Aug21
Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Sunday, 21st August 2016
३. आंधळ्याने पाणी भरावे तसे नाम घ्यावे :डॉ. श्रीनिवास कशाळीकरश्री. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात, "आंधळ्याने पाणी भरावे तसे नाम घ्यावे. भांडे भरले किती आणि रिकामे किती, हे त्याला समजत नाही. तो भरतच राहतो. तसे नाम सतत घेत राहावे. देहाच्या कणाकणातून नामाचा ध्वनी केव्हाही यावा इतके नाम घ्यावे. सुरुवातीला रामनाम असे मुरले की पुन्हा जास्त लक्ष द्यावे लागत नाही. आपोआप देहाचे सारे कण नामजप करतात."
हे अगदी साधे व सहज सांगणे किती पराकोटीचे सत्य आहे याची सहजासहजी कल्पना येत नाही!
स्वत:ला आंधळे समजणे फारच नकोसे वाटते! अहंकार आड येतो! शिवाय, रोजच्या व्यवहारातल्या अनुभवाप्रमाणे अमुक किंमत दिली की अमुक वस्तू मिळते तशी अमुक एवढे नाम घेतले की अमुक परिणाम दिसला पाहिजे असे आतून वाटत असते. आपले नाही तर नाही, किमान, समाजात तरी फरक पडावा आणि पडेल असेल असे वाटत असते! पण ते जेव्हां घडत नाही, तेव्हां विश्वास डळमळू लागतो!
पण म्हणूनच आमच्या कल्याणासाठी सद्गुरुनी हे सांगितले आहे!
खोलात जाऊन नीट विचार केला तर हळूहळू लक्षात येते की; आमच्या सद्गुरुंचाच अनुग्रह आम्हाला का आणि कसा मिळाला, विशिष्ट देशातच आणि विशिष्ट आई-वडिलांच्या पोटीच आमचा जन्म का आणि कसा झाला, काही विशिष्ट व्यक्तीच आमच्या कुटुंबीय का आणि कश्या झाल्या; अश्या अनेक बाबींची कारणे दिसत नाहीत! भिंतीच्या पलिकडे काय चाललेय हे “दिसत” नाही! समोरच्या व्यक्तीच्या मनातले “दिसत” नाही! एवढे कशाला, आमच्या स्वत:च्या शरीराच्या आणि मनाच्या कोनाकोपऱ्यात केव्हां केव्हां, काय काय घडले आता काय चाललेय आणि पुढच्या क्षणी काय होणार हे देखील आम्हाला “दिसत” नाही! शिवाय हे का घडले, कसे घडले किंवा का होणार आणि कसे होणार ह्यातले काहीही दिसत नाही!
मग आम्ही “आंधळे”च नव्हे काय?
आता आमच्याकडून घडणाऱ्या नामस्मरणाचा विचार करू! आपल्या नामस्मरणामध्ये; क्षणोक्षणी इतर विचार, इच्छा, आशा, निराशा, मत्सर, द्वेष, राग, लोभ, चिंता, तिरस्कार, काळजी, खिन्नता इत्यादी कोणत्या भावना, किती तीव्रपणे उत्पन्न होतात, कोणत्या वासना उत्पन्न होतात आणि कोणत्या थरातून उद्भवतात, हे सारे; आम्हाला दिसते का? नाही! आमची जपसंख्या मोजताना आणि नोंदताना आम्ही हे सारे हिशेबात घेऊ शकतो का? नाही!
मग आम्ही “आंधळे”च नव्हे काय?
साहजिकच, आमचे नामस्मरण किती झाले आणि आमचे मन किती शुद्ध झाले हे आम्हाला कळू शकते का? नाही! मग, “आमचे नामस्मरण एवढे झाले तरीआम्हाला अजून अनुभव कसा नाही?” असे म्हणणे योग्य होईल का? अर्थातच नाही ना?
म्हणूनच आम्ही सद्गुरूंची वरील शिकवण अत्यंत नम्रपणे आणि सर्वस्व झोकून देऊन आचरणात आणण्याचा जीवापाड प्रयत्न नको का करायला?