Sep16
Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Friday, 16th September 2016
श्री विष्णुसहस्रनाम स्तोत्रातील वैश्विक चैतन्य: डॉ. श्रीनिवास कशाळीकर लेखांक ३. आपल्यातील जडत्वामुळे, आपण स्वत:च्या अजरामर आणि विशाल अशा कालातीत अस्तित्वाला विसरतो आणि पारखे होतो. हेच तमस, पाप, अज्ञान, अंधार, अवनती आणि अवदसा.
यामुळे आपण स्वत:ला केवळ देह समजू लागतो आणि देहरूप होतो. देहाशी निगडीत वासना, भावना, कल्पना, विचार, समजुती, श्रद्धा, संकेत इत्यादीमध्ये स्वत:ला जखडून घेतो. अशा प्रकारे स्वत:च्या मर्यादित, संकुचित आणि नश्वर अंशाला स्वत:चे पूर्ण आणि शाश्वत अस्तित्व मानणे म्हणजेच देहबुद्धी. आणखी स्पष्ट करायचे तर, असं म्हणता येईल, की शरीराच्या नखे, दात, केस इत्यादीपैकी एकाद्या छोट्या भागाला संपूर्ण शरीर समजणे ही जशी गफलत आहे, तशीच देहबुद्धी ही देखील एक फार मोठी गफलतआहे. तो एक भ्रम आहे. तसेच ती एक जबर अशी अंधश्रद्धा आहे.
देहबुद्धीमुळे आपण आपल्या सच्चिदानंद स्वरूपाला पारखे होऊन क्षुद्रत्वात अडकतो आणि आपले क्षुद्रत्व आपल्या जीवनांत आविष्कृत होत जाते. आपण हीन जीवन जगू लागतो. क्षुद्र वासना, भावना, विचार, कल्पना, दृष्टीकोन यांमुळे गुलाम बनतो वा बनवतो, त्रास भोगतो वा देतो, अगतीक बनतो वा बनवतो. साहजिकच असहाय्यता आणि हिंस्रपणा यांचा अघोरी हैदोस चालू होतो. आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक अशा जीवनाच्या सर्व क्षेत्रात हा हैदोस मग अक्राळविक्राळ रूप धारण करू लागतो. सारी मानवी मूल्ये नष्ट करणाऱ्या विनाशपर्वाचे भयानक व किळसवाणे लोण सर्वत्र व सतत पसरू लागते.
परंतु विष्णुसहस्रनामाच्या अभ्यासातून (नामस्मरणातून) हळूहळू आपल्याला आपल्या स्वरूपाची म्हणजेच सच्चिदानंदाची अनुभूती येऊ लागते. ही अनुभूती म्हणजे विश्वचैतन्याची उषाच! यथावकाश ह्या उष:कालाची परिणती वैश्विक आत्मज्ञानाच्या महासूर्योदयात होते. ह्या महासूर्योदयाचा प्रकाश म्हणजेच जीवनाच्या सर्व क्षेत्रातील मानवी मूल्यांचे विश्वकल्याणकारी पुनरुज्जीवन आणि पुनराविष्कार.