नामस्मरणाला विरोध डॉ. श्रीनिवास कशाळीकर
Posted by on Friday, 23rd October 2015
नामस्मरणाला विरोध डॉ. श्रीनिवास कशाळीकर
नामस्मरणाला विरोध करणे म्हणजे प्रत्यक्षात काय असते? बुद्धिवाद? बुद्धीप्रामाण्यवाद? मुळीच नाही! नामस्मरणाला विरोध करणे म्हणजे कळत नकळत; स्वत:च्या; मर्यादित बुद्धी, भावना, वासना, संकुचित स्वार्थांधता, स्वत:तील अधोगामी प्रवृत्ती आणि जडत्व यांचा जयजयकार करणे व त्यांना समर्थन देणे! संकुचित वृत्ती प्रबळ झाल्या आणि आपल्यावर स्वार झाल्या की नामस्मरणाची घृणा येते, तिटकारा येतो आणि नामस्मरणाचा विरोध उफाळून येतो!
याउलट नामस्मरणाची सुरुवात होणे हे प्रत्येकाच्या अंतरंगातील उर्ध्वगामी ईश्वरी ओढीचे (नामाच्या सुप्त आकर्षणाचे) पर्यवसान असते. यालाच ईश्वरी कृपा वा गुरुकृपा म्हणतात. नामस्मरण करू लागताच आपण सर्वज्ञ आणि सर्वगुणसंपन्न होतो असे नव्हे. पण संकुचित अहंकाराविरोधात आणि क्षुद्र स्वार्थाविरोधात सुरु झालेली आणि वैश्विक एकात्मतेत परिणत होणारी ती प्रक्रिया असते. नामस्मरण ही ईश्वराची महान देणगी आहे, ईश्वराचा कृपाप्रसाद आहे!
Rate It
लोकापवाद किंवा लोकप्रियता: डॉ. श्रीनिवास ज
Posted by on Wednesday, 23rd September 2015
लोकापवाद किंवा लोकप्रियता: डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकर
विद्यार्थी: कुंभ मेळ्याविषयी बोलताना; नामस्मरणात केलेले कार्य सत्कारणी लागते आणि नामविस्मरणात केलेले वाया जाते; असे आपण म्हणालात. पण पुष्कळदा सामान्य माणसे यासंदर्भातील सरकारी धोरणांच्यावर आपापली मते प्रदर्शित करतात, टीका-टिप्पणी करतात. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
शिक्षक: आपण सर्वच जण सामान्य आहोत. आपल्याला कोणत्याही गोष्टीची थोडीफार जरी झळ लागली तरी आपण तक्रार करतो आणि थोडासा जरी फायदा झाला तरी सरकारचा उदो-उदो करतो. आपली मुले-बाळे, आपले आप्त-स्वकीय, आपले मान-अपमान, आपला फायदा-तोटा; ह्यांभोवती आपली मते फिरतात. त्यामुळे; आपणा सर्वांना लोकशाही कितीही श्रेष्ठ वाटत असली तरी; आपण व्यक्त केलेली प्रत्येक टीका-टिपण्णी आणि व्यक्त केलेले प्रत्येक मत विचारात घ्यायच्या लायकीचे असतेच असे नाही, हे इतरांप्रमाणेच आपल्याला देखील पक्के माहीत असते.
विद्यार्थी: याचा अर्थ; सामान्यांची मते लक्षात घेतली जाऊ नयेत असा घ्यायचा का?
शिक्षक: सामान्यांची मते नक्कीच लक्षात घेतली जायला हवीत. पण त्यांच्या कल्याणाच्या दृष्टीने; त्यांच्या मतांना किती महत्व द्यायचे हे नामस्मरण करणाऱ्या शासकांना बरोबर कळते. ते लोकापवाद किंवा लोकप्रियता यांनी दबून वा बहकून जात नाहीत. लोकप्रतारणा करीत नाहीत आणि लोकानुनय देखील करीत नाहीत. कारण; नामस्मरणाद्वारे; चित्त शुद्ध होत चाललेले वा झालेले शासक; जेव्हां एखादे धोरण आंखतात, एखादा विचार करतात, एखादा संकल्प करतात, एखादी योजना आखतात, किंवा एखाद्या योजनेची अंमलबजावणी करतात, तेव्हां ते सारे नि:स्वार्थ भावनेतून, भेदभाव रहित वृत्तीतून होत असते. ते सारे थेट गुरुमार्फत, विश्वचैतन्याच्या जननीमार्फत वा ईश्वरामार्फत घडत असते. त्यामुळे ते चैतन्याकडे वा ईश्वराकडे नेणारे असते. आणि म्हणून ते विश्वकल्याणाचेच असते. जेव्हा असे लोक; शस्त्रसत्ता, राजसत्ता, अर्थसत्ता, आरोग्यसत्ता, उद्योगसत्ता, शिक्षणसत्ता अशा सर्व सत्तास्थानी येतात आणि राज्य करतात, तेव्हां त्या राज्यालाच रामराज्य म्हणतात.
