Aug21
Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Sunday, 21st August 2016
८. आपली वृत्ति सारखी बदलत आहे डॉ. श्रीनिवास कशाळीकरश्री. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात, “आपली वृत्ति सारखी बदलत आहे आणि जगही सारखे बदलत आहे. त्यामुळे अमुक परिस्थितीमुळे सुख आणि अमुक परिस्थितीमुळे दु:ख होते हे वाटणे खरे नव्हे. कारण ते सुखदु:ख अस्थिर असते.”
ह्या शिकवणीचे महत्व काय आहे?
आपल्याला प्रत्येक परिस्थिती ही त्या त्या वेळी कायमचीच आहे असे वाटते. त्याचप्रमाणे आपल्याला जे वाटते तेच १०० टक्के सत्य आहे असे आपल्याला वाटते. यामुळे सुख आणि दु:ख देणारी परिस्थिती आपल्या अपेक्षेच्या विपरीत बदलली की आपल्या मनाला जोरदार धक्के बसतात आणि मनाची घालमेल होते! त्यामुळे कायम आपल्या मनात एक प्रकारची हुरहूर राहते. आपल्याला, आहे त्यापेक्षा काही तरी भव्य-दिव्य आणि रोमांचक घडवावे किंवा घडावे असे वाटत असते आणि आपल्यां मनाप्रमाणे घडले नाही की आपल्याला वाईट वाटत असते. म्हणूनच समाधान मिळवण्यासाठी आपल्याला सद्गुरूंची शिकवण नीट समजून घ्यायला हवी.
आज आपल्याला जे जग दिसते ते क्षणोक्षणी बदलत असल्यामुळे आणि आपले शरीर आणि मन देखील बदलत असल्यामुळे आपले “वाटणे” देखील बदलत असते! त्याचप्रमाणे, आपल्याला जे काही बरे-वाईट वाटत असते, ते मुळात ईश्वरेच्छेने (म्हणजेच गुरुच्या इच्छेने) “वाटत” असते. तसेच, जगाला काय “वाटावे” हे देखील मुळात ईश्वरेच्छेनेच ठरत असते! आपण जे बरे-वाईट वागतो, ते ईश्वरेच्छेनेच वागतो आणि इतरांनी काय करावे, कसे करावे आणि केव्हा करावे हे देखील ईश्वरेच्छेनेच ठरत असते!
वास्तविक पाहता, आपण आणि जग; दोन्हीही आपल्या कल्पनेच्या पलिकडे, आपल्या मनाच्या वेगाहून अधिक वेगाने आणि आपल्या बुद्धीपेक्षा अधिक अचूकपणे; ईश्वरेच्छेने “सुधारत” असतात! आपण आणि आपल्या कल्पना स्थूल असल्यामुळे, आपल्याला ह्या सत्याचा म्हणजेच “राम कर्ता” ह्या सत्याचा विसर पडत असतो आणि आपण पुन्हा पुन्हा अस्वस्थ होत असतो! तडफडत असतो.
नामस्मरण करता करता हळूहळू, पण निश्चितपणे आणि अधिकाधिक स्पष्टपणे समजते की आपले आकलन, आपली मते, आपल्या कल्पना, आपली आवड आणि आपली बुद्धी ईश्वरेच्छेशी म्हणजेच सद्गुरुंच्या इच्छेशी जशी तद्रूप होत जाते तसे आपण अधिकाधिक स्वस्थ आणि समाधानी होत जातो!