Aug22
Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Saturday, 22nd August 2015
विस्मयकारक प्रकार : डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकरविद्यार्थी: सर, कुंभ मेळ्यामध्ये जसे विस्मयकारक प्रकार बघायला मिळतात तसेच नामस्मरण करणाऱ्याला देखील अनुभवायला मिळतात का?
शिक्षक: होय, मिळतात! माझाच अनुभव सांगतो!
त्या दिवशी मी अतिशय अस्वस्थ होतो. अस्वस्थतेचे कारण समजत नव्हते. रात्री नऊ-साडेनऊचा सुमार असेल. नेहमीची औषधे घेऊन मी अंथरुणावर पडलो होतो. झोपायला अजून पुष्कळ वेळ होता.
हळू हळू माझी अस्वस्थता वाढू लागली. जीव घाबरा झाला. बघता बघता डोळ्यासमोर अंधारी येऊ लागली. तोंडाला कोरड पडू लागली. हात-पाय चाचपून पाहिले तर हात-पाय थंडगार पडताहेत असे जाणवले. क्षणात मी खोल खोल अंधाऱ्या गर्तेत जातो आहे असे वाटू लागले. दुसऱ्याच क्षणी माझे देहभान हरपू लागले आणि माझी जाणीव नष्ट होत चालली. आता मात्र जे घडत होते, ते माझ्या शक्तीच्या आणि नियंत्रणाच्या पलिकडे होते! शुद्धीत राहण्याची प्रतिक्षिप्त क्रिया; अक्षरशः जीवाच्या कराराने आणि मोठ्ठ्या कष्टाने माझ्याकडून घडत होती. अखेर सगळे लटके पडले आणि मी मृत्यूच्या त्या गर्तेत वेगाने बुडू लागलो. सर्व काही नष्ट होत असल्याची; सर्वस्व गमावण्याची ती भयंकर जाणीव हृदयाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडवणारी होती. मी केविलवाणा झालो. पार हरलो. त्या क्षणी; “आता सर्व संपले” असे वाटत असतानाच पुढच्या क्षणी कुठून आणि कसे माहीत नाही; पण अचानक रामनाम मनात आले.
त्या क्षणी प्रेरणा झाली, “उठून साखर खा!” मी कसाबसा उठलो आणि पलंगापाशी ठेवलेला साखरेचा डबा मोठ्ठ्या मुश्किलीने उघडून साखर घेऊन तोंडात भरली. तोंड कोरडे झाल्यामुळे मोठ्ठ्या कष्टाने चावून चावून आणि बाजूला ठेवलेले पाणी पिऊन कशीबशी मी ती घश्याखाली घातली! जेवढ्या वेगाने मी अंधाऱ्या गर्तेत बुडत होतो, तेवढ्याच वेगाने मी देहभानावर आलो!
प्रथम वाटला तसा तो हृदयविकाराचा तीव्र झटका नसून; तो रक्तातील साखर कमी होण्याचा जीवघेणा अनुभव होता!
त्यापूर्वी मी रामनामाबद्दल खूप वाचले होते व ऐकले होते. अनेकदा; प्रेतयात्रेमध्ये “राम नाम सत्य है” असे म्हणत चाललेले लोक पाहिले होते. तसेच अमुक एक मनुष्य मेला; हे सुचवण्यासाठी “उसका राम नाम सत हुआ” असे म्हटलेले देखील ऐकले होते.
पण मृत्यू म्हणजे काय; आणि राम नाम अजरामर असते, संजीवक असते आणि राम नामाची सत्ता सार्वभौम असते; याचा किंचितसा का असेना पण खरा अर्थ मला त्या दिवशी कळला!