Aug22
Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Saturday, 22nd August 2015
मायावी शत्रू: डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकरविद्यार्थी: कुंभ मेळ्यामध्ये देखील; अनेक मंदिरांमध्ये आणि पंढरीच्या वारीमध्ये चालते तसे राम नाम चालू असते. अनेक आखाड्यांमध्ये राम नामाची धून चालू असते. पण जपामध्ये घेतले जाणारे नाम (म्हणजेच “राम” ही केवळ दोन अक्षरे); पापाचे पर्वत कसे काय जाळू शकते, हे काही केल्या समजत नाही आणि उमजत तर नाहीच नाही.
शिक्षक: नाम ही संकल्पना समजण्यामध्ये आरंभी-आरंभी माझा देखील गोंधळ होत असे. कारण नामाविषयी; “नाम अमृताहून गोड आहे”, किंवा “नामाने बेचाळीस पिढ्या उद्धरतात”, इत्यादी जे म्हटले जाते, ते सुरुवातीच्या काळात; आपल्यासाठी अनाकलनीयच असते. पण नाम म्हणजे केवळ अक्षरे नव्हेत!
विद्यार्थी: तुम्ही ज्याला नाम म्हणता ते नाम; आणि नामजपातील नाम यात फरक काय?
शिक्षक: “नाम” म्हणजे माझा अंतरात्मा, अंतीम सत्य, ब्रह्म, ईश्वर किंवा माझ्या गुरूंचे निजस्वरूप. ह्यालाच मी नाम म्हणतो. नामस्मरण म्हणजे ह्या नामाचे स्मरण. हे नाम सर्वसत्ताधीश आहे. ते “आहे आणि नाही” या संकल्पनांच्या पलिकडे आहे.
ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीचे नाव म्हणजे तो व्यक्ती नव्हे, तसे, जपातले नाम म्हणजे अंतीम सत्य नव्हे; तर; त्या सत्याचे नाव आहे. पण ही तुलना इथेच संपते. कारण, व्यक्तीचे नाव जन्मभर घेत राहिलो तरी; आपण कधीही ती व्यक्ती बनत नाही. कारण ती व्यक्ती आपला अंतरात्मा नसते. ती स्थूल असते. पण जपातील नामाचे वेगळे आहे. जपातील नाम हे अंतीम सत्याचे नाव आहे. ते आपल्या अंतरात्म्याचे नाव आहे! ते आपल्या गुरुचे नाव आहे. ते घेत गेल्याने; कालांतराने आपण; आपण राहत नाही. आणि ते नाव नाव राहत नाही. जपातले ते नाम; केवळ अक्षरे राहत नाही. आता ते जपातले नाम ईश्वरस्वरूप होते आणि आपण देखील नामस्वरूप म्हणजेच ईश्वरस्वरूप होतो!
विद्यार्थी: म्हणूनच एकीकडे नामस्मरण हे अत्यंत सोपे साधन आहे असे म्हणतात, पण प्रत्यक्षात ते आपल्या सबुरीची, चिकाटीची आणि निष्ठेची कसोटी पाहते!
शिक्षक: होय. इतर साधनांनी अनेक गोष्टी साधतात. पण अहंकार समूळ नष्ट होत नाही. तो आपल्याला हुलकावण्या देतच राहतो! पण नामस्मरणाची महानता अशी; की अहंकाराचा लवलेशही जरी राहिला आणि इतर कोणत्याही प्रकारे जरी तो लक्षात आला नाही आणि जाणवला नाही, तरी नामस्मरणाच्याद्वारे मात्र तो ठसठशीतपणे लक्षात येतो, एखाद्या काट्याप्रमाणे ठसठसु लागतो, स्वत:ला असह्य होतो आणि नामस्मरणाच्या प्रगतीबरोबरच; काटा निघून जावा तसा निघून जातो! आत्मज्ञानाच्या आणि जगाच्या कल्याणाच्या मार्गातील सर्वात मोठ्ठा, सर्वात भयंकर आणि सर्वात मायावी शत्रू नष्ट होतो!