चैतन्यप्रभातीची अस्सल प्रचीती: डॉ. श्रीनि
Posted by on Saturday, 22nd August 2015
चैतन्यप्रभातीची अस्सल प्रचीती: डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकर
विद्यार्थी: कुंभ मेळा पवित्र होईल आणि निरुपद्रवी होईल आणि चैतन्यप्रभात होईल ही भाकिते भ्रामक वाटतात. कारण जगामध्ये मन प्रसन्न करणाऱ्या घटनांबरोबरच मन खिन्न करणाऱ्या असंख्य घटना देखील हरघडी आढळतात.
शिक्षक: खरे आहे. म्हणूनच; आपली फसवणूक टाळण्यासाठी आपल्या अंतर्यामी डोकावले पाहिजे. तसे केले असता चैतन्यप्रभातीच्या ह्या दृश्य आणि ढोबळ लक्षणांव्यतिरिक्त; आपल्याला; आपल्या स्वत:च्या अंतर्यामी; नामरुपी चैतन्यसूर्य उगवून तळपताना दिसतो! सूर्य ज्याप्रमाणे सूर्यमालेच्या केंद्रस्थानी असतो, कुठल्यातरी कोपऱ्यात नाही, त्याप्रमाणे नामसूर्य आपल्या अखिल जीवनाच्या केंद्रस्थानी असून आपले अंतर्बाह्य सर्व जीवन संचालित आणि प्रकाशित करतो आहे हे स्पष्ट दिसते. ह्या नामसूर्याच्या दर्शनातून चैतन्यप्रभातीची खरीखुरी आणि अस्सल प्रचीती येते.
कला, व्यवस्थापन, विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, शेती इत्यादी; जीवनाची सर्व ज्ञानक्षेत्रे अंतर्यामीच्या चैतन्यातून उगम आणि स्फुरण पावून चैतन्याद्वारेच नियंत्रित होत आहेत आणि विश्वहितकारी होत आहेत ह्याची हरघडी प्रचीती राहते.
जगभरातल्या महानुभावांना अभिप्रेत असलेला आणि गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णानी अधिकारवाणीने पुरस्कृत केलेला विश्वकल्याणकारी स्वधर्म; प्रगट होण्यासाठी आज प्रत्येकाच्या हृदयात उसळी घेत आहे! वेगळ्या शब्दात सांगायचं तर; वेगवेगळ्या कंपन्या, कारखाने, दवाखाने, दुकाने, प्रयोगशाळा, बालवाड्या, आश्रमशाळा, विद्यालये, महाविद्यालये, रुग्णालये, दवाखाने, सरकारी कार्यालये इत्यादी सर्वच ठिकाणी सत्प्रेरणा, सद्बुद्धी, सद्विचार, सदभिरुची, सद्भावना, सद्वासना, सत्संकल्प, सत्कर्म आणि सदाचार हे सर्व; वैयक्तिक आणि सामाजिक अशा सर्वच पातळ्यांवर व्यक्त होण्यासाठी सर्वांतर्यामातून उसळी घेत आहेत!
माझा एक मित्र सतत नामस्मरण करीत असतो. ह्या माझ्या मित्राचा अनुभव असा की तो एकदा घरासमोरच्या उद्यानात फिरत असताना त्याला स्पष्टपणे जाणवले की त्या बागेतल्या प्रत्येक झाडात आणि पानाफुलात नामस्मरण चालू आहे! हा अनुभव काही त्याचा एकट्याचाच नाही! मनाची किंवा जाणीवेची सूक्ष्मता आणि संवेदनाक्षमता आल्यानंतर अनेकांना हा अनुभव आल्याचे दाखले आहेत. या अनुभवाचा मथितार्थ असा की आपल्या वैयक्तिक इच्छे-अनिच्छेपलिकडे चैतन्ययोगाची ही साधना आणि आविष्कार सर्वान्तर्यामी चालू आहे! नाम हे चैतन्यदायी अमृत आहे, किंवा चैतन्यामृत आहे. आपले अंतर्बाह्य व्यापणाऱ्या चैतन्यामृतामुळे आपला स्वत:चा स्वत:शी असलेला आणि स्वत:चा इतरांबरोबर चालणारा संघर्ष संपुष्टात येत जातो. आपल्या आणि इतरांमधल्या आंतरिक एकात्मतेची गोडी अनुभवाला येते.
