Aug21
Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Sunday, 21st August 2016
१. आपण कसे वागावे डॉ. श्रीनिवास कशाळीकरश्री. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात, “संत सांगतात तसे आपण वागावे. ते वागतात तसे नये वागू!”
संत किंवा आपले सद्गुरू जसे वागताना दिसतात, त्याच्या कितीतरी वेगळे आणि विलक्षण आणि आपल्या कल्पनेच्या अतीत असे त्यांचे अंतरंग असतात आणि ते असल्याशिवाय तसे वागणे म्हणजे वाघाचे कातडे पांघरून वाघाप्रमाणे मिरवणे! अर्थात त्यामुळे फजितीच फजिती होऊ शकते!
आपण कसे असावे आणि कसे वागावे ह्याबद्दल अनेक मते आहेत. आपल्यालाही; पुस्तके, नियतकालिके वा वृत्तपत्रे वाचून; चित्रपट, नाटके पाहून; कीर्तने, निरुपणे आणि कथा ऐकून आणि आजूबाजूला पाहून अनेकदा अनेक विचार आणि उर्मि येतात.
पण कसेही होण्याचा किंवा कसेही वागण्याचा प्रयत्न केला किंवा आपण कसेही झालो आणि कसेही वागलो तरी ते वेषांतर केल्याप्रमाणे केवळ बाह्यस्वरूप बदलणे असल्यामुळे आपले समाधान होत नाही!
फक्त आपल्या सद्गुरुना म्हणजेच आपल्या अंतरात्म्याला जे आवडते, तसे होण्याचे वा वागण्याचे प्रयत्नच आपल्याला समाधानाच्या मार्गावर नेतात! त्यामुळे तेच श्रेयस्कर आहेत! म्हणूनच संत म्हणजेच आपले सद्गुरू सांगतात तसे वागावे. ते वागतात तसे नये वागू हे अक्षरश: खरे आहे!
पण असे प्रयत्न करायचे म्हणजे काय?
सर्व मते आणि मतांतरे बाजूला ठेवून; त्यांनी सांगितल्याप्रमाणे नामस्मरण सुरु करणे, करीत राहणे, ते वाढवण्याचा प्रयत्न करणे; आणि दरम्यान; आपल्याला कळलेली आणि अनुभवाला आलेली नामस्मरणाची महती इतराना सांगण्याचा प्रयत्न करणे; हेच ते प्रयत्न! ह्या प्रयत्नांनीच आपले अधिकाधिक समाधान होत जाते आणि त्या अनुरोधाने आपले बाह्य स्वरूप आकाराला येते आणि आपली व्यवहारातील वागणूक देखील आपोआपच योग्य प्रकारे विकसित होते!