नाम घेणाऱ्याचे राम कल्याण करतो डॉ. श्रीनिव
Posted by on Monday, 20th June 2016
नाम घेणाऱ्याचे राम कल्याण करतो डॉ. श्रीनिवास कशाळीकर
सद्गुरू ब्रह्मचैतन्य श्री. गोंदवलेकर महाराज म्हणतात, "वाटेल ते झाले तरी भगवंताचे नाम सोडू नका, नाम घेणाऱ्याचे राम कल्याण करतो हे माझे सांगणे शेवटपर्यंत विसरू नका."
वाटेल ते झाले तरी भगवंताचे नाम सोडू नका असे; सद्गुरू का म्हणतात?
कारण नामस्मरण चालू असले तरी, आपले शरीर, मन आणि परिस्थिती सतत आणि वेगाने बदलत असते. आपल्याला काय होते आहे आणि काय हवे आहे हे कळत नाही! एवढेच नव्हे तर आपल्याला काही कळत नाही हे देखील कळत नाही! बदल नको म्हणून नाहीसा होत नाही आणि बदल हवा म्हणून हवा तो बदल घडतोच असे नाही! बरं हवा तो बदल घडला, तरी पुन्हा तो नकोसा होतो आणि पुन्हा आपण अस्वस्थ ते अस्वस्थच राहतो! अश्या वेळी “संकुचित स्वार्थ न जपणारे नामच” प्रथम सुटण्याचा आणि विस्मरणाच्या गर्तेत जाणाचा संभव असतो! अश्या वेळी आपल्याला गर्तेतून बाहेर काढण्यासाठी दिलेला कृपाळू हात म्हणजे सद्गुरूंचे हे सांगणे आहे!
“नाम घेणाऱ्याचे राम कल्याण करतो” म्हणजे काय?
कल्याण याचा अर्थ; संकुचित आणि भ्रामक अस्वस्थतेतून उदात्त आणि शाश्वत स्वस्थतेकडे, समाधानाकडे जाणे आणि अश्या शाश्वत स्वस्थतेला पूरक असे कार्य; जीवनाच्या ज्या क्षेत्रात (शिक्षण, आरोग्य, राजकारण, संरक्षण, समाजकारण, व्यापार, उद्योग, चित्रकला, संगीत, नाटक, सिनेमा इत्यादी) आपण वावरत असू त्या क्षेत्रात आपल्याकडून घडणे!
श्रीराम समर्थ!
Rate It
देवाची (खरी) कृपा डॉ. श्रीनिवास कशाळीकर
Posted by on Sunday, 19th June 2016
देवाची (खरी) कृपा डॉ. श्रीनिवास कशाळीकर
सद्गुरू ब्रह्मचैतन्य श्री. गोंदवलेकर महाराज म्हणतात “देवाची ज्याच्यावर कृपा आहे त्याला तो पोटापुरता पैसा देतो, पण ज्याची परीक्षा पाहायची त्याला भगवंत जास्त पैसा देतो”.
आम्हाला तर याच्या उलट वाटत असते! गडगंज पैसा म्हणजे देवाची कृपा असेच आम्हाला वाटत असते! हो की नाही?
मग खरं काय? सद्गुरू की आपण?
उत्तर सोपं आहे!
आपल्या मर्यादित, अपरिपक्व आणि पक्षपाती मनाचा भ्रम म्हणजे जास्त (अमर्याद) पैशांनी आपण सर्वोच्च सुख मिळवू शकतो! अर्थात आपल्या दृष्टीने तीच देवाची कृपा!
पण सद्गुरूंच्या अनंत, परिपक्व आणि नि:पक्षपाती सर्वज्ञतेचा अभिप्राय असा की “जास्त पैसा” मिळाला की आपण भरकटू शकतो! आपल्या आकांक्षा वाढतात, वासना वाढतात, इर्षा वाढते, काळजी वाढते, वखवख वाढते! असमाधान वाढते! ह्या सर्व बाबी समाधानाच्या आडच येतात! त्या नियंत्रणात ठेवणे ही अत्यंत कठीण आणि कसोटीचीच बाब नाही का? उलट पोटापुरता पैसा मिळाला तर अशी कसोटी नसते!
म्हणूनच सद्गुरू म्हणतात तेच खरे आहे! पोटापुरता पैसा मिळणाऱ्या आपल्यातल्या बहुसंख्यांवर देवाची कृपा आहे!
श्रीराम समर्थ!
Rate It
आपल्याला हव्या त्या गोष्टी: डॉ.श्रीनिवास क
Posted by on Sunday, 19th June 2016
आपल्याला हव्या त्या गोष्टी: डॉ.श्रीनिवास कशाळीकर
सद्गुरू ब्रह्मचैतन्य श्री. गोंदवलेकर महाराज म्हणतात, “आपल्याला हव्या त्या गोष्टी देण्यामध्ये भगवंताची खरी कृपा नसून,असेल त्या परिस्थितीमध्ये आपले समाधान टिकणे ही त्याची खरी कृपा होय.”
सुरुवातीला हे मला पटत नसे!
कारण?
जगामध्ये व आपल्या जीवनात काय व कसे असावे याबाबतच्या, अर्थात हवे-नको पणाच्या कल्पना, वासना आणि ओढ! म्हणजेच आत खोलवर लपून बसलेल्या अहंकाराचा पगडा!
