Jul05

Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Tuesday, 5th July 2016
ब्रह्मचैतन्य श्री. गोंदवलेकर महाराजांचा सोपा उपदेश: डॉ. श्रीनिवास कशाळीकरगोंदवलेकर महाराज म्हणतात, "हवे व नको याचा आग्रह नसावा. यातच वासनेचे मरण आहे".
आपण तत्वज्ञानाची पुस्तके वाचतो तेव्हा "अहं ब्रह्मास्मि" अर्थात आपले खरे स्वरूप ब्रह्म आहे असे वाचतो. पण रोजच्या जीवनात प्रमाणिकपणे आत्मनिरीक्षण केले तर काय आढळते? अगदी क्षुल्लक बाबींनी आपण हतबल होतो किंवा हुरळून जातो! याचा अर्थ आपण सर्वसमावेशक ब्रह्म नव्हे तर अगदी क्षुल्लक आहोत!
दोघात खरे काय?
आपण क्षुल्लक आहोत हेही खरे आणि आपण ब्रह्म आहोत हे खरे आहे!
आज आपण क्षुल्लक आहोत आणि त्यामुळे क्षुल्लक बाबींनी घाबरतो, दु:खी होतो, हतबल होतो किंवा हुरळून जातो, हे खरे आहे. पण त्याचप्रमाणे, आपले खरे स्वरूप ब्रह्म आहे, हे देखील खरे आहे! पण ते सुप्त आहे,आपल्याला आज जाणवत नाही, त्यामुळे आपण त्याला पारखे झालेलो आहोत!
ज्याप्रमाणे गुण प्रगट होण्यासाठी आपल्याला विशिष्ट अभ्यास करावा लागतो, त्याचप्रमाणे ब्रह्म प्रगट होण्यासाठी आपल्याला अभ्यास करावा लागतो!
नामस्मरण म्हणजेच आपल्या खऱ्या स्वरूपाचे स्मरण हाच तो अभ्यास! नामस्मरण सतत केले की आपल्या क्षुद्र्पणाची आवरणे गळून पडू लागतात आणि आपला "हवे नको याचा आग्रह" नाहीसा होऊ लागतो!
रोजच्या जीवनात याचा आपण प्रसन्न अनुभव घेऊ शकतो आणि ब्रह्म प्रगट होण्याच्या अर्थात, खऱ्या शरणागतीच्या, आत्मानुभूतीच्या आणि विश्वकल्याणाच्या मार्गावर अग्रेसर होतो!
सोप्या शिकवणुकीचा फायदा असा की ती आचरणात आणणे सहज शक्य असल्यामुळे, आपण भंपकपणा आणि ढोंग यांच्या भरीला पडत नाही आणि त्यापासून सुरक्षित राहतो!
श्रीराम समर्थ!