Aug22
Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Saturday, 22nd August 2015
अवघें जगचि महासुखें l दुमदुमित भरलें ll ज्ञानेश्वरी,९.२००.: डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकर
विद्यार्थी: कुंभ मेळ्याच्या निमित्ताने आपल्या समाजात किती भिन्न भिन्न परंपरा आहेत याची जाणीव होते. जगभरामध्ये तर अशा किती तरी विभिन्न परंपरा असतील! इतक्या वैविध्यपूर्ण समाजघटकांना उचित न्याय मिळावा आणि सर्वांचे जीवन जास्तीत जास्त उन्नतीपर व्हावे; यासाठी सध्याचे कायदे आणि नियम समयोचित आणि पुरेसे आहेत का?
शिक्षक: जगभरात सध्या काही आंतर्राष्ट्रीय कायदे समान आहेत. पण वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळे कायदे देखील आहेत. भारतातल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये देखील अनेक वेगवेगळे कायदे आहेत. याशिवाय सरकारी खात्यांमध्ये आणि वेगवेगळया संस्थांमध्ये त्यांचे त्यांचे वेगवेगळे नियम असतात.
पूर्वग्रहदूषित बुद्धीने तयार केलेले आणि तर्कदुष्टपणे, गचाळपणे किंवा क्लिष्टपणे मांडणी केलेले कायदे व नियम मोडण्याचे प्रयत्न आणि प्रकार वाढतात. हे भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळात घडले होते आणि आजही; घडते आहे. आज वेगवेगळ्या देशांदरम्यान आंतर्राष्ट्रीय कायदे व नियम; याबाबतीत मतभेद आणि संघर्ष होत आहेत आणि आंतरराष्ट्रीय कायदे व नियम मोडण्याची प्रवृत्तीही प्रबळ होते आहे.
असे होऊ नये यासाठी; आंतरराष्ट्रीय कायदे व नियम सर्वकल्याणकारी होणे अत्यावश्यक आहे. ते तसे व्हावेत; यासाठी केवळ तीव्र बुद्धी असून उपयुक्त ठरत नाही. कारण ती कुटिल असली तर उलट अन्यायकारक आणि विनाशकारी ठरते.
कोणतेही कायदे बनवताना; सर्वप्रथम; पूर्णपणे निस्पृह, पूर्वग्रहविरहित आणि विश्वकल्याणकारी दृष्टी असणे अत्यावश्यक आहे. त्यानंतर, ह्या दृष्टीला अचूकपणे प्रकट करण्यासाठी उत्तम भाषाज्ञान आणि तर्कसंगत बुद्धी असणे गरजेचे आहे. हे असेल तरच कायदे किंवा नियम अचूक बनतात. त्यांचा हेतू आणि मांडणी सर्वांचे कल्याण साधणारी असल्याने बव्हंशी प्रभावी ठरते. कायदे मोडण्याचे प्रयत्न आणि प्रकार कमी होतात. यामुळे समाजाची केवळ भौतिक प्रगती नव्हे तर सर्वंकष उन्नती होते. समाजाचे सर्व घटक समृद्ध आणि प्रगल्भ होऊ लागतात.
आज बुद्धी आहे. शब्द ज्ञान आहे. पण आंतर्राष्ट्रीय कायदे व नियम बनवणाऱ्या लोकांची दृष्टी आणि बुद्धी आजच्यापेक्षा कितीतरी शुद्ध, पूर्वग्रहविरहित आणि निस्वार्थी होण्याची मात्र तीव्र गरज आहे!
याचसाठी श्री. ज्ञानेश्वर महाराजांपासून ते कबीरापर्यंत; आणि संत श्री. नामदेवापासून ते सद्गुरु श्री गोंदवलेकर महाराजांपर्यंत; सर्वांनी नामस्मरणाचे महत्व पुन्हा पुन्हा उद्घोषित केले आहे! ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,
ऐसे माझेनि नामघोषें l नाहीं करिती विश्वाची दु:खें ll
अवघें जगचि महासुखें l दुमदुमित भरलें ll ज्ञानेश्वरी,९.२००.