Aug21
Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Sunday, 21st August 2016
४. संतांची वृत्ती राममयच असते: डॉ. श्रीनिवास कशाळीकरश्री. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात,”जो जो कोणी मला भेटला तो तो मी आपलाच मानला” आणि “संतांची वृत्ती राममयच असते, त्यांना सर्वत्र रामच दिसतो”!
आमची वृत्ती कशी असते? नकळत मनात तुलना होताना मनामध्ये आमच्या सहिष्णुतेचा विचार येतो. खरे तर सहिष्णुता हा शब्द आपण आपण पुष्कळदा वाचतो वा ऐकतो. पण खरी सहिष्णुता म्हणजे नेमके काय? याचा विचार करता लक्षात येते की सहिष्णुता ही वाटते तितकी साधीसुधी बाब नाही! तिला अनेक पदर आहेत!
अंतर्बाह्य ईश्वर असताना त्याचा पूर्ण विसर पडणे (त्यामुळे त्याविषयी टिंगल टवाळीची भावना असणे) आणि त्यामुळे, अंतर्बाह्य पसरलेल्या वासनाविवशतेला विरोध तर नाहीच पण तिचे (हीन स्वार्थाचे) उद्दंड आणि बेभान समर्थन करणे ही सकृद्दर्शनी सहिष्णुता वाटली तरी ती सहिष्णुता नसून स्वत:च्या आणि इतरांच्या अंतरात्म्याशी केलेली घोर प्रतारणा असते. ही सहिष्णुतेच्या प्रवासाताली पहिली पायरी.
वासना आणि ध्येय यांच्यात संघर्ष होऊन सारखी ओढाताण होणे आणि वासनेमध्ये पुन्हा पुन्हा नाईलाजाने ओढले जाणे व वाहात जाणे व आपल्या आतल्या आणि बाह्य जगातील वासनेविषयी चीड येणे ही सकृद्दर्शनी असहिष्णुता वाटली तरी ती असहिष्णुता नसून, स्वत:च्या आणि इतरांच्या अंतरात्म्याशी सहिष्णू बनण्याची प्रामाणिक धडपड असते. ही सहिष्णुतेच्या प्रवासाताली दुसरी पायरी.
नामाची निष्ठा भक्कम होता होता नामाच्या ओढीने अस्वस्थता, आतुरता व तळमळ निर्माण होणे आणि अंतर्बाह्य व्यापणाऱ्या वासनांचे आघात आणि पकड ढिली होणे, तसेच अंतर्बाह्य पसरलेल्या वासनेचे पर्यवसान वेगळ्या वेगळ्या प्रकारांनी आणि वेगवेगळ्या काळानुसार पण निश्चीतपणे नामाच्या ओढीत आणि गोडीत होते ह्या अंतर्बाह्य परिवर्तनाची विजयी अनुभूती येणे आणि शाश्वत समाधान आणि सार्थकता याची जाणीव ठळक होऊन; नामाचा आग्रह, हेका, हट्ट आणि वासनेचा तिरस्कार व तिटकारा हळु हळु निघून जाणे ही सहिष्णुतेच्या प्रवासाताली तिसरी पायरी.
आणि याच्या पलीकडे सहिष्णुतेच्या प्रवासाची चवथी पायरी असते. ह्या शब्दातीत पायरीवर संत असतात. ह्या सहिष्णुतेचे महत्व असे की ती केवळ शाब्दिक सहिष्णुता नसून प्रत्यक्ष विश्वकल्याण साधणारी संजीवक अमृतौषधी असते! ही खरी पराकोटीची सहिष्णुता!
आपल्यापुरते असे म्हणता येईल की, प्रत्येकाला पूर्णत्वाची आंस असते, पण ती ओळखता येतेच असे नाही. तसेच शब्दात सांगता बोलता येतेच असे नाही. त्याचप्रमाणे ती आंस तृप्त करण्याचे साधन माहीत असतेच असे नाही. एवढेच नव्हे तर ते साधन कळले तरी त्या साधन मार्गावर चालता येतेच असेही नाही. आणि अखेर साधन मार्गावर चालू लागला तरी अखेरपर्यंत चिकाटीने चालत राहणे जमतेच असे नाही!
आपलेही जर असेच असते, तर अमक्याने असे वागावे, तमक्याने तसे वागावे असा हट्ट किंवा अट्टाहास धरणे; म्हणजेच कुणाहीबद्दल असहिष्णू असणे नाही का? आपल्या मनाप्रमाणे कुणी वागत नाही असे दिसल्यावर आपण त्याच्यावर नाराज होतो आणि त्याच्याविषयीच्या कर्तव्यात कसूर करतो! हे कितपत योग्य आहे? नाही ना?
पण आपली ही असहिष्णुता झटकून कशी टाकायची? आपण सहिष्णू बनून आपले कर्तव्य कसे पार पाडायचे?
सद्गुरुंच्या शिकवणीप्रमाणे आपली पूर्णत्वाची वाटचाल चालू ठेवणे म्हणजेच नामस्मरण चालू ठेवणे आणि जमेल तसे ते वाढवीत राहणे हाच सहिष्णू होण्याचा; म्हणजेच स्वत:च्या आणि इतरांच्या प्रती असलेले हट्ट आणि अट्टाहास कमी करत नेण्याचा आणि त्याचबरोबर, आपले सर्वाधिक महत्वाचे कर्तव्य चोखपणे पार पाडण्याचा रामबाण उपाय आहे!
असे करता करता आपली तुलनेने कमी महत्वाची इतरही कर्तव्ये (निरपेक्ष भावनेने केलेली कर्मे) देखील (ज्यांमध्ये आम्ही असहिष्णुतेमुळे कमी पडतो, ती) आपोआपच आणि पूर्वीपेक्षा अधिक आत्मीयतेने आणि आस्थेने पार पाडली जातात!