Aug21
Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Sunday, 21st August 2016
मनोगत: डॉ. श्रीनिवास कशाळीकरनामाचा महिमा अगाध आणि शब्दातीत आहे. नामस्मरण करावे तेवढे थोडेच आहे. पण हे कळत असून सुद्धा पुरेसे वळत नाही. नामावरची निष्ठा आणि नामामधील प्रेम म्हणावे तसे वाढलेले नसल्यामुळे नामात रमून जाणे होत नाही आणि नामस्मरण अखंड चालत नाही. त्यात खंड पडतो!
पण ह्या दरम्यान पुष्कळदा कळत नकळत; नामाविषयी विचार मात्र चालू असतात. आजवर न जाणवलेले नामस्मरणाचे विविध कल्याणकारी पैलू नव्याने जाणवत जात असतात. अर्धवट जाणवलेले पैलू अधिक स्पष्ट होत जात असतात.
इतर सर्व बाबींप्रमाणे ह्यामागे देखील नामरूप असलेल्या सद्गुरू ब्रह्मचैतन्य श्री. गोंदवलेकर महाराजांचीच प्रेरणा आहे. खरे सांगायचे तर; नामरूप असलेल्या त्यानी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आणि अनेकानेक प्रकारे नामाचा शब्दातीत महिमा प्रगट करणे साहजिकच असल्यामुळे त्यांनी तसा तो प्रगट केला आहे आणि अजूनही करत आहेत!
पण आमच्यातल्या प्रारब्धवश त्रुटीमुळे आम्हाला जे प्रश्न पडतात आणि ज्या शंका येतात, त्यांची आम्हाला पटतील अशी उत्तरे जेव्हां मिळतात, तेव्हां नवीन शोध लागल्यासारखे वाटते! ही उत्तरे देखील त्यांच्या बोधवचनांमध्ये त्यांनी अत्यंत सोप्या आणि साध्या भाषेत पूर्वीच देऊन ठेवली आहेत! पण ती; त्यांच्या भाषेच्या सोपेपणामध्ये आणि साधेपणामध्ये लपल्यामुळे आणि कालानुरूप परिस्थिती बदलल्यामुळे ज्या नवनवीन समस्या तयार झाल्या त्यामुळे आम्हाला मिळत नव्हती वा कळत नव्हती!
नामाच्या महिम्याचा हा अंश जाणवण्याने मन हर्षभरित होते, मनामध्ये हुरूप येतो, मनाला विस्मय वाटतो आणि तो लिहून झाल्याशिवाय चैन पडत नाही! त्यामुळे, हे सारे पूर्वी कुणी लिहिलेले आहे की नाही, ह्या लिहिण्याने इतर कुणाला लाभ होईल की नाही; ह्यापेक्षा, नामाचा हा महिमा स्वत:का अधिक स्पष्ट होईल ह्या भावनेने, स्वत:च्या तो मनात घोळवता येईल ह्या तीव्र ओढीने आणि त्याचप्रमाणे तो मनामध्ये मावत नसल्याने नामाविषयीच्या लिखाणाला सुरुवात झाली! नामस्मरणात पुरेसे रंगून जाण्यापूर्वीच नामाचा हा अंशमात्र मला जाणवणे आणि तो लिहिला जाणे ही देखील सद्गुरुंचीच इच्छा आहे यात शंका नाही! किंबहुना, नामाची निष्ठा आणि नामाचे प्रेम येण्यासाठी आवश्यक असल्यामुळेच की काय सद्गुरुनी वर्षानुवर्षे करून घेतलेला हा गृहपाठ असावा! त्यातले असली अर्थातच त्यांचे आणि नकली ते माझे यात मुळीच शंका नाही!
म्हणूनच, जीवनातील इतर सर्व बऱ्यावाईट आणि योग्य-अयोग्य बाबींप्रमाणे हे आणि आत्तापर्यंत झालेले नामाविषयीचे अल्पसे लिखाण जसे आहे तसे; त्याबद्दल कोणताही दावा न करता मनापासून विनम्रपणे आणि कृतज्ञतापूर्वक सद्गुगुरुंच्या चरणी सादर समर्पण!