षड्रिपु आणि नामस्मरण डॉ. श्रीनिवास कशाळीक
Posted by on Wednesday, 20th July 2016
षड्रिपु आणि नामस्मरण डॉ. श्रीनिवास कशाळीकर
षड्रिपु म्हणजे काम, क्रोध, लोभ, मद, मोह आणि मत्सर. षड्रिपू असण्याचे कारण म्हणजे; मेंदू आणि शरीरातील इतर भागात स्त्रवणारे वेगवेगळे अंतस्त्राव, ज्यांना अनुक्रमे न्युरोट्रान्समीटर्स आणि होर्मोंस म्हणतात. शरीरक्रियाशास्त्रीय दृष्ट्या पाहिल्यास सर्वसामान्यपणे; अंतस्त्राव अजिबात नसणे शक्य नसल्यामुळे, षड्रिपु अजिबात नसणे शक्य नाही. त्यामुळे षड्रिपु त्याज्य आहेत असे कितीही कंठरवाने स्वत:ला आणि इतरांना ठासून सांगितले आणि समजावले आणि कितीही आटापिटा केला तरी आपण कुणीही त्यांपासून पूर्णपणे मुक्त होऊ शकत नाही! तसा दावा कुणी केला तर तो केविलवाणा वेडेपणा असतो!
त्याचप्रमाणे, आपण आयुष्यभर जरी त्यांच्या मागे फरफटत गेलो, तरी तृप्त आणि समाधानी होऊ शकत नाही! कारण षड्रिपुंची पूर्ती ही फडफडणाऱ्या विस्तवाप्रमाणे असते! फडफडणारी आग जशी अन्न शिजवू शकत नाही, त्याप्रमाणे षड्रिपुंच्या पूर्तीची धग अंतर्मनापर्यंत आणि अंतरात्म्यापर्यंत पोचू शकत नाही आणि समाधानाचे अन्न शिजवू शकत नाही! म्हणूनच वासनापुर्तीने आपले समाधान झाले असा दावा कुणी केला तर तो देखील केविलवाणा भंपकपणा असतो!
ज्याप्रमाणे चुलीमुळे आग नियंत्रित होते आणि तिची धग भांड्याला नीटपणे लागून अन्न वेळेमध्ये शिजते, त्याचप्रमाणे जीवनातील सर्व भोगांची आणि उपभोगांची धग नामस्मरणरुपी चुलीमुळे अंतरात्म्याकडे पोचते आणि अंतरात्म्यामध्ये समाधानरुपी अन्न शिजू लागते. साहजिकच आपले, आपल्या कुटुंबियांचे आणि समाजाचे समाधान होऊ लागते! ज्याप्रमाणे चुली आणि त्यांच्यातील आग कमी जास्त असते, त्याचप्रमाणे नामसाधकांच्या प्रगतीचे टप्पे देखील वेगवेगळे असतात. पण नामस्मरणाने समाधानाकडे वाटचाल होऊ लागते; हे केवळ सद्गुरू ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराजांच्याच नव्हे तर सर्वच संत महात्म्यांच्या शिकवणीचे त्रिवार सत्य असे सार आहे.
Rate It
प्रेम आणिनामस्मरण डॉ.श्रीनिवास कशाळीकर
Posted by on Sunday, 17th July 2016
प्रेम आणि नामस्मरण डॉ.श्रीनिवास कशाळीकर
निर्भेळ, शुद्ध, सर्वव्यापी, कालातीत आणि अजरामर प्रेम कोणत्याही बाह्य लक्षणावरून निश्चित करता येत नाही. उदा. पत्रापत्री, फोनाफोनी, एसएमएस, भेटीगाठी, दंडवत, नमस्कार, मानसन्मान, गळाभेटी, आलिंगन, आहेर, देणगी, बक्षीस, गिफ्ट, प्रेझेंट, सेवा, आश्वासने, मधुर भाषण, स्तुती, ओढ, हास्य, अश्रू, लाड करणे, गोंजारणे, इत्यादी! ही लक्षणे; वरवरची, दिखाऊ, भ्रामक, आणि फसवी असू शकतात.
संकुचित स्वार्थरहित, पूर्वग्रहरहित, भेदभावरहित, भितीरहित, दबावरहित, द्वेषरहित, पूर्वअटरहित; विचार, भावना आणि व्यवहार; म्हणजे मूर्तिमंत निर्भेळ प्रेम, शुद्ध प्रेम! असे प्रेम सर्वव्यापी, कालातीत आणि अजरामर असते. पण; वरील सर्व शब्दांपलीकडील आणि अनिर्वचनीय असे प्रेम; केवळ सद्गुरूचे असते आणि ते चिरंतन अर्थात अजरामर असते.
