World's first medical networking and resource portal

Articles
Category : All
Medical Articles
Aug21
गोंदवलेकर महाराज मला समजलेले ६. सत्यवस्तू &#
६. सत्यवस्तू ओळखणे हा परमार्थ डॉ. श्रीनिवास कशाळीकर

श्री. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात, “सत्यवस्तू ओळखणे हा परमार्थ, आणि असत्य वस्तूला सत्य मानून चालणे हा प्रपंच होय”.

परमार्थाची आणि प्रपंचाची इतकी चपखल व्याख्या सापडणे कठीण आहे!

खरे सांगायचे तर; आम्ही माध्यमातील मंडळींनी, काळाची दिशा ओळखायला शिकले पाहिजे. जे जे घडताना दिसते, भासते आणि गोंधळात टाकते, खिन्न करते, उद्विग्न करते, भडकवते, उद्दीपित करते किंवा भ्रष्ट करते आणि फूट पाडते त्याच्या पलिकडे सर्वांना प्रगल्भ बनवणारे आणि एकत्र आणणारे सत्य बघायला आणि ओळखायला शिकले पाहिजे!

पण आम्ही देखील सामान्यच आहोत! आमच्यातही उणीवा आहेत! आमची दृष्टीही स्वच्छ नाही! त्यामुळे समाजातले असलेले-भासलेले दोष, गुन्हे आणि अपराध यांनी आम्ही देखील विचलित होऊ शकतो, वा घाबरु शकतो हे अगदी खरे आहे! आम्हाला देखील कुत्सितपणा, निराशा, संकुचित स्वार्थ ग्रासु शकतात! प्रगल्भ विचार, उदात्त भावना एका बाजूला आणि राजकीय दबाव, प्रलोभने, भपका आणि झगमगाट दुसऱ्या बाजूला अश्या रस्सीखेचीमध्ये आम्ही देखील गोंधळू आणि बहकू शकतो आणि भरकटू शकतो हे अगदी खरे आहे! विशेष म्हणजे, यामुळे आमचे आकलन सदोष बनून आम्ही; स्वत:सकट इतरांना देखील आमच्या आकलनाचे बळी बनवू शकतो!

पण या कोंडीतून बाहेर कसे पडायचे? ही घुसमट आणि ही तडफड कशी थांबवायची यावर उपाय शोधला तरी सापडत नव्हता!

परंतु यादरम्यान सद्गुरू ब्रह्मचैतन्य श्री. गोंदवलेकर महाराजांचे प्रा. के. वि. बेलसरे यांनी लिहिलेले चरित्र वाचनात आले. त्यामध्ये सबजज्ज फडके यांच्याबरोबर झालेल्या संवादामधून सुधारणा आणि संस्कृती म्हणजे काय याचे थोडेफार आकलन झाले आणि डोळ्यात जणू काही अंजनच पडले!
ज्याप्रमाणे रस्त्यावरचे खड्डे प्रवास दुष्कर करतात, त्याचप्रमाणे आपली देहबुद्धी सत्याकडे चाललेला आपला प्रवास अवरुद्ध करून आपल्याला भ्रमात बांधून ठेवते. यामुळे ईश्वराकडे, सद्गुरुंकडे, आपल्या खऱ्या “मी” कडे म्हणजेच शाश्वत समाधानाकडे पोचणे जिकीरीचे आणि दुस्तर होते. रस्त्यावरचे खड्डे बुजवले की जसा प्रवास सुरळीत होतो, त्याप्रमाणे नामस्मरणामुळे सद्बुद्धी, सद्भावना, सद्वासना आणि सत्कार्य ही सर्व “रस्तादुरुस्तीची यंत्रे” झपाट्याने कार्यरत होतात आणि शाश्वत समाधानाचा रस्ता दुरुस्त आणि प्रशस्त होतो हे पक्के ध्यानात आले!

त्यामुळे, स्वत:ची दृष्टी साफ होण्यासाठी आणि लोकांच्या पर्यंत सर्वांना प्रगल्भ बनवणारे आणि एकत्र आणणारे सत्य पोचवण्याचे स्वत:चे कर्तव्य समाधानकारकपणे पार पाडण्यासाठी आम्ही माध्यमवाल्यांनी; नामस्मरणाचा अत्यंत आस्थेने अभ्यास, अगत्यपूर्वक अंगिकार आणि जीव तोडून प्रसार केला पाहिजे ह्याची खोलवर आणि तीव्र जाणीव झाली!
ही जाणीव म्हणजे आपल्या सर्वांच्या कल्याणाची नांदीच आहे!!


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (1932)  |  User Rating
Rate It


Browse Archive