून नामस्मरण प्रगट झाले आणि तुम्ही मरता मरता वाचलात. कुणी ह्याला योगायोग म्हणेल तर कुणी स्वसंमोहन! काहीजण विचारू शकतील की; “असे अनुभव सर्वांना कशावरून येतील?”.
शिक्षक: खरे आहे! नामस्मरण करणारे सर्वच जण माझ्याप्रमाणे वाचतात असे नव्हे; आणि नामस्मरण करणाऱ्यांचे अपघात होत नाहीत असे नव्हे. पण त्याचबरोबर हे देखील कळते; की नामस्मरण हे एका विशिष्ट हेतूने (उदा. जीव वाचावा म्हणून किंवा अन्य प्रापंचिक स्वार्थासाठी) केल्यामुळे तो हेतू साध्य होतोच असे नाही हे जसे खरे तसेच नामस्मरण हे मूलतः नामाशी म्हणजेच अंतरात्म्याशी म्हणजेच आपल्या गुरूशी तादात्म्य होण्यासाठीच करायचे असते!