Jul31
Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Sunday, 31st July 2016
राम कर्ता, ताजे आकलन: डॉ. श्रीनिवास कशाळीकरसद्गुरू ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज म्हणतात, “राम कर्ता म्हणेल तो सुखी, मी कर्ता म्हणेल तो दु:खी”.
या विश्वामध्ये आपण सर्वजण (मानव, प्राणी, वनस्पती, इतर सजीव आणि निर्जीव), विशिष्ट ऊर्जा, क्षमता, गुण आणि सृजनशीलता यानी परिपूर्ण असतो. पण आपल्याला याची यथार्थ जाणीव, कल्पना नसते.
एका टप्प्यावर आपल्यामध्ये वासना, भावना, विचार आणि दृष्टिकोन; प्रगट होऊ लागतात. अशा तऱ्हेने आपण वेगळे कुणीतरी असल्याचा भास आपल्याला होऊ लागतो. म्हणजेच आपल्यातला भ्रामक "मी" जागृत होतो; आणि आपण; वस्तू, पैसा, जोडीदार, घर, नोकरी; किंवा सत्ता, समाजकार्य, लोकसेवा वगैरे मध्ये गुंतून जातो. हे सर्व आपल्या अंतर्मनात आणि जागृत मनामध्ये चालू असते. अश्या तऱ्हेने आपल्या हातून बर्यार वाईट गोष्टी घडत जातात आणि त्यातून येणार्याय सुख दु:खातून आणि यश-अपयशातून आपले आणि संपूर्ण विश्वाचे स्वरूप घडत आणि बिघडत जाते!
अश्या तऱ्हेच्या भ्रामक मी पणातून आपण “मी कर्ता” असे म्हणतो आणि पराधीनतेतील संकुचित सुख-दु:खात सडत राहतो. ह्यालाच सद्गुरू, “मी कर्ता म्हणेल तो दु:खी” म्हणतात.
सद्गुरू म्हणजेच नाम आणि राम. तो काळ, अवकाश आणि आपल्या सर्व जाणीवांच्या अतीत आहे. त्याच्याच कृपेने आपल्याला नामाची संजीवनी प्राप्त होते आणि तोच आपले संकुचित शहाणपण, क्षुद्र गर्व, अनाठायी हट्ट, अवाजवी आग्रह आणि हीन अहंकार गळून पडू लागतात. त्याच्याच कृपेने “मी कर्ता” ह्या भ्रमातून घट्ट धरलेली इतर सर्व ध्येये बाजूला पडत जातात आणि त्याचीच म्हणजेच नामाचीच ओढ आणि गोडी वाढत जाते. त्याच्याच कृपेने तो म्हणजेच नाम आपल्या सर्वाच्या अन्तर्यामी असल्याचे कळू लागते आणि नामाच्या सच्चिदानंद स्वरूपाची आणि अमृतमयी सान्निध्याची प्रचीती येऊ लागते. जीवन कृतज्ञता आणि सार्थकता यानी भरून जाते.
ह्यालाच सद्गुरू, “राम कर्ता म्हणेल तो सुखी” असे म्हणतात.