आपले ध्येय: डॉ. श्रीनिवास कशाळीकर
Posted by on Saturday, 23rd April 2016
आपले ध्येय: डॉ. श्रीनिवास कशाळीकर
आपण कसे असावे आणि कसे वागावे ह्याबद्दल अनेक मते आहेत. आपल्यालाही अनेकदा अनेक विचार आणि उर्मि येतात. पण आपण कसेही झालो आणि कसेही वागलो तरी आपले समाधान होत नाही. कसेही होण्याचा किंवा कसेही वागण्याचा प्रयत्न केला तरीही समाधान होत नाही.
आपल्या सद्गुरुना म्हणजेच आपल्या अंतरात्म्याला जे आवडते, तसे होणे आणि तसे वागणे; किंवा तसे होण्याचा वा वागण्याचा प्रयत्न करणे; हेच आपल्याला समाधान देते आणि तेच श्रेयस्कर आहे!
पण ते कसे साध्य होईल?
इतर कोणत्याही बाह्य किंवा आंतरिक गोंधळात न अडकता नामस्मरण सुरु करणे, करीत राहणे, ते वाढवण्याचा प्रयत्न करणे; आणि आपल्या कळलेली/अनुभवाला आलेली नामस्मरणाची महती इतराना सांगणे; हेच आवश्यक आहे. त्यानेच आपल्या सद्गुरुना म्हणजेच आपल्या अनंतरात्म्याला समाधान देणारे बदल आपल्यात आपोआप घडत जातात; आणि आपले समाधान व्हायला सुरुवात होते!
श्रीराम समर्थ!
Rate It
नौका नामस्मरणाची: डॉ. श्रीनिवास कशाळीकर
Posted by on Tuesday, 19th April 2016
नौका नामस्मरणाची: डॉ. श्रीनिवास कशाळीकर
सर्व महान संतांनी आणि आपल्या सद्गुरुनी कोणतीही पूर्व अट न ठेवता नामस्मरणाची नौका आपल्यासाठी खुली केली आहे!
त्यामुळे, आपण कितीही पतित असलो; आणि इतरांनी कळत नकळत; आपला कितीही पाणउतारा केला, अटी घातल्या, अडचणी दाखविल्या, ज्ञान व कर्मकांडाचा बाऊ केला किंवा वेड्यात जरी काढले; तरी आपण विचलित होता कामा नये. खचता कामा नये. नाउमेद होता कामा नये.
आपण कसेही असलो, कितीही पतित असलो तरी सद्गुरुकृपेने नामस्मरणाच्या नौकेतूनच पैलतीराला नक्की पोचू!
श्रीराम समर्थ!
Rate It
नामाचा महिमा: डॉ. श्रीनिवास कशाळीकर
Posted by on Tuesday, 19th April 2016
नामाचा महिमा: डॉ. श्रीनिवास कशाळीकर
श्रीराम समर्थ!
स्वत:ला सुधारणे म्हणजे नेमके काय? ते कसे शक्य होईल? सुधारणे म्हणजे दोष काढणे म्हणावे तर आपल्यातले हजारो दोष आपल्याला दिसत देखील नाहीत आणि दिसले तर त्यांचे मूळ उपटून काढू म्हणता काढता येत नाही!
सद्गुरू कृपेने; झालेल्या अभ्यासातून आणि आलेल्या अनुभवातून हळु हळु माझी पक्की खात्री होत चालली आहे की; स्वत:ला सुधारणे आणि जगाला सुधारणे ह्या दोन्ही बाबी भिन्न भासल्या तरी वास्तविक भिन्न नाहीत आणि त्या नामस्मरणात अंतर्भूत आहेत.
Rate It
गुरुमाऊली: डॉ. श्रीनिवास कशाळीकर
Posted by on Monday, 18th April 2016
गुरुमाऊली: डॉ. श्रीनिवास कशाळीकर
ज्याप्रमाणे मुलाला कशाची गरज आहे हे आईला बरोबर कळते आणि ती मुलाला दूध देते; त्याप्रमाणे आम्हाला आमच्याच हृदयातील चैतन्याची तहान लागली आहे हे आमच्यातल्या चैतन्याची जननी ओळखते. पण विचित्र बाब अशी की आम्हाला आमची तहान कळत नाही आणि समोर आलेल्या चैतन्याचे महत्व आम्हाला कळत नाही! किंबहुना ते चैतन्य ओळखण्याची बुद्धी आणि ते पिण्याची क्षमताच आमच्यामध्ये नसते! त्यामुळे समोर आलेले चैतन्य आम्ही लाथाडतो! पण आमचा हटवादीपणा, आक्रस्ताळेपणा, नतदृष्टपणा पदरात घेऊन, कधी गोंजारून तर कधी वेळ पडल्यास धाकदपटशाने वा आम्हाला शिक्षा देऊन चैतन्याची माउली आमची तहान भागवते!
मातृत्व हे वैश्विक असले तरी प्रत्येकाच्या स्थूल देहाची आई वेगवेगळी असते हे जसे खरे तसेच आपल्याला चैतन्याचे पान घडवणारी आपल्यातल्या चैतन्याची आई देखील मूलत: एकच असली तरी, व्यावहारिक दृष्ट्या वेगवेगळी असते. हिलाच आपण “आपली गुरुमाउली” म्हणून ओळखू लागतो ! श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर हीच माझी गुरुमाउली. त्यांच्याच चरित्र आणि वाङमयाद्वारे; जीवन म्हणजे अजरामर वैश्विक चैतन्याचा अंश आहे आणि हे चैतन्य म्हणजेच नाम असून या चैतन्याचा अनुभव घेण्याचे सर्वोत्तम साधन म्हणजे नामस्मरण आहे हे समजू लागले.
विशेष म्हणजे नामस्मरण हा सर्वंकष वैयक्तिक आणि सामाजिक कल्याणाचा राजमार्ग आहे; आणि नामस्मरणाशिवाय शाश्वत समाधान, सार्थकता आणि पूर्णत्व साध्य होऊ शकत नाहीत याची खात्री झाली.
बाळाचे भूकेलेपण, त्याचे रडणे आणि आईचे त्याला दूध पाजणे हे तीनही एकत्र आले की उभयतांची तृप्ती होते! श्री. ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर ह्या माउलीने रामनामाचे अमृतपान करवून अशी तृप्ती साध्य केली. गुरुमाऊलीच्या ह्या चैतन्यपानाने ऊर कृतज्ञतेने भरून जातोा!
Rate It
गुरुकृपा: डॉ. श्रीनिवास कशाळीकर
Posted by on Monday, 18th April 2016
गुरुकृपा: डॉ. श्रीनिवास कशाळीकर
श्रीराम समर्थ!!!
सद्गुरू श्री. गोंदवलेकर महाराजांचे मला कळलेले महान वैशिष्ट्य असे; की त्यांनी माझ्यासारख्या पतितातल्या पतितालाही कोणतीही पूर्व अट न घालता अत्यंत आत्मीयतेने स्वीकारले आणि तात्काळ नामाची संजीवनी दिली.
म्हणून; नामस्मरण सुरु होणे हा आपला परम भाग्योदय, नामस्मरण सुरु राहणे हे परम भाग्य आणि नामस्मरण वाढत जाणे ही आपल्या भाग्याची अभिवृद्धी आणि ही सर्व सद्गुरूंची अक्षय्य कृपा आणि त्यांच्या भेटीची हमीच होय; असे मी समजतो!
Rate It