Aug21
Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Sunday, 21st August 2016
१५. देहबुद्धी जोपर्यंत आहे तोपर्यंत नामाचे महत्व कळणार नाही: डॉ. श्रीनिवास कशाळीकरश्री. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात, “देहबुद्धी जोपर्यंत आहे तोपर्यंत नामाचे महत्व कळणार नाही. आपला उद्धार व्हावा असे वाटत असेल तर नामस्मरण सोडू नये”.
देहबुद्धी म्हणजे स्वत:ला देहापुरते मर्यादित मानणे. किंबहुना आपण केवळ मर्त्य आणि जड असे देहच आहोत, अन्य काही नाही अशी ठाम खात्री आणि धारणा असणे! देहबुद्धीमुळेआपल्या वासना, आपल्या भावना आपले विचार आपल्या देहाभोवती फिरत असतात. आपण आपल्या मूळ सच्चिदानंद स्वरूपापासून अवनत होतो, आकुंचन पावतो आणि संकुचित बनतो. हेच संकुचित स्वार्थाचे मूळ होय. ह्यामुळे आपला दृष्टीकोन मर्यादित बनतो, बुद्धी मंद आणि स्थूल बनते, भावना अप्पलपोटी बनते आणि आपल्या वासना असमंजस आणि बेफाम बनतात. यामुळे आपला अहंकार न गोंजारणारी आणि खऱ्या अर्थाने निस्वार्थ अशी कोणतीही बाब आपल्याला तुच्छ वाटते. तिरस्करणीय वाटते. नाम हे असेच आहे. त्यामुळे नामस्मरणाचा आपल्याला तिटकारा येतो. त्यामध्ये आपल्याला गोडी वाटत नाही. ह्यामुळेच आपण आपण नामस्मरणाला नावे ठेवतो. त्याला निरुपयोगी वा प्रगतीविरोधी म्हणतो. त्याला विरोध करतो. रोगी व्यक्तीच्या जिभेची चव गेल्यामुळे तिला जसे अन्न नकोसे होते, तसे हे आहे.
वेगळ्या भाषेत सांगायचे तर, देहबुद्धी असणे म्हणजे डबक्यात राहणे. ज्याप्रमाणे, डबक्यात बसून समुद्राची कल्पना येत नाही, त्याप्रमाणे देहबुद्धी जोपर्यंत आहे तोपर्यंत नामाचे महत्व काळात नाही.
याउलट नामस्मरणाची सुरुवात होणे हे प्रत्येकाच्या अंतरंगातील सुप्त उर्ध्वगामी ओढ प्रभावी होण्याचे म्हणजेच मर्यादित अशा देहाच्या ओढीचा प्रभाव कमी होण्याचे लक्षण आहे!
नामस्मरण जसे वाढत जाते तशी देहाची ओढ आणखी कमी होते आणि नामविस्मरणाच्या डबक्यातून आपण नामस्मरणाच्या समुद्रात येतो. स्वत:ची विशालता परत मिळाल्यामुळे, नामाची महानता अधिकाधिक समजू लागते!