कुंभ मेळाच नव्हे तर इतर यात्रा व उत्सवांबद्दल निस्वार्थपणे टीका-टिप्पणी करण्यासाठी व लोकशाही खऱ्या अर्थाने लोककल्याणकारी आणि बळकट करण्यासाठी, आपल्यासारख्या सामान्य लोकांचे विचार देखील नामस्मरणाच्या योगाने; संकुचित कोशातून बाहेर आले पाहिजेत. अशा तऱ्हेने आपण निस्वार्थी आणि विशाल बनलो तरच; चांगल्या नेतृत्वाला समजून घेऊन बळ देऊ शकू किंवा स्वत: चांगले नेते बनू शकू!
Rate It
गुरुची अद्भुत शक्ती!: डॉ. श्रीनिवास जनार्दन &
Posted by on Monday, 21st September 2015
गुरुची अद्भुत शक्ती!: डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकर
विद्यार्थी: कुंभ मेळ्यामध्ये आपल्याला अचंबित करणाऱ्या, थक्क करणाऱ्या गोष्टी दिसतात आणि आपले मन अद्भुत रसाने भरले जाते. आपली मंदिरे आणि तीर्थक्षेत्रे देखील विस्मयकारक असतात! महान विभूतींचे जीवन देखील अद्भुत असते! ह्यातले बरेच काही; आपल्या तर्कशास्त्रामध्ये किंवा आपल्या मूल्यव्यवस्थेमध्ये बसत नाही. तरीपण; प्राचीन रूढी, परंपरा, मन्दिरे आणि तीर्थक्षेत्रे; ह्यांच्याबद्दल आपल्याला आपल्या मनांत विलक्षण आकर्षण, कुतुहूल आणि आस्था असल्यामुळेच टिकून आहेत का?
शिक्षक: होय. ह्या सर्व बाबी आस्थेमुळेच टिकून राहिल्या आहेत आणि त्या नामस्मरणाला पोषक होण्यासाठीच आहेत यात शंका नाही.
रूढी आणि परंपरांप्रमाणेच खुद्द नामस्मरणाचे देखील आहे. नामस्मरण करता करता आपल्याला एकदम अमृतत्वाचा साक्षात्कार झाला असे होत नाही. आपल्याला टप्प्या-टप्प्यानेच पुढे जाता येते आणि ह्या टप्प्यांवर घडणाऱ्या अनेक चित्रविचित्र, चमत्कारिक, हृदयस्पर्शी आणि भारावून टाकणाऱ्या मनोवेधक घटनांमुळेच; आपले नामस्मरण टिकून राहते. कारण ह्या बाबी; नामस्मरणाची गोडी वाढवतात आणि आपल्याला नामस्मरणात गुंतवून ठेवतात!
विद्यार्थी: नामस्मरणाद्वारे अंतीम सत्याचा आणि अमरत्वाचा अनुभव लगेच येत नाही आणि तो कुणाला आणि केव्हा येईल, हे सांगता देखील येत नाही. त्याचप्रमाणे नामस्मरणाने समृद्धी देखील येतेच असेही नाही. त्यामुळे नामस्मरण करताना सामान्यांच्या विशेषत: गोरगरीबांच्या चिकाटीची कसोटी लागते, आणि त्याचा धीर सुटू शकतो ना?
शिक्षक: होय. खरे आहे. पण गोर गरीबच नव्हे तर आपण सारे; पुन्हा पुन्हा चैतन्याच्या विस्मृतीत जातो आणि त्यामुळे; विषयांकडे आकर्षित होत राहतो, त्यांच्या भूलभूलैय्यात अडकत राहतो, हरवत राहतो आणि चैतन्याला पारखे होतो. इंद्रियगम्य स्थूल विषय आणि दृश्य विश्वाच्या आकर्षणाचा जोर इतका जबरदस्त असतो की आपली धाव आपोआप चैतन्याच्या विरुद्ध दिशेला वळते! साहजिकच आपण भलतीकडेच भरकटत जातो! परिणामी; आपली अस्वस्थता काही केल्या कमी होत नाही आणि पूर्णत्व, सार्थकता आणि समाधान आपल्यापासून दूरच राहतात!
