Sep21
Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Monday, 21st September 2015
नामस्मरण आणि आपले कल्याण: डॉ. श्रीनिवास कशाळीकरविद्यार्थी: काहीजण असे म्हणतात की कुंभ मेळ्यातील साधुंनी फक्त अध्यात्माबद्दल बोलावे. त्यांनी राजकारणाबदल बोलू नये. तुम्हाला काय वाटते?
शिक्षक: अध्यात्म ह्यांचा अर्थ स्वभाव. भगवद्गीतेच्या आठव्या अध्यातात स्पष्टपणे ही व्याख्या दिलेली आहे. अध्यात्म हा इतिहास, भूगोल यासारखा विषय एक विषय नाही. अध्यात्म हा संपूर्ण अस्तित्वाचा मूळ स्वभाव आहे.
अध्यात्मिक होणे म्हणजे तो मूळ स्वभाव जाणणे, स्मरणे आणि तद्रूप होणे आहे. खरे पाहता; गर्भावस्थेत आल्यापासून आपल्या शरीरात आणि आपल्या मनात जे जे म्हणून काही घडते ते ते सारे; खरे पाहता आपल्यामधील चैतन्यतृष्णेपायी, चैतन्यामृतपानासाठी आणि चैतन्यमय होण्यासाठी घडत असते! म्हणजे आपण सर्वच जण मूलत: अध्यात्मिकच असतो.
पण एकीकडे आपल्याला कशाची तृष्णा आहे हे आपल्याला कळत नाही आणि दुसरीकडे; आपला मूळ स्वभाव, आपल्या अंतर्बाह्य बरसणारे चैतन्य आपल्याला ओळखता येत नाही. हे चैतन्य अदृश्य असते. ते आपल्याला दिसत नाही. ते अश्राव्य असते. त्याची चाहूल लागत नाही. थोडक्यात; ते इंद्रियातीत असते. कर्मेंद्रियांच्या आणि ज्ञानेंद्रियांच्या पलीकडे; म्हणजेच जाणीवेच्या पलीकडे असते. बुद्धीच्या आवाक्याच्या पलीकडे असते. ह्यातच भर म्हणून की काय; ह्या चैतन्याची विस्मृती झाल्यामुळे ते समीप असूनही दूरच राहते!
पण असे असले तरी त्या चैतन्याची जननी आपल्यावर पांखर घालण्याचे आपले काम करीतच असते. ती आपली पाठ सोडीत नाही! त्यामुळे चैतन्याचा “चुंबकीय” प्रभाव आपल्यावर पडतच असतो. त्याची अनाकलनीय अशी ओढ आपल्याला स्वस्थ बसू देत नाही. ही कोणती ओढ आहे हे आपल्याला कळत नाही. त्यामुळे गीतेच्या सातव्या अध्यायात तिसऱ्या श्लोकात म्हटल्याप्रमाणे हजारो लोकांमध्ये एखादाच अध्यात्माच्या शोधात धडपडतो. आणि अशा हजारो धडपडणाऱ्या लोकांमध्ये एखादाच खरा खुरा अध्यात्मिक होतो. पण बाकीचे धडपडणारे धडपडत असतात. त्या धडपडणाऱ्यांचे बाह्य रूप सामान्यांपेक्षा वेगळे असते. ह्या खास वेगळ्या बाह्य स्वरूपामुळे बऱ्याच जणांना असे वाटते की अध्यात्म हा आपल्या रोजच्या जीवनापासून वेगळा असा प्रांत आहे, वेगळे प्रावीण्य आहे. ह्या बाह्य अंगाने साधु असणाऱ्या लोकांना जीवनाच्या सर्व अंगांबद्दल मतप्रदर्शन करण्याची कुवत नसतेच.
परंतु, परिपूर्ण अध्यात्मिक व्यक्तीला जीवनाच्या सर्व अंगांबद्दल मतप्रदर्शन, मार्गदर्शन आणि नेतृत्व करण्याचा निश्चित अधिकार आहे. स्थितप्रज्ञ व्यक्तींच्या प्रत्यक्ष नेतृत्वाखाली जगाचे कल्याण होईल यात तीळमात्र शंका नाही