World's first medical networking and resource portal

Articles
Category : All
Medical Articles
Sep19
शेतकऱ्यांच्या अडचणी : डॉ. श्रीनिवास जनार्द
शेतकऱ्यांच्या अडचणी : डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकर

विद्यार्थी: कुंभ मेळ्यामध्ये होम हवन इत्यादींसाठी किंवा अभिषेकासाठी जी वेगवेगळ्या द्रव्यांची नासाडी होते, ती समर्थनीय आहे का? हा पैसा गोरगरीबांच्या आणि शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी वापरावा असे काही लोकांना वाटते. ते चूक आहे का?

शिक्षक: होम, हवन, अभिषेक इत्यादींचा विचार करताना देखील केवळ पाश्चिमात्य किंवा जडवादी विचारांच्या पगड्यामुळे आपला बुद्धीभेद होतो. अशा विचारांमुळे आपण प्रत्येक गोष्टीकडे वरवरच्या नफानुकसानीच्या उथळ दृष्टीकोनातून पाहतो. पूर्वग्रह विरहित समतोल वृत्तीने आणि सखोल दृष्टीने पाहिले तर; ह्या बाबींचे योग्य मूल्यमापन करता येईल. ते तसे करूनच त्यांविषयीची धोरणे ठरवायला हवीत. होम, हवन, इतर उपासना मार्ग आणि विशेषत: नामस्मरण; ह्यांचा आपले आत्मसामर्थ्य वाढण्यासाठी, आंतरिक समाधानासाठी म्हणजेच उर्ध्वगामी उत्क्रांतीसाठी किती उपयोग होतो हे नीट अभ्यासले पाहिजे. तरच शेतकरी आणि इतर गोरगरीबच नव्हेत तर आपल्या सर्वांनाच आंतरिक चैतन्य आणि बाह्य परिस्थिती; दोन्हींमध्ये प्रगती साधणे शक्य होईल, जे अत्यंत आवश्यक आहे. सरकार आणि आपण सर्वांनी; ह्याच दृष्टीने काम करायला हवे.

होम, हवन, अभिषेक इत्यादी बाबींचा मी सखोल अभ्यास केलेला नाही आणि तसा तो न करता, आपल्या पूर्वजांना मूर्ख, निर्दय वा दुष्ट समजून त्यांची आणि ह्या सर्व पूजा विधींची निंदा, निर्भत्सना व निषेध करणे मला योग्य वाटत नाही. पण त्याचबरोबर; त्यांचे सरसकट समर्थन करणेही योग्य वाटत नाही. ह्या सर्व बाबींचा योग्य तो निवाडा होण्यासाठी नामस्मरण सार्वत्रिक व्हावे असे मला वाटते. तसे झाले तर आपल्यातील अनेकांच्या द्वारे; अनेक गूढ आणि रहस्यमय बाबींचा खुलासा होऊ शकेल असे मला वाटते.

विद्यार्थी: जीवनाच्या विविध अंगांकडे नि:पक्षपाती, सकारात्मक आणि विधायक दृष्टीने पाहण्यासाठी नामस्मरण अत्यंत महत्वाचे आहे हे मला पटते. पण ते वरपांगी भासते तेवढे सोपे नाही; खरे ना?.

शिक्षक: होय. एका दृष्टीने नामस्मरण हे अगदी सोपे आहे. पण त्याबद्दल गोडी आणि निष्ठा उत्पन्न होण्याच्या दृष्टीने पाहता, ते अत्यंत कठीण आहे. कारण, त्याला चव, रंग, सुवास, मुलायम स्पर्श, सुरेल कर्णमधुरता; काहीच नाही. ते असे सोपे आणि उपाधीशून्य असल्यामुळे त्याबद्दल आवड आणि आस्था तयार होणे कठीण असते. एवढेच नव्हे तर नामस्मरणाने आपला अहंकार देखील फुलत नाही! त्यामुळेच नामस्मरण करताना कंटाळा येतो, खूप शंका येतात आणि खूप विकल्प येतात, जे कितीही चर्चा केली तरी नाहीसे होत नाहीत; तर नामस्मरण केल्यानेच नाहीसे होतात.


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (1944)  |  User Rating
Rate It


Browse Archive