Rate It
चैतन्याची हाक : डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळी
Posted by on Saturday, 22nd August 2015
चैतन्याची हाक : डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकर
विद्यार्थी: कुंभ मेळ्यामध्ये जमीन, पाणी, वीज, शौचकूप, स्नानगृहे इत्यादी अनेक सोयी सरकारी पैशातून म्हणजेच कर भरणाऱ्या जनतेच्या पैशातून पुरविल्या जातात. हीच बाब इतर यात्रांच्या आणि सार्वजनिक उत्सवांच्या बाबतीत देखील खरी आहे. धर्माचे रक्षण करण्यासाठी हे सर्व लागते का?
शिक्षक:. तमोगुण आणि रजोगुण वाढल्यामुळे वेड, वासना, आवडी, छंद, लहरी, फॅशन्स, व्यसने, विकृती; अशा बाबींसाठी अब्जावधी रुपये खर्च होत आहेत. संकुचित स्वार्थापायी फसवणे आणि फसले जाणे; हे सार्वत्रिक झाले आहे. त्यामुळे त्याचे प्रतिबिंब कुंभ मेळ्यात देखील पडते आहे.
जोपर्यंत नामस्मरण सर्वत्र पसरत नाही आणि झिरपत नाही, तोपर्यंत कुंभ मेळ्यामध्ये देखील आत्मसाक्षात्कारी निस्पृह संत महंत फार मोठ्ठ्या प्रमाणात सापडणे कठीण आहे. किंबहुना तोपर्यंत; कुंभ मेळ्यामध्ये देखील थकले-भागलेले, चुकले-माकलेले, गोर-गरीब, रंजले-गांजलेले, पोटासाठी वणवण करणारे लोकच जास्त आढळणे साहजिकच आहे.
ज्या अजरामर आंतरिक चैतन्याची हाक (Inner Voice) आपल्याला ऐकू येत नाही आणि ज्याच्यापासून तुटल्यामुळे आपण अचेतन आणि मरतुकडे बनलो आहोत, त्या अनादी, अनंत, सर्वव्यापी तसेच सर्वांच्या अंतर्यामी आणि बाहेर असलेल्या सच्चिदानंद “वस्तु”ला ओळखणे, समजणे, आठवणे आणि हळु हळु त्या “वस्तु”शी तद्रुप होणे; हा सर्व कुंभ मेळ्यातील आणि त्याच्या बाहेरील सर्वच दुरवस्थेवरील इलाज आहे. ह्या अनादी अनंत सच्चिदानंद वस्तूला ओळखण्याचे, समजण्याचे, आठवण्याचे आणि हळू हळू त्या वस्तुरूप होण्याचे अनादी साधन; ह्या वस्तूच्या नावाचे म्हणजेच नामाचे स्मरण म्हणजे नामस्मरण आहे.
विद्यार्थी: तुमच्या मते; नामस्मरणाच्याद्वारे वैयक्तिक आणि सामाजिक पातळीवरील इतर विकृती ज्या प्रमाणात कमी होत जातील; त्या प्रमाणात कुंभ मेळ्यांचे स्वरूप देखील अधिक पवित्र आणि निरुपद्रवी होईल यात शंका नाही?
शिक्षक: होय. मला निश्चितपणे तसे वाटते.
विद्यार्थी: हे तुमचे भाकीत आहे?
शिक्षक: ही आपल्या सर्वांच्या अंतर्यामी राहून सदैव आपली काळजी घेणाऱ्या नामरूप चैतन्याची म्हणजेच आपल्या सर्वांच्या गुरूदेवांची कृपा आहे! प्रत्येकाच्या गुरुचे व्यावहारिक नाव गाव वेगवेगळे असले तरी प्रत्येकाच्या हृदयात जो नामरूप गुरु असतोच, त्याच्याच कृपेने आपल्या सर्वांना; नामस्मरणाच्या द्वारे होणारी चैतन्यप्रभात आणि स्वधर्म सूर्याचा उदय आणि त्यांचा कल्याणकारी प्रभाव यांचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही!
