Nov24
Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Tuesday, 24th November 2015
आनंदाचे वारस: डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकरतमोगुण आणि रजोगुण वाढल्यामुळे वेड, वासना, आवडी, छंद, लहरी, फॅशन्स, व्यसने, विकृती; अशा बाबींसाठी अब्जावधी रुपये खर्च होत आहेत. संकुचित स्वार्थापायी फसवणे आणि फसले जाणे; हे सार्वत्रिक झाले आहे.
जोपर्यंत नामस्मरण सर्वत्र पसरत नाही आणि झिरपत नाही, तोपर्यंत आत्मसाक्षात्कारी निस्पृह संत आणि समाधान सापडणे कठीण आहे.
ज्या अजरामर आंतरिक चैतन्याची हाक (Inner Voice) आपल्याला ऐकू येत नाही आणि ज्याच्यापासून तुटल्यामुळे आपण अचेतन आणि मरतुकडे बनलो आहोत, त्या अनादी, अनंत, सर्वव्यापी तसेच सर्वांच्या अंतर्यामी आणि बाहेर असलेल्या सच्चिदानंद “वस्तु”ला ओळखणे, समजणे, आठवणे आणि हळु हळु त्या “वस्तु”शी तद्रुप होणे; हा सर्व दुरवस्थेवरील इलाज आहे.
ह्या सच्चिदानंद वस्तूला ओळखण्याचे, समजण्याचे, आठवण्याचे आणि हळू हळू त्या वस्तुरूप होण्याचे अनादी साधन; ह्या वस्तूच्या नावाचे म्हणजेच नामाचे स्मरण म्हणजे नामस्मरण आहे. प्रत्येकाच्या हृदयात जो नामरूप गुरु असतोच, त्याच्याच कृपेने आपल्या सर्वांना; नामस्मरणाच्या द्वारे होणारा स्वधर्म सूर्याचा उदय आणि त्याचा कल्याणकारी प्रभाव यांचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही!