लेखांक ३. श्री विष्णुसहस्रनाम स्तोत्रातीë
Posted by on Friday, 16th September 2016
श्री विष्णुसहस्रनाम स्तोत्रातील वैश्विक चैतन्य: डॉ. श्रीनिवास कशाळीकर
लेखांक ३. आपल्यातील जडत्वामुळे, आपण स्वत:च्या अजरामर आणि विशाल अशा कालातीत अस्तित्वाला विसरतो आणि पारखे होतो. हेच तमस, पाप, अज्ञान, अंधार, अवनती आणि अवदसा.
यामुळे आपण स्वत:ला केवळ देह समजू लागतो आणि देहरूप होतो. देहाशी निगडीत वासना, भावना, कल्पना, विचार, समजुती, श्रद्धा, संकेत इत्यादीमध्ये स्वत:ला जखडून घेतो. अशा प्रकारे स्वत:च्या मर्यादित, संकुचित आणि नश्वर अंशाला स्वत:चे पूर्ण आणि शाश्वत अस्तित्व मानणे म्हणजेच देहबुद्धी. आणखी स्पष्ट करायचे तर, असं म्हणता येईल, की शरीराच्या नखे, दात, केस इत्यादीपैकी एकाद्या छोट्या भागाला संपूर्ण शरीर समजणे ही जशी गफलत आहे, तशीच देहबुद्धी ही देखील एक फार मोठी गफलतआहे. तो एक भ्रम आहे. तसेच ती एक जबर अशी अंधश्रद्धा आहे.
देहबुद्धीमुळे आपण आपल्या सच्चिदानंद स्वरूपाला पारखे होऊन क्षुद्रत्वात अडकतो आणि आपले क्षुद्रत्व आपल्या जीवनांत आविष्कृत होत जाते. आपण हीन जीवन जगू लागतो. क्षुद्र वासना, भावना, विचार, कल्पना, दृष्टीकोन यांमुळे गुलाम बनतो वा बनवतो, त्रास भोगतो वा देतो, अगतीक बनतो वा बनवतो. साहजिकच असहाय्यता आणि हिंस्रपणा यांचा अघोरी हैदोस चालू होतो. आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक अशा जीवनाच्या सर्व क्षेत्रात हा हैदोस मग अक्राळविक्राळ रूप धारण करू लागतो. सारी मानवी मूल्ये नष्ट करणाऱ्या विनाशपर्वाचे भयानक व किळसवाणे लोण सर्वत्र व सतत पसरू लागते.
परंतु विष्णुसहस्रनामाच्या अभ्यासातून (नामस्मरणातून) हळूहळू आपल्याला आपल्या स्वरूपाची म्हणजेच सच्चिदानंदाची अनुभूती येऊ लागते. ही अनुभूती म्हणजे विश्वचैतन्याची उषाच! यथावकाश ह्या उष:कालाची परिणती वैश्विक आत्मज्ञानाच्या महासूर्योदयात होते. ह्या महासूर्योदयाचा प्रकाश म्हणजेच जीवनाच्या सर्व क्षेत्रातील मानवी मूल्यांचे विश्वकल्याणकारी पुनरुज्जीवन आणि पुनराविष्कार.
Rate It
लेखांक २ श्री विष्णुसहस्रनाम स्तोत्रातील
Posted by on Friday, 16th September 2016
श्री विष्णुसहस्रनाम स्तोत्रातील वैश्विक चैतन्य: डॉ. श्रीनिवास कशाळीकर
लेखांक २. विष्णुसहस्रनाम म्हणजेच विष्णूची एक हजार नावे. ही एक हजार नावे आठवणे किंवा स्मरणे म्हणजे एकामागून एक अशा प्रकारे आपले एक हजार डोळे उघडण्यासारखे आहे. हे एक हजार डोळे अर्थात अंत:चक्षु जसे उघडत जातात तसे आपल्याला आपले आणि विश्वाचे सच्चिदानंदमय मूळ स्वरूप अधिकाधिक जाणवू लागते. कालांतराने आपण आपल्या ह्या मूळ स्वरूपाशी तद्रूप होतो.
आपल्या ह्या एक हजार डोळ्यांतून आपल्या सर्वांच्या अंतर्यामी जाणवणाऱ्या ह्या आशयाचे म्हणजेच आनंदसंजीवनीचे वैशिष्ट्य कोणते आणि व्यक्ती आणि विश्व ह्यांना अंतर्बाह्य व्यापणाऱ्या ह्या कालातीत सत्याची प्रचीती म्हणजे काय; हे आपण वीजेच्या बल्बच्या उदाहरणाने समजून घेण्याचा प्रयत्न करू.
ज्याप्रमाणे बल्ब विजेमुळे ‘पेटतो’, त्याचप्रमाणे सजीव आणि निर्जीव सृष्टीतील अणुरेणु; चिरंतन सत्यामुळे क्रियाशील होतात. ह्या सत्यालाच सच्चिदानंद म्हणतात. ह्या आनंदरूप सत आणि चित अश्या सत्यालाच; पुरुष-प्रकृती, शिव-शक्ती, लक्ष्मी-नारायण, सीता-राम, राधा-कृष्ण ह्या द्वंद्वानी ओळखले जाते. ज्याप्रमाणे बल्ब फुटला तरी वीज नष्ट होत नाही, त्याचप्रमाणे मनुष्य देह जरी नष्ट झाला तरी त्याचे सच्चिदानंद स्वरूप नष्ट होत नाही.