पण; काळजी करण्याचे कारण नाही. आपल्या इच्छे-अनिच्छेपलिकडे; विश्वचैतन्याची जननी आपल्याला चैतन्यामृतपान करवीत आहे. आपल्यामध्ये नवचेतना भरत आहे. आपल्याकडून नामस्मरण आणि स्वधर्मपालन करवीत आहे. सदिच्छा, सत्संकल्प, सत्प्रेरणा, सत्बुद्धी, सद्भावना, सद्वासना, सदाचार यांनी आपले व्यक्तिगत आणि सामाजिक जीवन भरून टाकीत आहे. ह्यावर विश्वास ठेवू नये; तर; नामस्मरण करता करता स्वत: त्याचा अनुभव घ्यावा!
Rate It
नामस्मरण आणि आपले कल्याण: डॉ. श्रीनिवास कशा
Posted by on Monday, 21st September 2015
नामस्मरण आणि आपले कल्याण: डॉ. श्रीनिवास कशाळीकर
विद्यार्थी: काहीजण असे म्हणतात की कुंभ मेळ्यातील साधुंनी फक्त अध्यात्माबद्दल बोलावे. त्यांनी राजकारणाबदल बोलू नये. तुम्हाला काय वाटते?
शिक्षक: अध्यात्म ह्यांचा अर्थ स्वभाव. भगवद्गीतेच्या आठव्या अध्यातात स्पष्टपणे ही व्याख्या दिलेली आहे. अध्यात्म हा इतिहास, भूगोल यासारखा विषय एक विषय नाही. अध्यात्म हा संपूर्ण अस्तित्वाचा मूळ स्वभाव आहे.
अध्यात्मिक होणे म्हणजे तो मूळ स्वभाव जाणणे, स्मरणे आणि तद्रूप होणे आहे. खरे पाहता; गर्भावस्थेत आल्यापासून आपल्या शरीरात आणि आपल्या मनात जे जे म्हणून काही घडते ते ते सारे; खरे पाहता आपल्यामधील चैतन्यतृष्णेपायी, चैतन्यामृतपानासाठी आणि चैतन्यमय होण्यासाठी घडत असते! म्हणजे आपण सर्वच जण मूलत: अध्यात्मिकच असतो.
पण एकीकडे आपल्याला कशाची तृष्णा आहे हे आपल्याला कळत नाही आणि दुसरीकडे; आपला मूळ स्वभाव, आपल्या अंतर्बाह्य बरसणारे चैतन्य आपल्याला ओळखता येत नाही. हे चैतन्य अदृश्य असते. ते आपल्याला दिसत नाही. ते अश्राव्य असते. त्याची चाहूल लागत नाही. थोडक्यात; ते इंद्रियातीत असते. कर्मेंद्रियांच्या आणि ज्ञानेंद्रियांच्या पलीकडे; म्हणजेच जाणीवेच्या पलीकडे असते. बुद्धीच्या आवाक्याच्या पलीकडे असते. ह्यातच भर म्हणून की काय; ह्या चैतन्याची विस्मृती झाल्यामुळे ते समीप असूनही दूरच राहते!
पण असे असले तरी त्या चैतन्याची जननी आपल्यावर पांखर घालण्याचे आपले काम करीतच असते. ती आपली पाठ सोडीत नाही! त्यामुळे चैतन्याचा “चुंबकीय” प्रभाव आपल्यावर पडतच असतो. त्याची अनाकलनीय अशी ओढ आपल्याला स्वस्थ बसू देत नाही. ही कोणती ओढ आहे हे आपल्याला कळत नाही. त्यामुळे गीतेच्या सातव्या अध्यायात तिसऱ्या श्लोकात म्हटल्याप्रमाणे हजारो लोकांमध्ये एखादाच अध्यात्माच्या शोधात धडपडतो. आणि अशा हजारो धडपडणाऱ्या लोकांमध्ये एखादाच खरा खुरा अध्यात्मिक होतो. पण बाकीचे धडपडणारे धडपडत असतात. त्या धडपडणाऱ्यांचे बाह्य रूप सामान्यांपेक्षा वेगळे असते. ह्या खास वेगळ्या बाह्य स्वरूपामुळे बऱ्याच जणांना असे वाटते की अध्यात्म हा आपल्या रोजच्या जीवनापासून वेगळा असा प्रांत आहे, वेगळे प्रावीण्य आहे. ह्या बाह्य अंगाने साधु असणाऱ्या लोकांना जीवनाच्या सर्व अंगांबद्दल मतप्रदर्शन करण्याची कुवत नसतेच.
परंतु, परिपूर्ण अध्यात्मिक व्यक्तीला जीवनाच्या सर्व अंगांबद्दल मतप्रदर्शन, मार्गदर्शन आणि नेतृत्व करण्याचा निश्चित अधिकार आहे. स्थितप्रज्ञ व्यक्तींच्या प्रत्यक्ष नेतृत्वाखाली जगाचे कल्याण होईल यात तीळमात्र शंका नाही
Rate It
नाम हे अमृत: डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकर
Posted by on Monday, 21st September 2015
नाम हे अमृत: डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकर
विद्यार्थी: आमच्यासारख्या लाखो लोकांना नामात गोडी लागेपर्यंत आनंददायक आणि उत्साहवर्धक अशा कुंभमेळ्याचा आणि इतर अनेक रूढी परंपरांचा उपयोग आहे हे खरेच आहे!
शिक्षक: निश्चित! चैतन्यविस्मृतीच्या अंध:कारातून, गदारोळातून आणि तणावातून मुक्त होण्यासाठी चैतन्य स्मृती हेच उत्तर आहे ह्याची जाणीव अधिकाधिक प्रकर्षाने होत असल्याने कुंभ मेळ्यासारख्या सर्व प्रथांमध्ये देखील अंतरात्म्याचे स्मरण अर्थात नामस्मरण हे प्रधान कर्म बनत आहे. नामस्मरणाला कुणी जप, म्हणतो तर कुणी जाप, कुणी सुमिरन म्हणतो तर कुणी सिमरन, कुणी जिक्र म्हणतो तर कुणी अंतरात्म्याचे स्मरण. पण मथितार्थ एकच!
आनंदाची बाब अशी की; चैतन्यविस्मृतीच्या गडद अंध:काराचा अंत होऊन चैतन्याचा प्रकाश जगभर पसरू लागला आहे!
केवळ भारतच नव्हे तर चीन, पाकिस्तान, बांगला देश वगैरे इतर आशियाई देशात आणि आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, युरोप, अमेरिका आदि सर्व खंडांमध्ये घराघरातून नामस्मरणाविषयी कुतुहूल आणि जागृती वाढताना दिसते आहे. मालक, संचालक आणि व्यवस्थापक कर्मचाऱ्यांना, शिक्षक विद्यार्थ्याना, डॉक्टर रुग्णांना, प्रसिद्ध व्यक्ती त्यांच्या चाहत्यांना आणि नेते अनुयायांना; नामस्मरणाचे महत्व खऱ्या तळमळीने सांगू लागले आहेत. पालक त्यांच्या मुलांना अगदी मनापासून नामस्मरण करायला शिकवू लागले आहेत. आपआपल्या धर्मानुसार आणि परंपरेनुसार नामस्मरण करण्याची जणू काही एक प्रचंड आणि विश्वव्यापी त्सुनामी लाट आली आहे. विश्वचैतन्याचा अनुभव घेणे आणि तो इतरांना सांगणे ही आस्थेची, नित्याची आणि सार्वत्रिक बाब झाली आहे.
मंदिरामंदिरामधून नामजपाचे सप्ताह आणि अनुष्ठाने होऊ लागली आहेत. नामसाधना कशी करावी ह्याचे मार्गदर्शन करणारी नामसाधना शिबिरे होऊ लागली आहेत. केवळ धार्मिक ठिकाणी आणि अध्यात्मिक संस्थांमध्येच नव्हे तर वेगवेगळ्या कंपन्या, कारखाने, दवाखाने, दुकाने, प्रयोगशाळा, अंगणवाड्या, बालवाड्या, आश्रमशाळा, विद्यालये, महाविद्यालये, रुग्णालये, दवाखाने, सरकारी कार्यालये इत्यादी सर्वच ठिकाणी नामस्मरणाचा दिव्य प्रकाश पसरताना दिसत आहे. पोलीसांच्या चौक्यांमधून आणि सैनिकी संस्थांमधून देखील नामस्मरणाची संजीवनी आपले संजीवक काम करताना दिसत आहे.
शेतकरी, कष्टकरी, तंत्रज्ञ, कारागीर, क्रीडापटू, कलाकार, बुद्धीजीवी, व्यवस्थापक, शासनकर्ते, सत्ताधारी असे; सर्वच जण नामस्मरणाकडे आकर्षित होत आहेत. एवढेच नव्हे तर; आज ज्यांच्याकडे पूर्वग्रहदूषितपणामुळे तुच्छतेने किंवा तिरस्काराने पाहिले जाते अशा अनेक व्यवसायांमधले व्यावसायिक देखील नामस्मरण करू लागले आहेत!
Rate It