Aug22
Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Saturday, 22nd August 2015
चैतन्यप्रभातीची अस्सल प्रचीती: डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकरविद्यार्थी: कुंभ मेळा पवित्र होईल आणि निरुपद्रवी होईल आणि चैतन्यप्रभात होईल ही भाकिते भ्रामक वाटतात. कारण जगामध्ये मन प्रसन्न करणाऱ्या घटनांबरोबरच मन खिन्न करणाऱ्या असंख्य घटना देखील हरघडी आढळतात.
शिक्षक: खरे आहे. म्हणूनच; आपली फसवणूक टाळण्यासाठी आपल्या अंतर्यामी डोकावले पाहिजे. तसे केले असता चैतन्यप्रभातीच्या ह्या दृश्य आणि ढोबळ लक्षणांव्यतिरिक्त; आपल्याला; आपल्या स्वत:च्या अंतर्यामी; नामरुपी चैतन्यसूर्य उगवून तळपताना दिसतो! सूर्य ज्याप्रमाणे सूर्यमालेच्या केंद्रस्थानी असतो, कुठल्यातरी कोपऱ्यात नाही, त्याप्रमाणे नामसूर्य आपल्या अखिल जीवनाच्या केंद्रस्थानी असून आपले अंतर्बाह्य सर्व जीवन संचालित आणि प्रकाशित करतो आहे हे स्पष्ट दिसते. ह्या नामसूर्याच्या दर्शनातून चैतन्यप्रभातीची खरीखुरी आणि अस्सल प्रचीती येते.
कला, व्यवस्थापन, विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, शेती इत्यादी; जीवनाची सर्व ज्ञानक्षेत्रे अंतर्यामीच्या चैतन्यातून उगम आणि स्फुरण पावून चैतन्याद्वारेच नियंत्रित होत आहेत आणि विश्वहितकारी होत आहेत ह्याची हरघडी प्रचीती राहते.
जगभरातल्या महानुभावांना अभिप्रेत असलेला आणि गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णानी अधिकारवाणीने पुरस्कृत केलेला विश्वकल्याणकारी स्वधर्म; प्रगट होण्यासाठी आज प्रत्येकाच्या हृदयात उसळी घेत आहे! वेगळ्या शब्दात सांगायचं तर; वेगवेगळ्या कंपन्या, कारखाने, दवाखाने, दुकाने, प्रयोगशाळा, बालवाड्या, आश्रमशाळा, विद्यालये, महाविद्यालये, रुग्णालये, दवाखाने, सरकारी कार्यालये इत्यादी सर्वच ठिकाणी सत्प्रेरणा, सद्बुद्धी, सद्विचार, सदभिरुची, सद्भावना, सद्वासना, सत्संकल्प, सत्कर्म आणि सदाचार हे सर्व; वैयक्तिक आणि सामाजिक अशा सर्वच पातळ्यांवर व्यक्त होण्यासाठी सर्वांतर्यामातून उसळी घेत आहेत!
माझा एक मित्र सतत नामस्मरण करीत असतो. ह्या माझ्या मित्राचा अनुभव असा की तो एकदा घरासमोरच्या उद्यानात फिरत असताना त्याला स्पष्टपणे जाणवले की त्या बागेतल्या प्रत्येक झाडात आणि पानाफुलात नामस्मरण चालू आहे! हा अनुभव काही त्याचा एकट्याचाच नाही! मनाची किंवा जाणीवेची सूक्ष्मता आणि संवेदनाक्षमता आल्यानंतर अनेकांना हा अनुभव आल्याचे दाखले आहेत. या अनुभवाचा मथितार्थ असा की आपल्या वैयक्तिक इच्छे-अनिच्छेपलिकडे चैतन्ययोगाची ही साधना आणि आविष्कार सर्वान्तर्यामी चालू आहे! नाम हे चैतन्यदायी अमृत आहे, किंवा चैतन्यामृत आहे. आपले अंतर्बाह्य व्यापणाऱ्या चैतन्यामृतामुळे आपला स्वत:चा स्वत:शी असलेला आणि स्वत:चा इतरांबरोबर चालणारा संघर्ष संपुष्टात येत जातो. आपल्या आणि इतरांमधल्या आंतरिक एकात्मतेची गोडी अनुभवाला येते.