Sep19
Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Saturday, 19th September 2015
शाकाहार आणि मांसाहार: डॉ. श्रीनिवास कशाळीकरप्रत्येक प्राणी त्याचा त्याचा आहार ग्रहण करीत असतो. पण मनुष्य मात्र ह्या व अशा अनेक बाबींमध्ये संभ्रमात असतो. शाकाहार करणारे आणि मांसाहार करणारे ह्यांच्यात धुमश्चक्री उडताना देखील दिसते.
व्यक्ती तितक्या प्रकृती हे जसे खरे आहे; तसेच प्रकृती तितक्या चमत्कृती आणि विकृती हे देखील खरे आहे. म्हणूनच काहीजण कीडे खातात. काही जण उंदीर खातात. काही जण सांप, बेडूक इत्यादी खातात. कोण काय खातो किंवा खाऊ इच्छितो हे त्याच्या शरीरक्रिया शास्त्रीय वैशिष्ट्यांनुसार, सांस्कृतिक वारशानुसार आणि भौगोलिक उपलब्धतेनुसार ठरत असते. आर्थिक आणि शारीरिक लाभ किंवा हानी वगैरे इतर घटकांचा परिणाम देखील होत असू शकेल.
आहार ठरवणे हा ज्याचा त्याचा प्रश्न, अधिकार वा हक्क आहे असे आपण म्हटले तरी तो मर्यादेचा, मजबूरीचा वा असहाय्यतेचा भाग देखील असू शकतो.
पण ह्या सर्वांमध्ये नामस्मरणाचे महत्व काय? नामस्मरणाने काय साध्य होईल?
अनेक लोकांचा अनुभव असा आहे की; नामस्मरणाने हळू हळू त्यांच्यामधली प्राणी मारण्याची तलफ किंवा खुमखुमी कमी कमी होत जाते. तसेच प्राणी मारण्याचा कठोरपणा कमी होतो. एवढेच नव्हे तर मेलेले वा दुसऱ्या कुणीतरी मारलेले प्राणी (म्हणजेच मासे, अंडी, कोंबड्या, बकऱ्या, शेळ्या, बैल इत्यादिंची प्रेते) बाजारातून आणून शिजवून खाण्याचा किळस येतो. मेलेल्या प्राण्यांची आंतडी, मूत्रपिंड, यकृत, स्नायू, इत्यादी भाजून शिजवून वा तळून बनवलेले पदार्थ विकत सोडाच; पण फुकट मिळाले तरी खायच्या विचाराने देखील उबग येतो. मांसाहारी स्वयंपाक करताना येणाऱ्या वासाने नामस्मरण करणाऱ्याला मळमळू लागते. अर्थात अनेकांना नामस्मरण न करता देखील मानासाहाराची किळस येत असू शकेल आणि उलटपक्षी काही नामस्मरण करणारे मांसाहार एन्जोय करीत असतील
नामस्मरण करावे की करू नये हा देखील ज्याचा त्याचा प्रश्न, अधिकार वा हक्क आहे असे आपण म्हटले तरी तो देखील मर्यादेचा, मजबूरीचा वा असहाय्यतेचा भाग असू शकतो. फक्त अशी मर्यादा, अशी मजबूरी आणि अशी असहाय्यता ही नामस्मरण करणाऱ्याला; ईश्वराची वा गुरुची कृपा आणि आयुष्याची कृतार्थता व सार्थकता वाटते!