Aug22
Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Saturday, 22nd August 2015
मधाचे बोट: डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकरविद्यार्थी: लहान मुलाने औषध घ्यावे म्हणून ज्याप्रमाणे मधाचे बोट लावतात तसेच नामस्मरणामध्ये गोडी निर्माण व्हावी म्हणून; कुंभ मेळ्यासारखे मेळे, तीर्थयात्रा, वाऱ्या, उत्सव, सण, व्रते, महापूजा, नैवेद्य, महाप्रसाद, भोग, भजने, आरत्या; इत्यादींची योजना केली गेली आहे का?
शिक्षक: निश्चित! “देव”, “परमात्मा”, “ब्रह्म”, परमेश्वर; “राम”, “कृष्ण”, “शिव”, इत्यादी वेगवेगळ्या शब्दांचा किंवा नावांचा गर्भितार्थ एकच आहे आणि तो म्हणजे नामाच्या द्वारे जी वस्तू ओळखली जाते ती अनादी आणि अनंत वस्तू. ह्या अर्थाने “नाम” हे अनादी आणि अनंत आहे. ते सर्वव्यापी आहे. सर्वांच्या अंतर्यामी आणि सर्वांच्या बाहेर आहे. त्याची सत्ता बलवत्तर आहे असे संत म्हणतात.
परंतु; धर्म हा सर्वांच्यासाठी असल्यामुळे; आणि आपण सर्वसामान्य लोक; विषय सुखात रमत असल्यामुळे; अखंड नामस्मरण करणे प्रत्येकाला शक्य नाही. हे लक्षात घेऊनच धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ ठरवले गेले आणि स्वीकारले गेले. त्याअनुरोधानेच; कुंभ मेळ्यासारखे मेळे, तीर्थयात्रा, वाऱ्या, उत्सव, सण, व्रते, महापूजा, नैवेद्य, महाप्रसाद, भोग, भजने, आरत्या; इत्यादीं प्रत्येक मनोवेधक, रंजक, आकर्षक आणि भव्य दिव्य बाबीत नामस्मरण ठेवून; क्रमाक्रमाने जीवनातले सर्व रस उपभोगत अखेर; अंतीम सत्य अनुभवण्याची सोय केली गेली.
एक लक्षात ठेवणे जरूर आहे. अंतीमत: नामस्मरणात रमलेले साधू; पराकोटीचे निस्पृह असून वस्तुनिरपेक्ष आनंदच उपभोगत असतात. त्यांना कोणत्याही बडेजावाची आणि बाह्य उपचारांची गरज नसते. आंतरिक चैतन्याने ओतप्रोत भरल्याने आणि सर्व सामर्थ्य अंगी असल्याने; ते कोणाचेच मिंधे नसतात. त्यांना कसलीच गरज नसते! ह्या परमोच्च अवस्थेला “नामात गोडी येणे”, किंवा “नामात रमणे” म्हणतात!
विद्यार्थी: याचा अर्थ; सर्वात श्रेष्ठ आणि मुख्य जर काही असेल तर नामस्मरण आहे, नामाची गोडी लागणे आणि नामात रमणे आहे. पण हे विधान सर्वांना लागू पडते का? जरा समजावून सांगा ना!
शिक्षक: अर्थातच! वीजपुरवठा खंडित झाला की ज्याप्रमाणे सर्वच बल्ब प्रकाशहीन आणि निरुपयोगी बनतात त्याप्रमाणे चैतन्यविस्मृतीमुळे; आपण सर्वच जण त्या चैतन्याला पारखे होतो आणि निस्तेज आणि दुबळे बनतो. विशेष म्हणजे; त्या चैतन्याची तहान आपल्या सर्वांना लागलेली असताना देखील; त्याच्या विस्मृतीमुळे आपण तृषाक्रांत राहून “रडत” असतो, किरकिरत असतो! चैतन्य प्रत्येकात आहे, त्याची तहान सर्वांना आहे आणि त्याच्या विस्मृतीची बाधाही सर्वांना आहे; म्हणूनच चैतन्यस्मरणाचा वा नामस्मरणाचा मार्ग आपल्या सर्वांसाठी आहे!