Sep16
Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Friday, 16th September 2016
श्री विष्णुसहस्रनाम स्तोत्रातील वैश्विक चैतन्य: डॉ. श्रीनिवास कशाळीकरलेखांक ५. हे पुस्तक वाचताना तुम्ही तुमच्या बुद्धीमध्ये (जी अगदी कुशाग्र असली तरीही मर्यादित असते) जखडून न राहता, सत्याच्या प्रचीतीची कास धरणे श्रेयस्कर ठरेल. कारण, खरा नास्तिक तो, जो स्वत:च्या संकुचित बुदधी, कल्पना, भावना, वासना यांचे सापेक्षत्व जाणून, त्यांना संपूर्ण सत्य मानीत नाही आणि त्यांना चिकटून राहत नाही आणि खरा आस्तिक तो, जो हे करतानाच केवळ चिरंतन सत्य अशा आत्मस्वरुपाला (नामाला) चिकटून राहतो तो! त्यामुळे असे सूज्ञच खरे आस्तिक आणि खरे नास्तिक असतात.
दुसरी बाब अशी की हे पुस्तक एकट्या लेखकाचे नाही. ज्याप्रमाणे स्वत:चे मातापिता, आनुवंशिकता, जन्मस्थान, कुटुंब, हे जसे व्यक्तीला ठरवता येत नाही, त्याचप्रमाणे तिचे स्वत:चे विचार, भावना, प्रतिभा; हे सारे देखील व्यक्तीला ठरवता येत नाही. ते सारे तिच्या कल्पनेपलिकडील सर्वान्तर्यामीच्या सच्चिदानंदातून स्फुरते आणि म्हणूनच ह्या ईश्वरी कृपेमध्ये सर्वांनी हक्काने सहभागी व्हायचे असते. एकाद्या कपातून गंगा प्राशनाचा योग आला तर ज्याप्रमाणे कप हा गंगेचा जनक नसतो, त्याचप्रमाणे हे आहे.
तिसरी बाब अशी की, लेखकामध्ये मर्यादा असू शकतात. दोष असू असू शकतात. पण कप फुटका असला तरी ज्याप्रमाणे आपण गंगेला दूषण देत नाही तसेच हे पुस्तक अभ्यासताना नकळत पूर्वग्रहदुषित न होता तुम्ही पुस्तकातील आशयाला दूषण देणार नाही अशी खात्री आहे.