Jul20
Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Wednesday, 20th July 2016
षड्रिपु आणि नामस्मरण डॉ. श्रीनिवास कशाळीकरषड्रिपु म्हणजे काम, क्रोध, लोभ, मद, मोह आणि मत्सर. षड्रिपू असण्याचे कारण म्हणजे; मेंदू आणि शरीरातील इतर भागात स्त्रवणारे वेगवेगळे अंतस्त्राव, ज्यांना अनुक्रमे न्युरोट्रान्समीटर्स आणि होर्मोंस म्हणतात. शरीरक्रियाशास्त्रीय दृष्ट्या पाहिल्यास सर्वसामान्यपणे; अंतस्त्राव अजिबात नसणे शक्य नसल्यामुळे, षड्रिपु अजिबात नसणे शक्य नाही. त्यामुळे षड्रिपु त्याज्य आहेत असे कितीही कंठरवाने स्वत:ला आणि इतरांना ठासून सांगितले आणि समजावले आणि कितीही आटापिटा केला तरी आपण कुणीही त्यांपासून पूर्णपणे मुक्त होऊ शकत नाही! तसा दावा कुणी केला तर तो केविलवाणा वेडेपणा असतो!
त्याचप्रमाणे, आपण आयुष्यभर जरी त्यांच्या मागे फरफटत गेलो, तरी तृप्त आणि समाधानी होऊ शकत नाही! कारण षड्रिपुंची पूर्ती ही फडफडणाऱ्या विस्तवाप्रमाणे असते! फडफडणारी आग जशी अन्न शिजवू शकत नाही, त्याप्रमाणे षड्रिपुंच्या पूर्तीची धग अंतर्मनापर्यंत आणि अंतरात्म्यापर्यंत पोचू शकत नाही आणि समाधानाचे अन्न शिजवू शकत नाही! म्हणूनच वासनापुर्तीने आपले समाधान झाले असा दावा कुणी केला तर तो देखील केविलवाणा भंपकपणा असतो!
ज्याप्रमाणे चुलीमुळे आग नियंत्रित होते आणि तिची धग भांड्याला नीटपणे लागून अन्न वेळेमध्ये शिजते, त्याचप्रमाणे जीवनातील सर्व भोगांची आणि उपभोगांची धग नामस्मरणरुपी चुलीमुळे अंतरात्म्याकडे पोचते आणि अंतरात्म्यामध्ये समाधानरुपी अन्न शिजू लागते. साहजिकच आपले, आपल्या कुटुंबियांचे आणि समाजाचे समाधान होऊ लागते! ज्याप्रमाणे चुली आणि त्यांच्यातील आग कमी जास्त असते, त्याचप्रमाणे नामसाधकांच्या प्रगतीचे टप्पे देखील वेगवेगळे असतात. पण नामस्मरणाने समाधानाकडे वाटचाल होऊ लागते; हे केवळ सद्गुरू ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराजांच्याच नव्हे तर सर्वच संत महात्म्यांच्या शिकवणीचे त्रिवार सत्य असे सार आहे.