ह्या अमृताचा अगदी अंशत: अनुभव देखील जीवन झळाळून टाकणारा असतो आणि तो येण्यासाठी चित्तशुद्धी होत राहण्याची आवश्यकता असते. ही चित्तशुद्धी नामस्मरणाद्वारे होत जाते आणि ती चित्तशुद्धी देखील कोणत्याही बाह्य लक्षणाने ओळखता येत नाही आणि दाखविता येत नाही!
Rate It
महत्व नामसंकल्पाचे: डॉ. श्रीनिवास कशाळीकर
Posted by on Friday, 15th July 2016
महत्व नामसंकल्पाचे: डॉ. श्रीनिवास कशाळीकर
नामस्मरण करणे ही प्रवाहाविरुद्ध पोहण्याची क्रिया आहे. मनाच्या मुळाशी जाण्याची प्रक्रिया आहे. त्यामुळे आपल्या अंतर्मनातील कितीतरी विचार, भावना, वासना; या प्रक्रियेबद्दल संशय आणि कंटाळा उत्पन्न करतात. त्यामुळे आस्था आणि ओढ कमी होते आणि आपले नामस्मरण नकळत कमी कमी कमी होत जाते. पुष्कळदा हे आपल्या ध्यानातही येत नाही. इतर बाबी मनासारख्या झाल्या किंवा न झाल्या तरीही त्या समाधान देऊ शकत नसल्यामुळे मनामध्ये पोकळी तयार होते आणि खिन्नता पुष्कळदा फारच वाढते.
अश्यावेळी सदगुरूच आपल्यासाठी "नामसंकल्प" हा रामबाण उपाय; या ना त्या माध्यमातून उपलब्ध करतात. नामसंकल्पामुळे रोजच्या जीवनाला एक हेतू मिळतो आणि नामस्मरणाच्या क्रियेला एक प्रकारचा नेमकेपणा, आखीवपणा, निश्चितपणा आणि आकर्षकपणा येतो. त्याबद्दल नकळत बांधिलकी तयार होते. नामस्मरण पुन्हा रुळावर आले की मनातली पोकळी गुरूंच्या आठवणीने, गुरुवरील भक्तीने आणि तज्जन्य उत्साहाने भरून जाते आणि खिन्नता पार निघून जाते.
नामसंकल्पयुक्त नामस्मरणाचे चैतन्याधिष्ठान आणि सद्गुरुंची गोड ओढ यानी रटाळ क्षण उत्साहवर्धक बनतो, कंटाळवाणा दिवस सण बनतो आणि निरर्थक आयुष्य कृतार्थ बनते! कुणीही हे करून पाहिले तर याचा अनुभव येऊ शकेल.
Rate It
नामस्मरण आणि पायाभूत सुविधा डॉ. श्रीनिवास
Posted by on Friday, 15th July 2016
नामस्मरण आणि पायाभूत सुविधा डॉ. श्रीनिवास कशाळीकर
रस्ते, पूल, रेल्वे, वीज, दूरध्वनी, दूरदर्शन, इंटरनेट इत्यादी सुविधा ह्या आर्थिक पायाभूत सुविधा आहेत. एकंदर विकासात त्यांना महत्वाचे स्थान आहेच. त्यामुळे त्या अत्यावश्यक आहेत.
पण सर्वांगीण आरोग्यच नसेल तर ह्या सुविधांना अर्थ उरत नाही. त्या निरुपयोगी ठरतात. किंबहुना घातक देखील ठरू शकतात (कारण त्यांचा उपयोग रोग वाढण्यासाठी आणि पसरण्यासाठी होतो). त्यामुळे सर्वांगीण (सम्यक) आरोग्य जोपासणाऱ्या; सम्यक शिक्षण संस्था आणि सम्यक आरोग्य संस्था (सामाजिक पायाभूत सुविधा) अधिक अत्यावश्यक आहेत.
पण सुयोग्य आर्थिक आणि सामाजिक सुविधा निर्माण करण्यासाठी सम्यक दृष्टीकोन आणि त्या अनुरोधाने कार्य करणारी माणसे घडवणारी अशी पायाभूत सुविधा अत्याधिक अत्यावश्यक आहे! अश्या सुविधेच्या अभावी आर्थिक आणि सामाजिक पायाभूत सुविधांची दिशा आणि दशा चुकते आणि दुरवस्था अन्य विविध मार्गांनी समाजात शिरकाव करते आणि समाज उध्वस्त करते. जगातील अनेक अप्रगत आणि तथाकथित प्रगत देशात देखील आज हे घडत आहे. अशी काही पायाभूत सुविधा आहे का?
