नाम मुरणे म्हणजे काय: डॉ. श्रीनिवास कशाळीकर
Posted by on Tuesday, 5th July 2016
नाम मुरणे म्हणजे काय: डॉ. श्रीनिवास कशाळीकर
विद्यार्थी: सद्गुरू ब्रह्मचैतन्य श्री. गोंदवलेकर महाराज म्हणतात, “नाम खोल गेले पाहिजे, नाम मुरले पाहिजे”! ह्या त्यांच्या सांगण्याचा नेमका अर्थ काय?
शिक्षक: आपल्याला वेदना झाली की आपण ओरडतो. दुर्गंध आला की नाक मुरडतो. खाताना खडा लागला की वैतागतो. घरातले कुणी आजारी असले की आपण हवालदिल होतो. बस आली नाही की अस्वस्थ होतो. आर्थिक नुकसानीने खचतो. कुणी पाणउतारा केला की आपण खवळतो किंवा खिन्न होतो. सामाजिक अवहेलना, आजार आणि मृत्युच्या भीतीने तर आपले हृदय धडधडू लागते! याउलट क्षुल्लक यशाने किंवा आर्थिक फायद्याने किंवा फायद्याच्या आमिषाने देखील आपण एकदम हुरळून जातो!
ह्या क्रिया क्षणार्धात घडतात! नामस्मरणाच्या सुरुवातीच्या काळात त्या टाळता येत नाहीत. एवढेच नव्हे तर, त्याबद्दल आपल्याला फारसे काही वाटत देखील नाही! उलट आपण “ह्या बाबी नैसर्गिक आहेत” असे म्हणून स्वत:चे समर्थन करण्याचा प्रयत्न करतो.
पुढे पुढे; अश्या क्रिया घडल्यानंतर खेद होतो. आपण चुकल्याची लाज वाटते! नामस्मरण वाढले पाहिजे यांची तीव्र जाणीव होते!
पण, नाम अधिक खोल गेले किंवा मुरले, तर अश्या क्रिया घडणायापुर्वी आपल्या मनात नामस्मरण येते, राम कर्ता ही भावना येते आणि त्या क्रियांचा परिणाम पूर्वीसारखा तीव्र राहत नाही!
नाम खोल जाण्याच्या व मुरण्याच्या प्रक्रियेतली ही एक पायरी समजायला हरकत नाही!
श्रीराम समर्थ!
Rate It
आमचे नामस्मरण: डॉ. श्रीनिवास कशाळीकर
Posted by on Thursday, 30th June 2016
आमचे नामस्मरण: डॉ. श्रीनिवास कशाळीकर
सद्गुरू श्री. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात, "आंधळ्याने पाणी भरावे तसे नाम घ्यावे. भांडे भरले किती आणि रिकामे किती, हे त्याला समजत नाही. तो भरतच राहतो. तसे नाम सतत घेत राहावे. देहाच्या कणाकणातून नामाचा ध्वनी केव्हाही यावा इतके नाम घ्यावे. सुरुवातीला रामनाम असे मुरले की पुन्हा जास्त लक्ष द्यावे लागत नाही. आपोआप देहाचे सारे कण नामजप करतात."
हे सांगणे किती पराकोटीचे सत्य आहे याची सहज कल्पना येत नाही. नीट विचार केला तर लक्षात येते की; आमच्या सद्गुरुंचाच अनुग्रह आम्हाला का आणि कसा मिळाला, विशिष्ट देशातच आणि विशिष्ट आई-वडिलांच्या पोटीच आमचा जन्म का आणि कसा झाला, विशिष्ट व्यक्तीच आमच्या कुटुंबीय का आणि कश्या झाल्या; यातले काहीच आम्हाला कळत नाही! भिंतीच्या पलिकडे काय चाललेय हे कळत नाही! समोरच्या व्यक्तीच्या मनातले कळत नाही! एवढे कशाला, आमच्या स्वत:च्या शरीराच्या आणि मनाच्या कोनाकोपऱ्यात केव्हां केव्हां, काय काय घडले आणि का घडले, आता काय आणि का चाललेय आणि पुढच्या क्षणी काय होणार आणि का होणार हे देखील आम्हाला कळत नाही! मग आम्ही “आंधळे”च नव्हे काय?
आता आमच्याकडून घडणाऱ्या नामस्मरणाचा विचार करू! आपल्या नामस्मरणामध्ये; क्षणोक्षणी; इतर विचार, इच्छा, आशा, निराशा, मत्सर, द्वेष, राग, लोभ, चिंता, तिरस्कार, काळजी, खिन्नता इत्यादी कोणत्या भावना, किती तीव्रपणे उत्पन्न होतात, कोणत्या वासना, कोणत्या थरातून उद्भवतात, हे आम्हाला कळू शकते का? नाही! आमची जपसंख्या मोजताना आणि नोंदताना आम्ही हे सारे लक्षात घेऊ शकतो का? नाही! मग आम्ही “आंधळे”च नव्हे काय?
म्हणूनच सद्गुरूंची शिकवण आचरणात आणण्याचा जीवापाड प्रयत्न आम्ही नको का करायला?
श्रीराम समर्थ!
Rate It
कैफियत पत्रकारांची: डॉ. श्रीनिवास कशाळीकर
Posted by on Wednesday, 29th June 2016
कैफियत पत्रकारांची: डॉ. श्रीनिवास कशाळीकर
आम्ही माध्यमातील मंडळींनी, काळाची दिशा ओळखायला शिकले पाहिजे. जे जे घडताना दिसते, भासते आणि गोंधळात टाकते, खिन्न करते, उद्विग्न करते, भडकवते, उद्दीपित करते किंवा भ्रष्ट करते त्याच्या पलिकडे सर्वांना एकत्र आणणारे आणि प्रगल्भ बनवणारे सत्य असते. ते बघायला शिकले पाहिजे हे खरे.
