वासना आणि नामस्मरण: डॉ. श्रीनिवास कशाळीकर
Posted by on Friday, 5th August 2016
वासना आणि नामस्मरण: डॉ. श्रीनिवास कशाळीकर
सद्गुरू ब्रह्मचैतन्य श्री. गोंदवलेकर म्हणतात, “आपले मन वासनेच्या आधीन होऊन तात्पुरत्या सुखाच्या मागे गेल्यामुळे थप्पड खाऊन परत येते”.
आपल्याला खरे तर शाश्वत आनंदाची, म्हणजेच परमेश्वराची, म्हणजेच सद्गुरूची, म्हणजेच नामाची, म्हणजेच आपल्या अंतरात्म्याची ओढ जाणवत असते.
पण तरीही; ती जाणवत असताना देखील आपले मन आपल्याला आवरत नाही! सतत नामस्मरण चालू असताना देखील; कधी वेदना, कधी छंद, कधी आवड, कधी इच्छा, कधी लळा, कधी करमणूक, कधी दया, कधी आकर्षण, कधी चीड, कधी लालसा, कधी जिव्हाळा, कधी ध्येय, कधी आदर्श, कधी भीती तर कधी इंद्रियजन्य सुखांची अनिवार ओढ; अश्या वेगवेगळ्या फसव्या रुपांत आणि निरनिराळ्या मायावी पद्धतींनी वासना आपल्या मनाला तिच्या कह्यात घेते आणि पुन्हा पुन्हा थप्पडा मारून लाचार आणि असहाय्य बनवते!
खरोखरच अश्या वेळी असे वाटते की ज्याला आपण आपले सर्वस्व समजतो, त्या आपल्या कल्पना, आपले विचार, आपले ध्येय, आपल्या आस्था; सद्गुरुआज्ञापालनात अडसर बनत आहेत! म्हणूनच ते सर्वच्या सर्व सद्गुरुचरणी समर्पित होऊन सद्गुरुंच्या इच्छेमध्ये विलीन व्हावे!
श्रीराम समर्थ!
Rate It
न्याय आणि नामस्मरण, ताजे आकलन: डॉ. श्रीनिवास
Posted by on Sunday, 31st July 2016
न्याय आणि नामस्मरण, ताजे आकलन: डॉ. श्रीनिवास कशाळीकर
कोणत्याही बाबीवरील आपली प्रतिक्रिया काय आणि का होते?
आत्मज्ञानाच्या पूर्ण अभावातून आपण त्या बाबीला वाईट आणि बरी, योग्य किंवा अयोग्य, न्याय्य किंवा अन्याय्य, उच्च किंवा नीच ही सर्व विशेषणे आपल्या मर्यादित बुद्धीनुसार आणि पूर्वग्रहानुसार लावतो आणि त्यानुसार निर्णय घेतो. त्यातून जी प्रतिक्रिया होते, ती आपल्याला आणि समाजाला आत्मज्ञानापासून दूर नेणारीच असते!
सत्ताकेंद्रांमधील व्यक्तींच्या अश्या प्रतिक्रियेतून घेतले जाणारे महत्वाचे निर्णय, कायदे, नियम, संकेत आणि विशेषत:न्यायदान यांच्यामुळे व्यक्ती आणि समाज मोठ्या प्रमाणात आत्मज्ञानापासून म्हणजेच आंतरिक एकात्मतेकडून परावृत्त होतात. ह्यामुळे समाजात मोठ्या प्रमाणात बेदिली वाढते. द्वेष वाढतो. वैर वाढते.
नामस्मरणाने आपण नामाच्या (सच्चिदानंदस्वरूप अंतरात्म्याच्या, ईश्वराच्या किंवा गुरुच्या) अधिकाधिक निकट जाऊ लागतो आणि ह्या कल्याणकारी प्रक्रियेमुळे प्रत्येक अणुरेणुच्या मागे आणि घटनेच्या मागे ईश्वरेच्छा आणि ईश्वरी सत्ता असते हे हळूहळू आपल्या लक्षात येते. हे लक्षात आल्यामुळे आणि येत असतांनाच; आपल्या मनात मानवी पूर्वग्रहविरहित व आत्मज्ञानाकाडे नेणारी, आणतारिक एकात्मता वाढवणारी आणि आंतरिक समाधान वाढवणारी प्रतिक्रिया उमटते आणि तशीच कृतीही घडते.
आपल्याकडून होणाऱ्या नामस्मरणामुळे आपल्या मनातील प्रतिक्रियांचे असे जे उत्थान होते त्याचा परिणाम इतरांच्या मनावर आणि कृतीवर देखील होतो आणि परिणामत: समाजातील एकी व बंधुता वाढू लागते.
