Jun22
Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Wednesday, 22nd June 2016
प्रवास नामस्मरणाचा: डॉ. श्रीनिवास कशाळीकरनामस्मरणाचा अभ्यास करताना एकदम काही आपल्याला आत्मज्ञान होत नाही. आपण सामान्यच असतो. आतील आणि बाहेरील जगाचे आपल्यावर बरे-वाईट परिणाम होतच असतात
.
त्यामुळे आपली माफक अपेक्षा असते की; सरकारने अश्या योजना आखाव्या, अशी धोरणे राबवावी, असे कायदे आणि नियम करावे की जेणेकरून माझा कोंडमारा होणार नाही, मी गुदमरणार नाही, माझी कुचंबणा होणार नाही. माझे जगणे हलाखीचे आणि अशक्यप्राय होणार नाही आणि मी असहाय्य होणार नाही! कायदे आणि नियम मोडायची मला गरज पडणार नाही. उलट, हे कायदे पाळल्यामुळे माझ्या अंतरात्म्याचे समाधान होत राहील आणि जीवनाची कृतकृत्त्यता, कृतार्थता आणि सार्थकता झाल्याची जाणीव होत राहील!
पण असे घडताना दिसत नाही! काय करावे हे आपल्याला सुचत नाही! आपण खिन्न होतो. कधी सवंग आणि संकुचित स्वार्थी सुखात समाधान मानण्याचा तर कधी छोट्या मोठ्या सेवाभावी कामात मन रमवण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत राहतो.
पण आपली वैयक्तिक आणि सामाजिक परिस्थिती कशीही असली तरी आपण आपल्या सद्गुरूंचे, ब्रह्मचैतन्य श्री. गोंदवलेकर महाराजांचे वचन, “गुरुकडून घेतलेले नाम, पावन करील जगास, हा ठेवावा विश्वास, राम कृपा करील खास” पुन्हा पुन्हा लक्षात आणून नामस्मरण करीत राहणे आवश्यक आहे!
चिकाटीच्या नामस्मरणाने कालांतराने जाणवू लागते की सरकार सरकार असे ज्याला आपण म्हणतो, ते देखील नामाच्या सत्तेखालीच वावरत असते! वैयक्तिक आणि सामाजिक प्रारब्धाच्या नियमांनुसार सारे काही नामाच्या सत्तेनेच घडत असते! नामाच्या सत्तेनेच आपल्या कळत-नकळत; सदभिरुची, सदिच्छा, सत्संकल्प, सत्प्रेरणा, सत्बुद्धी, सद्भावना, सद्वासना, सदाचार; म्हणजेच सद्गुरू ब्रह्मचैतन्य श्री. गोंदवलेकर महाराजांना अभिप्रेत असलेली संस्कृती आणि सुधारणा; व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनात अधिकाधिक प्रमाणात आविष्कृत होत असतात!
सतत नामस्मरण करता करता आपल्याला नक्कीच ह्या समाधान देणाऱ्या वास्तवाचा अनुभव येतो!
श्रीराम समर्थ!