Jul26
Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Tuesday, 26th July 2016
संशय (देहबुद्धी आणि कुसंग) आणि नामस्मरण: डॉ. श्रीनिवास कशाळीकरसद्गुरू ब्रह्मचैतन्य श्री. गोंदवलेकर महाराज म्हणतात, "गुरुवर विश्वास ठेवून चिकाटीने व आवडीने नाम घ्यावे”.
पण नामस्मरणाबद्दल आपल्याला संशय असतो. हा संशय केवळ बुद्धीच्या संभ्रमामुळे किंवा गोंधळामुळे असतो असे नव्हे तर, बुद्धीला पटले, तरी देखील आपल्याला नामाबद्दल खात्री वाटत नाही. नामाचे महत्व वाटत नाही. नामाबद्दल पुरेशी ओढ आणि प्रेम वाटत नाही. नामामध्ये गुंतणे किंवा रमणे दूरच; नामाबद्दल ऐकताना देखील आपल्याला काही वेळाने कंटाळा येतो. गुरूबद्दल आदर असला आणि प्रेम असले तरी देखील हे सर्व असल्यामुळे गुरुचा उपदेश आपल्या आचरणात येत नाही.
पण याबद्दल खिन्न व निराश होण्याचे मुळीच कारण नाही.
कारण आपण; आपले मन, वासना आणि गरजा यामध्ये अडकलेले असतो आणि आपले मन, वासना आणि गरजा; आपल्या मेंदूतील स्त्रावांशी, अनैच्छिक मज्जा संस्थेशी, आपल्या अंतस्त्रावी ग्रंथींशी आणि आपल्या शरीरातील असंख्य रासायनिक क्रिया आणि प्रक्रियांशी निगडीत असतात. ह्या अवस्थेला देहबुद्धी म्हणतात. संशयाच्या मुळाशी देहबुद्धी असते! देहबुद्धीमुळे आपण नामाच्या विरुद्ध दिशेला म्हणजेच खाली खेचले जात असतो.
संग म्हणजे आपला सहवास, आस्था, गुंतणे, लक्ष, वा आवड! नामस्मरणाला पोषक अशी व्यक्ती, असे वातावरण, अशी जागा म्हणजे सत्संग आणि ह्याला विरोधी तो कुसंग!
देहबुद्धी आणि कुसंग वाईट म्हणून नाहीसे होत नाहीत आणि चांगले म्हणून समाधान देत नाहीत! देहबुद्धी, कुसंग आणि तज्जन्य सुख दु:ख ह्यानाच प्रारब्ध म्हणतात. हे प्रारब्ध; व्यक्ती, समाज आणि देशाला लागू असते.
स्वत:चे, समाजाचे आणि देशाचे प्रारब्ध मान्य करणे आणि (नामस्मरण आणि नामस्मरणाला पोषक ते सर्व करत आणि नामस्मरणाला घातक ते सर्व जमेल तसे टाकत) त्यावर मात करणे हा प्रारब्धावरील रामबाण उपाय आणि अपरिहार्य असा युगधर्म आहे.
हे सर्व समजणे ही नामकृपा किंवा गुरुकृपा आहे कारण गुरु आणि नाम हे अभिन्न असतात; आणि हे सर्व यशस्वीपणे करता येणे ह्यालाच आपण गुरुविजय किंवा नामविजय असे म्हणू शकतो.
पुरातन कालापासून चालत आलेली ही विजयी परंपरा आहे.