अश्या तऱ्हेने; समाजात; आणि विशेषत: सर्व प्रकारच्या सत्ताकेंद्रांत जेवढे नामस्मरण वाढते, तेवढ्या अधिकाधिक प्रमाणात व्यक्ती आणि समाजामधील सर्व स्तरांवरील क्रिया आणि प्रतिक्रिया अधिकाधिक पूर्वग्रहरहित (न्यायपूर्ण) आणि म्हणून आत्मज्ञानाकडे नेणाऱ्या म्हणजेच शाश्वत समाधानाकडे नेणाऱ्या आणि खऱ्या अर्थाने कल्याणकारक होतात आणि व्यक्ती आणि समाजाचा सर्वांगीण विकास वेगाने होऊ लागतो.
Rate It
सहिष्णुता, ताजे आकलन: डॉ. श्रीनिवास कशाळीकर
Posted by on Sunday, 31st July 2016
सहिष्णुता, ताजे आकलन: डॉ. श्रीनिवास कशाळीकर
ढोबळ मानाने पाहता, सहिष्णुतेच्या प्रवासाच्या चार पायऱ्या असतात.
अंतर्बाह्य ईश्वर असताना त्याचा पूर्ण विसर पडणे (त्यामुळे त्याविषयी टिंगल टवाळीची भावना असणे) आणि त्यामुळे, अंतर्बाह्य पसरलेल्या वासनाविवशतेला विरोध तर नाहीच पण तिचे (हीन स्वार्थाचे) उद्दंड आणि बेभान समर्थन करणे ही सकृद्दर्शनी सहिष्णुता वाटली तरी ती सहिष्णुता नसून स्वत:च्या आणि इतरांच्या अंतरात्म्याशी केलेली घोर प्रतारणा असते. ही सहिष्णुतेच्या प्रवासाची पहिली पायरी.
वासना आणि ध्येय यांच्यात संघर्ष होऊन सारखी ओढाताण होणे अन वासनेमध्ये पुन्हा पुन्हा नाईलाजाने ओढले जाणे व वाहात जाणे व आपल्या आतल्या आणि बाह्य जगातील वासनेविषयी चीड येणे ही सकृद्दर्शनी असहिष्णुता वाटली तरी ती असहिष्णुता नसून, स्वत:च्या आणि इतरांच्या अंतरात्म्याशी सहिष्णू बनण्याची प्रामाणिक धडपड असते. ही सहिष्णुतेच्या प्रवासाची दुसरी पायरी.
नामाची निष्ठा भक्कम होता होता नामाच्या ओढीने अस्वस्थता,आतुरता व तळमळ निर्माण होणे आणि अंतर्बाह्य व्यापणाऱ्या वासनाचे आघात आणि पकड ढिली होउन अंतर्बाह्य पसरलेल्या वासनेचे पर्यवसान वेगळ्या वेगळ्या प्रकारांनी आणि वेगवेगळ्या काळानुसार पण निश्चीतपणे नामाच्या ओढीत आणि गोडीत होते ह्या अंतर्बाह्य परिवर्तनाची विजयी अनुभूती, शाश्वत समाधान आणि सार्थकता याची जाणीव ठळक होऊन; नामाचा आग्रह, हेका, हट्ट आणि वासनेचा तिरस्कार व तिटकारा हळु हळु निघून जाणे ही सहिष्णुतेच्या प्रवासाची तिसरी पायरी.
आणि याच्या पलीकडे सहिष्णुतेच्या प्रवासाची चवथी पायरी असते. ह्या शब्दातीत पायरीवर संत असतात. सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर म्हणतात, त्याप्रमाणे “संतांची वृत्ती राममयच असते, त्यांना सर्वत्र रामच दिसतो”!
ह्या सहिष्णुतेचे महत्व असे की ती केवळ शाब्दिक सहिष्णुता नसून प्रत्यक्ष विश्वकल्याण साधणारी संजीवक अमृतौषधी असते!
Rate It
राम कर्ता, ताजे आकलन: डॉ. श्रीनिवास कशाळीकर
Posted by on Sunday, 31st July 2016
राम कर्ता, ताजे आकलन: डॉ. श्रीनिवास कशाळीकर
सद्गुरू ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज म्हणतात, “राम कर्ता म्हणेल तो सुखी, मी कर्ता म्हणेल तो दु:खी”.
या विश्वामध्ये आपण सर्वजण (मानव, प्राणी, वनस्पती, इतर सजीव आणि निर्जीव), विशिष्ट ऊर्जा, क्षमता, गुण आणि सृजनशीलता यानी परिपूर्ण असतो. पण आपल्याला याची यथार्थ जाणीव, कल्पना नसते.
