World's first medical networking and resource portal

Articles
Category : All
Medical Articles
Sep21
गुरुची अद्भुत शक्ती!: डॉ. श्रीनिवास जनार्दन &
गुरुची अद्भुत शक्ती!: डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकर

विद्यार्थी: कुंभ मेळ्यामध्ये आपल्याला अचंबित करणाऱ्या, थक्क करणाऱ्या गोष्टी दिसतात आणि आपले मन अद्भुत रसाने भरले जाते. आपली मंदिरे आणि तीर्थक्षेत्रे देखील विस्मयकारक असतात! महान विभूतींचे जीवन देखील अद्भुत असते! ह्यातले बरेच काही; आपल्या तर्कशास्त्रामध्ये किंवा आपल्या मूल्यव्यवस्थेमध्ये बसत नाही. तरीपण; प्राचीन रूढी, परंपरा, मन्दिरे आणि तीर्थक्षेत्रे; ह्यांच्याबद्दल आपल्याला आपल्या मनांत विलक्षण आकर्षण, कुतुहूल आणि आस्था असल्यामुळेच टिकून आहेत का?

शिक्षक: होय. ह्या सर्व बाबी आस्थेमुळेच टिकून राहिल्या आहेत आणि त्या नामस्मरणाला पोषक होण्यासाठीच आहेत यात शंका नाही.

रूढी आणि परंपरांप्रमाणेच खुद्द नामस्मरणाचे देखील आहे. नामस्मरण करता करता आपल्याला एकदम अमृतत्वाचा साक्षात्कार झाला असे होत नाही. आपल्याला टप्प्या-टप्प्यानेच पुढे जाता येते आणि ह्या टप्प्यांवर घडणाऱ्या अनेक चित्रविचित्र, चमत्कारिक, हृदयस्पर्शी आणि भारावून टाकणाऱ्या मनोवेधक घटनांमुळेच; आपले नामस्मरण टिकून राहते. कारण ह्या बाबी; नामस्मरणाची गोडी वाढवतात आणि आपल्याला नामस्मरणात गुंतवून ठेवतात!

विद्यार्थी: नामस्मरणाद्वारे अंतीम सत्याचा आणि अमरत्वाचा अनुभव लगेच येत नाही आणि तो कुणाला आणि केव्हा येईल, हे सांगता देखील येत नाही. त्याचप्रमाणे नामस्मरणाने समृद्धी देखील येतेच असेही नाही. त्यामुळे नामस्मरण करताना सामान्यांच्या विशेषत: गोरगरीबांच्या चिकाटीची कसोटी लागते, आणि त्याचा धीर सुटू शकतो ना?

शिक्षक: होय. खरे आहे. पण गोर गरीबच नव्हे तर आपण सारे; पुन्हा पुन्हा चैतन्याच्या विस्मृतीत जातो आणि त्यामुळे; विषयांकडे आकर्षित होत राहतो, त्यांच्या भूलभूलैय्यात अडकत राहतो, हरवत राहतो आणि चैतन्याला पारखे होतो. इंद्रियगम्य स्थूल विषय आणि दृश्य विश्वाच्या आकर्षणाचा जोर इतका जबरदस्त असतो की आपली धाव आपोआप चैतन्याच्या विरुद्ध दिशेला वळते! साहजिकच आपण भलतीकडेच भरकटत जातो! परिणामी; आपली अस्वस्थता काही केल्या कमी होत नाही आणि पूर्णत्व, सार्थकता आणि समाधान आपल्यापासून दूरच राहतात!

पण; काळजी करण्याचे कारण नाही. आपल्या इच्छे-अनिच्छेपलिकडे; विश्वचैतन्याची जननी आपल्याला चैतन्यामृतपान करवीत आहे. आपल्यामध्ये नवचेतना भरत आहे. आपल्याकडून नामस्मरण आणि स्वधर्मपालन करवीत आहे. सदिच्छा, सत्संकल्प, सत्प्रेरणा, सत्बुद्धी, सद्भावना, सद्वासना, सदाचार यांनी आपले व्यक्तिगत आणि सामाजिक जीवन भरून टाकीत आहे. ह्यावर विश्वास ठेवू नये; तर; नामस्मरण करता करता स्वत: त्याचा अनुभव घ्यावा!


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (7893)  |  User Rating
Rate It


Browse Archive