होय! अशी एक पायाभूत सुविधा आहे! पूर्णपणे बिनखर्चाची, कुणाचेही अंत:करण आणि आणि अस्मिता न दुखावणारी आणि सर्वांनाच सहज शक्य अशी ही सुविधा आहे. ह्या सुविधेद्वारे सद्विचार, सद्भावना, सद्वासना, सत्संकल्प आणि विश्वकल्याणकारी आणि सतत विकसित होणारी सत्कार्ये अविरतपणे घडू लागतात. प्रत्येक व्यक्ती समाधानी आणि कृतार्थ होऊ लागते. अशी अत्याधिक अत्यावश्यक पायाभूत सुविधा म्हणजे नामस्मरण!
Rate It
नामस्मरण आणि प्राधान्यक्रम डॉ. श्रीनिवास
Posted by on Thursday, 14th July 2016
नामस्मरण आणि प्राधान्यक्रम डॉ. श्रीनिवास कशाळीकर
आजच्या धकाधकीच्या काळात आपला प्राधान्यक्रम अचूकपणे ठरवणे हे यशस्वी जीवनासाठी अत्यंत आवश्यक आहे. आपण कोणत्याही क्षेत्रात काम करीत असलो तरी आपले यश आपल्या प्राधान्यक्रमावर अवलंबून असते. त्यामुळेच वेळ, पैसा आणि शक्ती यांचे योग्य व्यवस्थापन शक्य होते.
प्राधान्यक्रम अचूक असला की; आपला वेळ आपल्या (आणि म्हणूनच इतरांच्याही) अंतरात्म्याला विविध प्रकारे समाधान देण्यामध्ये व्यस्त होतो आणि सर्वांगीण यशाची शिखरे सर होतात.
काहीजणांना ह्याची जाण पूर्वपुण्याईमुळे उपजतच असते. त्यामुळे, महान खेळाडू, संगीतकार, साहित्यिक, चित्रकार, अभिनिते, व्यावसायिक, उद्योजक, शास्त्रज्ञ, तत्वज्ञ, राजकारणी, रणझुंजार आणि विशेषत: योगी-संत-महात्मे इत्यादींचा प्राधान्यक्रम लहानपणापासून ठरलेला असतो. त्यामुळे लहानपणापासूनच त्यांचा बहुतेक वेळ (थिल्लर बाबींमध्ये वाया ना जाता) त्यांच्या क्षेत्रातील साधनेत म्हणजेच सत्कारणी लागतो.
याउलट, आपल्यासारख्यांना प्राधान्यक्रम अचूकपणे ठरवण्याची पुरेशी क्षमता उपजत नसते. सद्बुद्धी (सद्विचार, सत्प्रेरणा, सद्भावना, सद्वासना आणि सत्संकल्प), सदिच्छा, सत्शक्ती यांची आपल्यामध्ये उणीव असते. त्यामुळे आपला प्राधान्यक्रम चुकतो. साहजिकच, आपल्या आयुष्यातला बराच वेळ (सत्कार्यात न जाता) थिल्लरपणात किंवा चुकीचे निर्णय घेतल्यामुळे नको त्या उलाढाली करण्यात वाया जातो आणि आपण सारखे पस्तावत राहतो.
नामस्मरणाने चित्तशुद्धी होते. म्हणजेच, सद्बुद्धी (सद्विचार, सत्प्रेरणा, सद्भावना, सद्वासना आणि सत्संकल्प), सदिच्छा आणि सत्शक्ती वाढीस लागतात. यामुळे प्राधान्यक्रम अचूकपणे ठरवण्याची आणि आयुष्यातला बहुमूल्य वेळ योग्य ठिकाणी आणि योग्य प्रकारे सत्कारणी लावण्याची म्हणजेच, सत्कर्म करण्याची सर्वांगीण क्षमता वाढीस लागते आणि जीवन यशस्वी होण्याचा मार्ग प्रशस्त होतो!
“नाम घेणाऱ्याला सत्कर्म टाळू म्हणता टाळता येत नाही” असे जेव्हां सद्गुरू श्री. ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर म्हणतात, तेव्हां त्यांमध्ये वरील सर्वकाही अंतर्भूत आहे, म्हणजेच वेळ, पैसा आणि शक्ती यांचे (अर्थात आयुष्याचे) सर्वोत्तम व्यवस्थापन अनुस्यूत आहे!
Rate It