Aug21
Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Sunday, 21st August 2016
२. आपल्याला हव्या त्या गोष्टी डॉ. श्रीनिवास कशाळीकरश्री. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात, “आपल्याला हव्या त्या गोष्टी देण्यामध्ये भगवंताची खरी कृपा नसून, असेल त्या परिस्थितीमध्ये आपले समाधान टिकणे ही त्याची खरी कृपा होय.”
सुरुवातीला हे आपल्याला पटत नाही!
कारण?
कारण, आहे ती परिस्थिती स्वीकारणे त्यात समाधान मानणे म्हणजे पराभव स्वीकारणे असेच आपल्याला वाटत असते! साहजिकच, हे आपल्याला क्लेशकारक आणि असह्य होते. जगामध्ये व आपल्या जीवनात काय व कसे असावे (उदा. राज्यव्यवस्था, समाजव्यवस्था, अर्थव्यवस्था इत्यादी आणि आपला व्यवसाय, घरदार, कटुंब, आर्थिक स्थिती इत्यादी) याबाबतच्या, अर्थात हवे-नको पणाच्या कल्पना, वासना आणि ओढ यामुळे आपण कायम अस्वस्थ असतो. असंतुष्ट असतो. किंबहुना तसे राहाणे आपल्याला संवेदनाशील आणि योग्य वाटते!
पण जगामध्ये असो, वां वैयक्तिक जीवनात अनेकदा, आपल्याला हव्या त्या गोष्टी घडल्याने वा मिळाल्याने; कालांतराने मनाला जेव्हां टोचणी लागल्याचा अनुभव येतो आणि अनेकदा, आपल्याला हव्याश्या वाटणाऱ्या अनेक बाबी न घडल्याने वा न मिळाल्याने पुढे जेव्हा “हायसे” वाटल्याचा अर्थात समाधान झाल्याचा अनुभव येतो, तेव्हा नाईलाजाने आणि मोठ्या मुश्किलीने आपला अहंकार विरघळू लागतो आणि “आपल्याला हव्या त्या गोष्टी देण्यामध्ये भगवंताची खरी कृपा नाही” हे पटू लागते आणि मनात ठसु लागते!
जगामध्ये असो, वा वैयक्तिक जीवनात: “आपल्याला हव्या” वाटणाऱ्या गोष्टी; वास्तविक पाहता, आपण आपल्या अहंकारापोटी जोपासलेल्या असतात, आपल्या अंतरंगाला हव्या की नको याचा विचार देखील न करता! म्हणूनच त्यांच्यासाठी स्वत:ला वा इतरांना कळत-नकळत पीडा देणे, किंवा त्या न मिळाल्याने मन मारून हताश होणे, ह्यामुळे वैयक्तिक आणि सामाजिक तणावाचे दुष्टचक्र प्रभावशाली बनत जाते!
प्रत्येक प्रसंगी मनात असो वा नसो, नामस्मरण आचरणात येत जाते तसे तसे, ईश्वरी सत्तेचे म्हणजेच सद्गुरुंच्या सत्तेचे नि:पक्षपाती, अचूक, अखंड, अविरत आणि आपल्या अंतरंगाला समाधान देणारे नियंत्रक कार्य ध्यानात येऊ लागते! घडणारे सर्व काही ईश्वरेच्छेने म्हणजेच आपल्या सद्गुरुंच्या इच्छेने; आणि आपल्या कल्याणासाठीच होत आहे ही आश्वासक जाणीव जेव्हां आपल्याला हव्याश्या वा नकोश्या प्रत्येक प्रसंगात मायेची सावली आणि धीराचा हात देत राहते, तेव्हां सुख दु:खाचे तडाखे मुलायम बनत जातात! साहजिकच मग; असेल त्या परिस्थितीमध्ये आपले समाधान टिकणे ही भगवंताची खरी कृपा होय हे पटते आणि अनुभवाला येते!