Jul05

Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Tuesday, 5th July 2016
श्री क्षेत्र गोंदवले: डॉ. श्रीनिवास कशाळीकरभारतभूमीमध्ये, कालातीत विश्वचैतन्य वेगवेगळ्या कालावधीत आणि वेगवेगळ्या ठिकाणी व्यक्तीच्या स्वरूपात आविर्भूत होते. करोडो लोकांची जीवने; त्या व्यक्ती देहात असताना आणि त्यांच्या देहत्यागानंतर शतकानुशतके विश्वचैतन्याकडे आकर्षित होतात, चैतन्यमय होतात आणि होत राहतात!
ज्या ठिकाणी ह्या व्यक्तींचे चरण स्पर्श होतात आणि वास्तव्य होते, त्या जागा आणि ती स्थाने त्यांच्या प्रेरणेचा चिरंतन स्त्रोत बनतात! हजारो वर्षे इथे येणाऱ्या लोकांना मायेचा ओलावा, सांत्वना, शांती, उत्साह, धीर, बळ आणि स्फूर्तीचा अनुभव येतो आणि येत राहतो! तसेच, स्वत:ची बुध्दी, भावना, वासना आणि संकल्प पालटल्याचा आणि प्रसन्नतेचा अनुभव येतो! ह्या जागा आणि ह्या स्थानाना आपण तीर्थक्षेत्रे म्हणतो!
अश्या ठिकाणी एक बाब समान असते. ती म्हणजे प्रसाद आणि महाप्रसाद! प्रसाद, किंवा महाप्रसाद म्हणजे आशीर्वाद आणि कृपेने परिपूर्ण असे, अनु. खाद्यपदार्थ किंवा अन्न.
देवाला किंवा आपल्या सद्गुरुना शुद्ध अंत:करणाने खाद्यपदार्थांचा किवा शिजवलेल्या अन्नाचा नैवेद्य दाखवून, त्यांची अनुज्ञा घेऊन आणि त्यांचा कृपाशीर्वाद घेऊन जे परत मिळते त्याला आपण अनु. प्रसाद किंवा महाप्रसाद म्हणतो.
सद्गुरू श्री. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज ह्यांच्या वास्तव्याने पवित्र झालेले श्री. क्षेत्र गोंदवले हे असे पवित्र क्षेत्र आहे! ह्या श्री. क्षेत्र गोंदवल्याला रोज हजारो लोकांना नामस्मरणरुपी अमृताची, प्रसादाची आणि महाप्रसादाची विनामूल्य प्राप्ती होत असते!
गोंदवल्यामध्ये; नामस्मरण करत करत प्रसाद किंवा महाप्रसाद वाढणारे आणि ग्रहण करणारे सर्वच जण ईश्वराप्रती किंवा आपल्या सद्गुरुप्रती कृतज्ञ असतात आणि कृतार्थ असतात! ह्या परंपरेने परस्परांच्या कल्याणाची सद्वासना, सद्भावना, सद्विचार, आणि सत्संकल्प यांचे पोषण होऊन सर्वांचे उत्थान अधिक जोमाने गतिमान होते.
प्रसादासाठी तन, मन वा धन अर्पून आपापल्या परीने सेवा करण्यातील मर्म असे अत्यंत उदात्त आहे!
आपणा सर्वांना निकोप जीवनासाठी आणि जीवनाच्या सार्थकतेसाठी नामस्मरणाची, गोंदवल्याची आणि अश्या प्रसाद व महाप्रसादाची अत्यंत तीव्र आणि निकडीची गरज आहे!
केवळ आपल्याला नव्हे, तर संपूर्ण जगाला नामस्मरणाची, अश्या क्षेत्रांची आणि अश्या प्रसाद व महाप्रसादाची अत्यंत तीव्र आणि निकडीची गरज आहे!
पण हे जसे खरे आहे, तसेच विश्वचैतन्याच्या (सद्गुरुंच्या) इच्छेने आणि प्रेरणेने त्या गरजेची पूर्ती करणारे लोक लाखोंच्या संख्येने वाढत आहेत आणि कृतीशील होत आहेत हे देखील तेवढेच खरे आहे!
श्रीराम समर्थ!