Jul12

Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Tuesday, 12th July 2016
समता आणि नामस्मरण: डॉ. श्रीनिवास कशाळीकर१. समाजातील प्रत्येकाला; ज्याच्या त्याच्या सुप्त प्रकृती धर्मानुसार आणि क्षमतेनुसार; संपूर्णपणे बहरण्याची संधी उपलब्ध करून देणारी भौतिक, मानसिक, कौटुंबिक, सामाजिक आर्थिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक, राजकीय अश्या विविध प्रकारची परिस्थिती (बालक, किशोर, शिशु, तरुण, अविवाहित, विवाहित, प्रौढ, वृद्ध, रुग्ण, विकलांग, गरोदर स्त्री, कष्टकरी, रात्रपाळी कामगार, सैनिक, अग्निशमन कर्मचारी, पोलीस, कलाकार, वैज्ञानिक अश्या विविध प्रकारच्या व्यक्तींच्या गरजा भिन्न असतात. त्यामुळे, प्रत्येकाला प्रत्येक बाबीची समान वाटणी म्हणजे समता मुळीच नव्हे) उपलब्ध करून देणे.
२. हे शक्य होण्यासाठी योग्य असा समग्र दृष्टीकोन, धोरणे, योजना, कायदे, नियम आणि अंमलबजावणीच्या यंत्रणा वरील सर्व क्षेत्रांमध्ये विकसित होणे आवश्यक आहे.
३. प्राचीन काळापासून जाणता अजाणता आणि विविध साधनांनी होणाऱ्या आंतरिक विकासामुळे आपल्यातल्या बहुतेकांना हे ढोबळ मानाने माहीत असते आणि अगदी मनापासून मान्य देखील असते. आपण त्यानुसार वागत देखील असतो. अनेक धोरणे, कायदे, नियम, सामाजिक रूढी, परंपरा, प्रघात, चालीरीती, संकेत वगैरेंमध्ये आंतरिक विकासाची लक्षणे दिसतात.
४. पण आंतरिक विकास (वैचारिक स्पष्टता, भावनात्मक निष्ठा, दृढ निर्धार आणि चिकाटी) कमी पडल्यामुळे आपल्यातील हीन वा भोळसट धारणा आणि भावना उफाळून येतात आणि पुष्कळदा आपण सवंग घोषणा, पोकळ वल्गना, बाष्कळ बडबड वगैरेमध्ये अडकतो, गुरफटतो, फरफटतो आणि भरकटतो!
५. यातून बाहेर पडून समता आणण्यासाठी; आंतरिक विकासाचे (आपापल्या क्षेत्रात वैचारिक स्पष्टता, भावनात्मक निष्ठा, आणि कर्तव्यातील समाधान मिळवण्याचे) सर्वात महत्वाचे, सर्वांना शक्य असे, सर्वांत सोपे, आणि बिनखर्चाचे असे साधन नामस्मरण आहे.
६. केवळ वाचन आणि चर्चेने नामस्मरणाच्या ह्या विश्वकल्याणकारी सामर्थ्याची संकल्पना काही प्रमाणात येऊ शकेल, पण त्याची प्रचीती येण्यासाठी नामस्मरण करणेच अत्यावश्यक आहे. किंबहुना, नामस्मरणाला पर्याय नाही असे म्हटले तरी ते अतिशयोक्त ठरणार नाही!