पण आम्ही देखील समाजातले गुन्हे आणि अपराध यांनी विचलित होऊ शकतो, वा घाबरु शकतो हे अगदी खरे आहे! कुत्सितपणा, निराशा, संकुचित स्वार्थ यांनी आम्ही देखील बहकू शकतो आणि राजकीय दबाव, प्रलोभने, भपका आणि झगमगाट याना वश होऊ शकतो हे अगदी खरे आहे! यामुळे आमचे आकलन सदोष बनून आम्ही; स्वत:सकट इतरांना देखील त्या आकलनाचे बळी बनवू शकतो!
पण या कोंडीतून बाहेर कसे पडायचे? ही घुसमट आणि ही तडफड कशी थांबवायची यावर उपाय शोधला तरी सापडत नव्हता!
परंतु यादरम्यान सद्गुरू ब्रह्मचैतन्य श्री. गोंदवलेकर महाराजांचे प्रा. के. वि. बेलसरे यांनी लिहिलेले चरित्र वाचनात आले. त्यामध्ये सबजज्ज फडके यांच्याबरोबर झालेल्या संवादामधून सुधारणा आणि संस्कृती म्हणजे काय याचे थोडेफार आकलन झाले आणि डोळ्यात जणू काही अंजनच पडले! नामस्मरणाने सद्बुद्धी, सद्भावना, सद्वासना आणि सत्कार्य घडते आणि शाश्वत समाधानाचा मार्ग मिळतो हे पक्के ध्यानात आले!
आम्ही सर्वच माध्यमवाल्यांनी नामस्मरणाचा अत्यंत आस्थेने अभ्यास, अगत्यपूर्वक अंगिकार आणि जीव तोडून प्रसार केला पाहिजे ह्याची खोलवर आणि तीव्र जाणीव झाली आणि त्यातच आमचे आणि सर्वांचे भले आहे ह्याबद्दल खात्री झाली!!
श्रीराम समर्थ!
Rate It
हे कृपाळू दयासिंधु!: डॉ. श्रीनिवास कशाळीकर
Posted by on Tuesday, 28th June 2016
हे कृपाळू दयासिंधु!: डॉ. श्रीनिवास कशाळीकर
हे परमकृपाळू दयासिंधु सद्गुरू!
प्रारब्धजन्य नामविस्मरणाच्या अंधारमय ग्लानिमुळे माझ्या ह्या देहाकडून, मनाकडून आणि बुद्धीकडून जेवढे अपराध आणि प्रमाद घडले असतील किंवा घडू शकले असते, ते माझे संभवत: टीकाकार, निंदक आणि अगदी माझे वैरी देखील जाणू शकत नाहीत! एवढेच कशाला मला स्वत:ला देखील त्यांची नीट माहिती नाही! कारण हा देह, त्यातील घडामोडी;आणि त्याच्या संवेदना, वासना, उर्मि, इच्छा, कल्पना, विचार, दृष्टी, क्षमता, कृती, इत्यादी सर्वकाही इतक्या प्रचंड वेगाने बदलत आहे की ते सर्व जाणणे अशक्यप्राय आहे!
पण टीचभर आयुष्यातल्या ह्या साऱ्या चक्रावून टाकणाऱ्या क्षणभंगुर धुळीच्या वादळामध्ये तुमची परम कृपा मात्र प्राणवायूप्रमाणे चिरंतन, चैतन्यमय, स्फूर्तिदायी आणि शाश्वत समाधान देणारी आहे! नामस्मरणाच्या आणि तज्जन्य सद्बुद्धीच्या, सद्भावनांच्या, सद्वासनांच्या, सत्संकल्पांच्या आणि सत्कर्माच्या रूपाने ती माझ्यासारख्या सर्वांना उपलब्ध झाली आहे!
श्रीराम समर्थ!
Rate It
साक्षात्कार: डॉ. श्रीनिवास कशाळीकर
Posted by on Sunday, 26th June 2016
साक्षात्कार: डॉ. श्रीनिवास कशाळीकर
सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात, “मी तुमचा सांगाती आहे, सावलीसारखा तुमच्याबरोबर आहे, वाटेतील अडचणी येऊन जातील, त्या कळणार सुध्दा नाहीत.” महाराज म्हणतात, “जेथे नाम तेथे माझे प्राण ही सांभाळावी खूण”!
पण आम्हाला तर नेहमी साथ-संगत लागते. समूह लागतो. एकटेपणाचा विचार देखील नकोसा वाटतो! आजारपण, अडचणी आणि मृत्त्यूच्या विचाराने तर अंगावर काटाच येतो!
याचे कारण काय?
कारण अगदी सरळ आणि सोपे आहे! सद्गुरूंचे सांगणे अजून आम्हाला कळले नाही आणि वळले नाही! समजले नाही आणि उमजले नाही! त्यामुळे ते आहेत असे आम्हाला अगदी मनापासून वाटतच नाही!
सतत नामस्मरण घडू लागले, गुरुची सत्ता पदोपदी जाणवू लागली, गुरुचे क्षणोक्षणी सानिध्य जाणवू लागले, जगण्याची उमेद वाढली, आजारपणाची आणि मृत्त्युची भीती गेली; आणि विशेष म्हणजे; ह्यापेक्षा वेगळे ध्येय गाठण्याची व त्यासाठी अधिक काही करण्याची उर्मी गेली तर तोच साक्षात्कार नाही का?
श्रीराम समर्थ!
Rate It