Aug21
Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Sunday, 21st August 2016
१६. भवसागरातून तरुण जाण्यासाठी भगवंताचे नाम आहे डॉ. श्रीनिवास कशाळीकरश्री. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात, “मनुष्यप्राणी भवसागरात गटांगळ्या खातो आहे; समुद्रातून तरुन जाण्यासाठी जशी नाव, तसे भवसागरातून तरुण जाण्यासाठी भगवंताचे नाम आहे”.
भवसागर म्हणजे काय?
पूर्वी भवसागर ही एक कपोलकल्पित बाब वाटत असे. कुठला भवसागर आणि कसचं काय? असं वाटत असे. पण आपला देह आणि मन हे खरोखरच महासागराप्रमाणे अथांग आहेत! आपल्या देहातल्या आणि मनातल्या असंख्य गुंतागुंतीच्या आणि वेगाने घडणाऱ्या आणि भंडावून सोडणाऱ्या घडामोडी खरोखरच वादळाप्रमाणे आहेत. परस्परविरोधी वासना, भावना, विचार आणि त्यांमधला गोंधळ हे नाकातोंडात जाणाऱ्या पाण्याप्रमाणे आहेत. जीव गुदमरून टाकणाऱ्या आहेत. त्यामुळे मनुष्यप्राणी भवसागरात गटांगळ्या खातो आहे हे अक्षरश: खरे आहे.
भवसागरात गुदमरून बुडताना तरुन जाणे अत्यंत महत्वाचे असते. कारण त्याशिवाय आत्मज्ञानाचा प्राणवायू मिळू शकत नाही! आत्मज्ञान म्हणजेच भक्ती. आत्मज्ञान म्हणजेच शाश्वत समाधान. ह्यालाच गुरुभेट म्हणतात. प्राणवायूशिवाय प्राणी जसा तळमळतो, त्याचप्रमाणे आत्मज्ञान, भक्ती, शाश्वत समाधान म्हणजेच गुरुभेटीच्या अनुभवाशिवाय साधक तळमळतो.
म्हणून समुद्रातून तरुन जाण्यासाठी जशी नाव तसे भवसागरातून तरुन जाण्यासाठी भगवंताचे नाम आहे, हे देखील शब्दश: खरे आहे. कारण अश्या तऱ्हेने तरुनच साधकाला त्याची तळमळ शांत करणारा आत्मज्ञानाचा प्राणवायू मिळू शकतो. समुद्रातून बाहेर येताना माणूस नाव मागे सोडतो. पण भवसागरातून बाहेर येताना साधक मात्र नामरुपी नाव आपल्याबरोबरच घेतो. किंबहुना तो नाममयच होतो!
सर्व महान संतांनी आणि आपल्या सद्गुरुनी कोणतीही पूर्व अट न ठेवता नामस्मरणाची भक्कम नौका आपल्यासाठी खुली केली आहे! त्यामुळे, आपण कितीही पतित असलो तरी धास्तावून जाता कामा नये. आजूबाजूच्या आप्त- स्वकीयांनी कळत नकळत त्यांच्या देहबुद्धीपायी नामस्मरणाला नावे ठेवली, आपल्याला दुषणे दिली, आपला पाणउतारा केला, अडचणी दाखवून नाउमेद केले, ज्ञान व कर्मकांडाचा बाऊ करून भीती घातली; तरी आपल्या देहबुद्धीपायी आपण विचलित होता कामा नये. नाउमेद होता कामा नये. नामस्मरण सोडता कामा नये.
आपण कितीही दुबळे असलो, कितीही पतित असलो आणि वादळे कितीही भीषण आणि रौद्र असली तरी धीर सोडता नये! सद्गुरुकृपेने मिळालेली नामाची अतिभक्कम आणि सुरक्षित नौका; चिकाटीने नामस्मरण करीत कोणत्याही परिस्थितीत सोडता कामा नये! नामस्मरणाच्या ह्या नौकेतूनच आपण शाश्वत समाधानाच्या पैलतीराला नक्की पोचू!