Jun17
Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Friday, 17th June 2016
सद्गुरू ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज म्हणतात: डॉ. श्रीनिवास कशाळीकरसद्गुरू ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज म्हणतात, "नाम खोल गेलें पाहिजे. जातांयेतां, उठतांबसतां, स्वैंपाकपाणी करतांना, सारखें नाम घ्यावें म्हणजे ते खोल जातें. एकदां तें खोल गेलें कीं आपलें काम झालें. मग आपण न घेतां तें चालतें. त्यांत मजा आहे!"
स्वत: सच्चिदानंदस्वरूप असलेल्या अजरामर महापुरुषाचे हे अगदी सोपे बोल आहेत! इतके सोपे की आपल्याला त्यांची किंमत सुरुवातीला कळणे कठीण जाते! खरे तर कोणत्याही प्रकारच्या सबबीला जागाच नाही! पण आपण इतके जड असतो की आपल्याला अवजड शब्दांचे वेड असते! अवडंबर माजविण्याची सवय असते! आपल्याला हा सोपेपणा रुचत नाही आणि पचत नाही! बडेजाव आणि भपका यांना सोकावलेले आपले मन साध्या सरळ नामस्मरणात रमत नाही!
परंतु; विश्वकल्याणाचा आणि शाश्वत समाधानाचा अत्यंत खात्रीचा, अगदी सोपा आणि सर्वांना सहजशक्य (खऱ्या अर्थाने लोकशाही) असा अनुभवसिद्ध उपदेश इतक्या सोप्प्या भाषेत असू शकतो, हे यथावकाश जसे जसे नामस्मरण वर्षानुवर्षे गुरुकृपेने घडत जाते तसे तसे ध्यानात येऊ लागते! आपले मन आश्चर्याने आणि क्र्तज्ञतेने थक्क होते! अश्या सद्गुरुनी आपल्याला स्वीकारले या परम भाग्याचा आनंद हृदयात मावेनासा होतो!
श्रीराम समर्थ!!!