एका टप्प्यावर आपल्यामध्ये वासना, भावना, विचार आणि दृष्टिकोन; प्रगट होऊ लागतात. अशा तऱ्हेने आपण वेगळे कुणीतरी असल्याचा भास आपल्याला होऊ लागतो. म्हणजेच आपल्यातला भ्रामक "मी" जागृत होतो; आणि आपण; वस्तू, पैसा, जोडीदार, घर, नोकरी; किंवा सत्ता, समाजकार्य, लोकसेवा वगैरे मध्ये गुंतून जातो. हे सर्व आपल्या अंतर्मनात आणि जागृत मनामध्ये चालू असते. अश्या तऱ्हेने आपल्या हातून बर्यार वाईट गोष्टी घडत जातात आणि त्यातून येणार्याय सुख दु:खातून आणि यश-अपयशातून आपले आणि संपूर्ण विश्वाचे स्वरूप घडत आणि बिघडत जाते!
अश्या तऱ्हेच्या भ्रामक मी पणातून आपण “मी कर्ता” असे म्हणतो आणि पराधीनतेतील संकुचित सुख-दु:खात सडत राहतो. ह्यालाच सद्गुरू, “मी कर्ता म्हणेल तो दु:खी” म्हणतात.
सद्गुरू म्हणजेच नाम आणि राम. तो काळ, अवकाश आणि आपल्या सर्व जाणीवांच्या अतीत आहे. त्याच्याच कृपेने आपल्याला नामाची संजीवनी प्राप्त होते आणि तोच आपले संकुचित शहाणपण, क्षुद्र गर्व, अनाठायी हट्ट, अवाजवी आग्रह आणि हीन अहंकार गळून पडू लागतात. त्याच्याच कृपेने “मी कर्ता” ह्या भ्रमातून घट्ट धरलेली इतर सर्व ध्येये बाजूला पडत जातात आणि त्याचीच म्हणजेच नामाचीच ओढ आणि गोडी वाढत जाते. त्याच्याच कृपेने तो म्हणजेच नाम आपल्या सर्वाच्या अन्तर्यामी असल्याचे कळू लागते आणि नामाच्या सच्चिदानंद स्वरूपाची आणि अमृतमयी सान्निध्याची प्रचीती येऊ लागते. जीवन कृतज्ञता आणि सार्थकता यानी भरून जाते.
ह्यालाच सद्गुरू, “राम कर्ता म्हणेल तो सुखी” असे म्हणतात.
Rate It
न्याय आणि नामस्मरण: डॉ. श्रीनिवास कशाळीकर
Posted by on Wednesday, 27th July 2016
न्याय आणि नामस्मरण: डॉ. श्रीनिवास कशाळीकर
कोणतीही बाब पाहिल्यानंतर किंवा ऐकल्यानंतर आपली प्रतिक्रिया काय आणि का होते? वाईट आणि बरी, योग्य किंवा अयोग्य, न्याय्य किंवा अन्याय्य, उच्च किंवा नीच ही सर्व विशेषणे आपण आपापल्या मर्यादित बुद्धीनुसार आणि पूर्वग्रहानुसार लावतो आणि त्यानुसार आपली मानसिक प्रतिक्रिया होते आणि आपल्या हातून कृती घडते.
पण अश्या प्रतिक्रियेमुळे महत्वाचे निर्णय, कायदे, नियम, संकेत आणि विशेषत:न्यायदान संकुचित आणि घातक बनतात.. ह्यामुळे समाजात बेदिली वाढते. द्वेष वाढतो. वैर वाढते. परिणामात: व्यक्ती आणि समाजाचा सर्वांगीण विकास रखडतो.
नामस्मरणाने आपण नामाच्या (सच्चिदानंदस्वरूप अंतरात्म्याच्या, ईश्वराच्या किंवा गुरुच्या) अधिकाधिक निकट जाऊ लागतो आणि ह्या कल्याणकारी प्रक्रियेमुळे हळूहळू आपल्या लक्षात येते की, प्रत्येक अणुरेणुच्या मागे आणि घटनेमागे ईश्वरेच्छा आणि ईश्वरी सत्ता असते. हे लक्षात आल्यामुळे आणि येत असतांनाच; आपल्या मनात ईश्वरी (मानवी पूर्वग्रहविरहित) इच्छेने आंतरिक समाधान वाढवणारी प्रतिक्रिया उमटते आणि आपल्याकडून समाधान वाढवणारी पूर्वग्रहविरहित आणि कल्याणकारी कृती घडते..
आपल्या नामस्मरणामुळे इतरांच्या मनामध्ये देखील ह्या प्रक्रिया घडतात आणि परिणामत: समाजाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते.
समाजात; आणि विशेषत: सर्व प्रकारच्या सत्ताकेंद्रांत जेवढे नामस्मरण वाढेल, तेवढ्या अधिकाधिक प्रमाणात समाजामधील सर्व स्तरांवरील क्रिया आणि प्रतिक्रिया अधिकाधिक पूर्वग्रहरहित (न्यायपूर्ण) आणि म्हणून कल्याणकारक होतात आणि व्यक्ती आणि समाजाचा सर्वांगीण विकास वेगाने होऊ लागतो.
Rate It