पण जगामध्ये असो, वां वैयक्तिक जीवनात: आपल्याला हव्या त्या गोष्टी घडल्याने वा मिळाल्याने मनाला जेव्हां टोचणी लागल्याचा अनुभव अनेकदा आला आणि आपल्याला हव्याश्या वाटणाऱ्या अनेक बाबी न घडल्याने वा न मिळाल्याचे नंतर जेव्हा “हायसे” वाटल्याचा अर्थात समाधान झाल्याचा अनुभव जेव्हा अनेकदा आला, तेव्हा महाराजांचे हे बोल अक्षरश: पटले आणि मनात ठसले.
जगामध्ये असो, वा वैयक्तिक जीवनात: आपल्याला हव्या त्या गोष्टींसाठी स्वत:ला वा इतरांना पीडा देणे, किंवा त्या न मिळाल्याने मन मारून हताश होणे, ह्यातील तणावाच्या ओझ्याचे दुष्टचक्र कळू लागले!
ह्या दोन्हींना उत्तम पर्याय म्हणजे अश्या प्रत्येक प्रसंगी मनात असो वा नसो, नामस्मरण करणे हे जसे जसे लक्षात येत गेले तसे तसे, सर्वशक्तिमान आणि सर्वव्यापी ईश्वरी सत्तेचे नि:पक्षपाती आणि अचूक नियंत्रण ध्यानात येऊ लागले! पर्यायाने नामस्मरण वाढत गेले आणि डोक्यावरचे मोठ्ठे ओझे कमी कमी होत गेले!
असेल त्या परिस्थितीमध्ये आपले समाधान टिकणे ही त्याची खरी कृपा होय ह्याचा अनुभव येऊ लागला!
श्रीराम समर्थ!
Rate It
तर जीवनाचे सोने होते: डॉ. श्रीनिवास कशाळीकर
Posted by on Friday, 17th June 2016
तर जीवनाचे सोने होते: डॉ. श्रीनिवास कशाळीकर
सद्गुरू ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज म्हणतात, "जगात कुठलीही गोष्ट अती केले कि माती होते पण नामस्मरण ही ऐकमेव गोष्ट आहे कि आती केले कि माती नाही तर जीवनाचे सोने होते . नामामुळे परमेश्वराला तुमच्या बरोबर रहावे लागते"
मला कळलेला याचा अर्थ असा की नामस्मरणाने आपण आपल्या आत अस्तित्वाच्या गाभ्याकडे पोचत असतो, जिथे परमेश्वराची म्हणजेच सद्गुरूंची वस्ती असते! त्यामुळे नामस्मरण अती झाले तर त्यामुले काहीही बिघडण्याचा (माती होण्याचा) प्रश्नच येत नाही! उलट आपण परमेश्वराच्या म्हणजेच सद्गुरुंच्या म्हणजेच स्वत:च्या सच्चिदानंदस्वरूपाच्या (शाश्वत समाधानाच्या) अधिकाधिक निकट पोचत असतो! यालाच "परमेश्वराला तुमच्या जवळ राहावे लागते" असे सद्गुरू म्हणतात.
यातच आपले, आपल्या कुटुंबाचे आणि संपूर्ण विश्वाचेही कल्याण असल्याने यालाच "जीवनाचे सोने होते" असे सद्गुरू म्हणतात!
वाचन लेखनाने आपला निर्धार बळकट होतु शकतो, पण केवळ तेवढा पुरत नाही! याचा अनुभव नामस्मरणानेच येऊ शकतो!
श्रीराम समर्थ!
Rate It
सद्गुरू श्री गोंदवलेकर महाराज: डॉ. श्रीनिव
Posted by on Friday, 17th June 2016
सद्गुरू ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज म्हणतात: डॉ. श्रीनिवास कशाळीकर
सद्गुरू ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज म्हणतात, "नाम खोल गेलें पाहिजे. जातांयेतां, उठतांबसतां, स्वैंपाकपाणी करतांना, सारखें नाम घ्यावें म्हणजे ते खोल जातें. एकदां तें खोल गेलें कीं आपलें काम झालें. मग आपण न घेतां तें चालतें. त्यांत मजा आहे!"
स्वत: सच्चिदानंदस्वरूप असलेल्या अजरामर महापुरुषाचे हे अगदी सोपे बोल आहेत! इतके सोपे की आपल्याला त्यांची किंमत सुरुवातीला कळणे कठीण जाते! खरे तर कोणत्याही प्रकारच्या सबबीला जागाच नाही! पण आपण इतके जड असतो की आपल्याला अवजड शब्दांचे वेड असते! अवडंबर माजविण्याची सवय असते! आपल्याला हा सोपेपणा रुचत नाही आणि पचत नाही! बडेजाव आणि भपका यांना सोकावलेले आपले मन साध्या सरळ नामस्मरणात रमत नाही!
परंतु; विश्वकल्याणाचा आणि शाश्वत समाधानाचा अत्यंत खात्रीचा, अगदी सोपा आणि सर्वांना सहजशक्य (खऱ्या अर्थाने लोकशाही) असा अनुभवसिद्ध उपदेश इतक्या सोप्प्या भाषेत असू शकतो, हे यथावकाश जसे जसे नामस्मरण वर्षानुवर्षे गुरुकृपेने घडत जाते तसे तसे ध्यानात येऊ लागते! आपले मन आश्चर्याने आणि क्र्तज्ञतेने थक्क होते! अश्या सद्गुरुनी आपल्याला स्वीकारले या परम भाग्याचा आनंद हृदयात मावेनासा होतो!
श्रीराम समर्थ!!!
Rate It