अर्थात ही तुलना मर्यादित अर्थाने समर्पक आहे. बल्ब आणि मनुष्यात फरक आहे.
बल्बला त्याचे मूळ स्वरूप वीज आहे हे कळण्याची व्यवस्था नाही. तसेच बल्बला त्याच्या स्वत:च्या आणि इतर बल्बांच्या वीजमय मूळ स्वरूपाशी समरस होऊन अमर आणि स्वतंत्र होता येत नाही.
याउलट, मनुष्याला त्याचे मूळ स्वरूप सच्चिदानंद असून स्वत:च्या आणि विश्वाच्या अंतर्यामी देखील हा सच्चिदानंद आहे हे कळू शकते. एवढेच नव्हे, तर त्याच्याशी समरस होता येते आणि अमर व स्वतंत्र होता येते.
दुसरा फरक असा की, बल्ब आणि विजेचा संयोग ही भौतिक घटना तिसऱ्या भौतिक घटकामुळे होते, तर मनुष्य आणि सच्चिदानंद ह्यांच्यातील नाते, ह्या नात्याची मनुष्याला येणारी जाण आणि यातून होणारा आविष्कार, हे सारे सच्चिदानंदाच्या सत्तेनेच होत असते.
Rate It
श्री विष्णुसहस्रनाम स्तोत्रातील वैश्विक
Posted by on Friday, 16th September 2016
श्री विष्णुसहस्रनाम स्तोत्रातील वैश्विक चैतन्य: डॉ. श्रीनिवास कशाळीकर
लेखांक १.
मान्यवर वाचक स्नेही! सादर प्रणाम!
ह्या पुस्तकात तुम्हाला, मूळ संस्कृत विष्णुसहस्रनाम स्तोत्र, त्यामधील विष्णुच्या एक हजार नावांचे मराठी अर्थ आणि त्या अर्थांमधून मला जाणवलेला आशय वाचायला मिळेल.
हा आशय वाचताना, तो स्वत:च्याच अंतर्यामी स्फुरला आहे असे जर तुम्हाला वाटले, तर त्यात काहीही वावगे नाही. कारण, ह्या शब्दांमधला आशय, वास्तविक शब्दातीत आहे. आपल्या सर्वांच्या; जाणीवेच्या आणि अस्तित्वाच्या मूलस्त्रोताशी एकजीव आहे. जाती, धर्म, राष्ट्रीयत्व, वंश, संस्कृती, व्यवसाय, लिंग, प्रवृत्ती, विचार, विकास, वय वगैरे विविध प्रकारच्या वर्गीकरणात बसणाऱ्या प्रत्येकाच्या मूलाधाराशी तो एकात्म आहे. म्हणूनच तो आपल्या सर्वांचाच आहे व राहील.
आपल्या सर्वांच्या अंतरंगीचे हे अमृत, ही आनंदसंजीवनी; संकुचितपणाकडून विशालत्वाकडे, धर्मवेडाकडून सहृदय उदारतेकडे, वैचारिक गुलामीतून सत्याच्या प्रचीतीकडे, दुबळेपणातून समर्थतेकडे आणि विपन्नावस्थेतून संपन्नतेकडे नेणारी विश्वकल्याणकारी संजीवनी आहे अशी खात्री होत राहिल्यामुळे; ही शब्दातीत आनंद संजीवनी काही प्रमाणात का असेना, शब्दबद्ध करण्याचे कठीण काम माझ्यासारख्या अति सामान्य व्यक्तीकडून पार पडले आहे ही लक्ष्मीनारायणाची म्हणजेच सद्गुरूंची कृपा.
Rate It
श्री गोंदवलेकर महाराज म्हणतात, "भगवंताचा व
Posted by on Friday, 9th September 2016
श्री गोंदवलेकर महाराज म्हणतात, "भगवंताचा विसर हेच मोठे पाप": डॉ. श्रीनिवास कशाळीकर
जग सुंदर बनवायचे तर आपण सुंदर नसून कसे चालेल? आपण सुंदर बनायला हवे ना?
आपण सुंदर बनण्यासाठी सर्व सद्गुणांची खाण असलेल्या भगवंताशी जोडले जाणे अपरिहार्य आहे.
त्याशिवाय आपण सुंदर बनू शकत नाही आणि जग देखील सुंदर बनू शकत नाही. आणि असे न होणे हेच पाप नाही का?
म्हणूनच सगळ्या पाप आणि पुण्याचा विचार करत न बसता आपण भगवंताच्या नामस्मरणाने त्याच्याशी जोडले जाणे हेच पुण्य आणि श्रेयस्कर आहे!
Rate It
नामस्मरण आणि तारुण्य डॉ. श्रीनिवास कशाळीक
Posted by on Saturday, 3rd September 2016
नामस्मरण आणि तारुण्य डॉ. श्रीनिवास कशाळीकर
बाल वयातच जर नामस्मरण सुरु केलेले तर आपले मन विशाल होऊ लागते. निष्कपट होऊ लागते. निष्पाप होऊ लागते.
यामुळे; वयोमानानुसार पती - पत्नीने वासना आणि आवडी निवडी जरी पुरविल्या नाही तरी आकर्षण आणि प्रेम कमी होत नाही.
प्रेम आणि समाधान टिकतात आणि वाढतात.
तारुण्यातला अपरिपक्व आणि संकुचित प्रणय ओसरला तरी त्याची जागा हा परिपक्व आणि लोकोत्तर ऋणानुबंध घेतो आणि चिरकाल टिकतो.
Rate It