Jun24
Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Friday, 24th June 2016
नामस्मरण आणि सावधानता: डॉ. श्रीनिवास कशाळीकरनामस्मरण करणाऱ्या साधकाने सावध असले पाहिजे असे कुणी म्हणाले की ते आपल्याला नकोसे वाटते. कारण, आम्हाला सावधानता ही शांती, विश्रांती, विसावा, आराम यांच्या विरुद्ध वाटते.
असे का होते?
याचे कारण आपल्याला जीवनसंघर्ष नको असतो! दगदग नको असते! आपल्याला आहे त्या परिस्थितीतून पळ काढायचा असतो! आपल्याला पळपुटा आळस हवा असतो! असा पळपुटा आळस म्हणजेच आपल्याला विश्रांती वाटते! किंबहुना तशी आपली पक्की खात्री असते! आपल्याला अश्या आळसाची सवय झालेली असते!
पण आपले आयुष्य आणि परिस्थिती तर सतत आणि वेगाने बदलत असते! साहजिकच आळसामुळे आपण मागे मागे पडत जातो आणि आयुष्याच्या अखेर आपल्याला पोकळी जाणवू लागते आणि रितेपणा जाचू लागतो! आळसापायी आपल्याला पश्चात्तापच होतो आणि समाधान दूरच राहते!
पण मजेची बाब म्हणजे आपल्याला सुधारायचे देखील असते; स्वत:ला आणि इतरांना देखील!
हे असे का होते?
कारण आहे ती परिस्थिती आपल्याला पसंत नसते! आश्चर्य म्हणजे यालाही कारण म्हणजे आपला पळपुटा आळसच होय! जे आहे त्यात आम्हाला समाधान नसते. कारण आमचे “हवे-नको”पण! प्रत्येक बाबतीत आम्हाला तक्रार करायची सवय झालेली असते! साहजिकच आपल्यामध्ये आणि परिस्थितीमध्ये कितीही बदल झाला तरी आमची तक्रार कायम असते!
गुरुकृपेने सतत नामस्मरण होऊ लागले की हळु हळु आळस कमी कमी होत जातो! सावधानता अंगी बाणू लागते. आणि स्वत:ला, इतरांना आणि परिस्थितीला दोष देण्यापूर्वी आपण सावध होतो! आपले जडत्व आणि संकुचितपणा अर्थात आपला क्षुद्र अहंकार आपल्याला अक्षरश: क्षणोक्षणी आणि प्रत्येक बाबतीत तक्रार करायला भाग पाडतो आहे हे ध्यानी येऊ लागते!
ह्यामुळे आहे त्या परिस्थितीत नामस्मरण टिकू लागते आणि वाढू लागते! आश्चर्याची बाब म्हणजे आपल्या लक्षात येऊ लागते की हीच ती खरी शांतता, खरी विश्रांती आणि हीच ती (स्वत:, इतर आणि परिस्थिती यांच्यामधल्या) खऱ्या सुधारणेची ईश्वरी प्रक्रिया!
श्रीराम समर्थ!