Aug21
Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Sunday, 21st August 2016
७. ज्याची दृष्टी रामरूप झाली तो खरा गुरु होय डॉ. श्रीनिवास कशाळीकरश्री. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात, “ज्याची दृष्टी रामरूप झाली तो खरा गुरु होय”
एकीकडे गुरुशिवाय ज्ञान नाही खरे; पण खरा गुरु ओळखायाचा कसा? किंवा आपल्याला आपल्या गुरुची ओळख कशी पटेल? असे म्हणतात, शिवो भूत्वा शिवं यजेत. शिव होऊन शिवाला जाणावे. साधू होऊन साधूला जाणावे. म्हणजेच एका प्रकारे दृष्टी रामरूप होण्याचा थोडातरी अनुभव आला तरच आपल्याला अंधविश्वास आणि कुत्सितपणा; दोन्हीही टाळून खरा गुरु म्हणजे काय ते ओळखता येईल आणि आपल्या गुरुची ओळख देखील आपल्याला पटेल!
पण हे शक्य आहे का? नामस्मरण करताना कोणाला कोणते अनुभव आणि केव्हां येतील हे सांगता येत नसल्यामुळे, आपल्या चिकाटीची कसोटी लागते, आणि धीर सुटू शकतो हे खरे नाही का?
हे अगदी खरे आहे. आपण सारे; पुन्हा पुन्हा नामाच्या ( चैतन्याच्या) विस्मृतीत जातो आणि विषयांकडे आकर्षित होत राहतो, त्यांच्या भूलभूलैय्यात अडकत राहतो! इंद्रियगम्य स्थूल विषय आणि दृश्य विश्वाच्या आकर्षणाचा (म्हणजेच प्रारब्धाचा) जोर इतका जबरदस्त असतो की आपली धाव आपोआप चैतन्याच्या विरुद्ध दिशेला वळते! साहजिकच आपण भलतीकडेच भरकटत जातो! परिणामी; आपली अस्वस्थता काही केल्या कमी होत नाही आणि खरं गुरु ओळखता येणे, किंवा आपल्या गुरुची ओळख पाटणे, हे आपल्यापासून दूरच राहते!
पण चिकाटीने नामस्मरण करता करता आपल्याला, हळूहळू जाणवू लागते की आपल्या इच्छे-अनिच्छेपलिकडे; विश्वचैतन्याची जननी आपली गुरुमाउली सर्व बऱ्या वाईट प्रसंगात आपल्याला सांभाळून आपल्याला चैतन्यामृतपान करवीत आहे आणि आपल्याकडून नामस्मरण आणि स्वधर्मपालन वाढत्या प्रमाणात करवीत आहे. पण एवढेच नव्हे तर, सदभिरुची, सदिच्छा, सत्संकल्प, सत्प्रेरणा, सत्बुद्धी, सद्भावना, सद्वासना, सदाचार यांनी केवळ आपले व्यक्तिगत जीवन नव्हे तर संपूर्ण सामाजिक जीवन देखील अधिकाधिक प्रमाणात भरून टाकीत आहे!
प्रत्येक बाबतीत अशी सद्गुरुची अद्भुत शक्ती आणि सत्ता जाणवणे म्हणजेच प्रत्येक बाबतीत राम दिसण्याची सुरुवात होय. अश्या तऱ्हेने, सद्गुरुंच्या सत्तेने आमच्याकडून नामस्मरण होत जाते आणि तसे होता होता “दृष्टी रामरूप होण्याचा” त्यांचा स्वत:चा अनुभव देखील काही अंशाने का असेना आपल्यालाही येऊ लागतो! गुरु ओळखता येण्याची आणि गुरुची ओळख पटण्याची ही सुरुवात नाही का?