Rate It
चैतन्ययोग (नामस्मरणाबद्दल जिज्ञासा वाढत ç
Posted by on Saturday, 22nd August 2015
चैतन्ययोग (नामस्मरणाबद्दल जिज्ञासा वाढत आहे?) : डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकर
विद्यार्थी: कुंभ मेळ्याविषयी जगभर कुतुहूल वाढते आहे हे मला माहीत होते. पण नामस्मरणाबद्दल देखील कुतुहूल आणि जिज्ञासा वाढत आहे?
शिक्षक: होय! नक्कीच! जगभर नामस्मरण पहायला मिळते. कुणी जपमाळ घेऊन तर कुणी माळेशिवाय नामस्मरण करतो आहे. कुणी एका जागी बसून तर कुणी फिरत फिरत नामस्मरण करतो आहे. कुणी मोठ्ठ्याने उच्चार करून तर कुणी मनातल्या मनात, कुणी डोळे मिटून तर कुणी डोळे उघडे ठेवून, कुणी श्वासोच्छवासावर तर कुणी उत्स्फूर्त भावनेने आणि आर्ततेने नामस्मरण करतो आहे. कुणी घरी तर कुणी ऑफिसमध्ये, कुणी देवळात तर कुणी शाळेत, कुणी फॅक्टरीत तर कुणी रुग्णालयात; आणि कुणी दुकानात तर कुणी शेतात नामस्मरण करीत आहे!
प्रत्येक स्तरातला आणि वयातला, आणि प्रत्येक धंद्यातला आणि नोकरीतला माणूस; या ना त्या कारणास्तव नामस्मरणाकडे वळत आहे आणि त्यात मुरत आहे!
रेड़िओ-दूरदर्शनवर नामस्मरणाचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात प्रसारित होऊ लागले आहेत. नामस्मरणाची महती गाणारी गीते, पदे, कविता, भजने वारंवार वेगवेगळ्या उत्सवांतून आणि समारंभांतून ऐकू येऊ लागली आहेत. देशविदेशांतून कीर्तनकार, रामकथाकार, भागवत कथाकार यांना मागणी वाढत आहे. वेगवेगळ्या दूरदर्शन मालिकांमधून नामस्मरणाचे गोडवे गायिले जात आहेत.
विशेष म्हणजे निर्हेतुक वृत्तीने आणि निष्काम भावनेने नामस्मरण केले असता; सर्वंकष वैयक्तिक आणि सामाजिक कल्याण कसे साध्य होते याचे विवरण करणारी पुस्तके, सीडीज, व्हिडीओ सीडीज मोफत वितरण केली जाऊ लागली आहेत आणि इंटरनेटवर मोफत डाऊन लोड साठी उपलब्ध केली जाऊ लागली आहेत. विशेष म्हणजे एरवी दुर्लक्षित राहणारी अशी ही पुस्तके लोक मोठ्ठ्या उत्सुकतेने आणि आस्थेने वाचत आहेत आणि सीडीज व व्हिडीओ सीडीज ऐकत आणि बघत आहेत!
नामस्मरण ही उतार वयात गलितगात्र झाल्यानंतर करण्याची किंवा रिकाम्या वेळात करण्याची, निरुपयोगी, निरुपद्रवी, दुर्लक्षित आणि कोपऱ्याताली बाब राहिलेली नाही. नाम आणि नामस्मरण ही जीवनाच्या नियंत्रक केंद्रस्थानी असल्याची जाणीव प्रकर्षाने होताना दिसत आहे. साहजिकच नामस्मरणाला सर्वाधिक महत्व आणि सर्वोच्च प्राधान्य आले आहे. जगभर नामस्मरणाचा अंत:करणपूर्वक स्वीकार, प्रसार आणि जयजयकार होत असून आपल्या सर्वांच्या वैयक्तिक आणि सामुहिक जीवनाची गाडी हजारो वर्षांच्या आणि हजारो लोकांच्या जन्मोजन्मीच्या पुण्याईने आज खऱ्या अर्थाने रुळावर येत आहे! ह्या सर्वंकष कल्याणालाच आपण चैतन्ययोग म्हणतो.
Rate It
नामात गोडी लागेपर्यंत: डॉ. श्रीनिवास जनार्
Posted by on Saturday, 22nd August 2015
नामात गोडी लागेपर्यंत: डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकर
विद्यार्थी: आमच्यासारख्या लाखो लोकांना नामात गोडी लागेपर्यंत आनंददायक आणि उत्साहवर्धक अशा कुंभमेळ्याचा आणि इतर अनेक रूढी परंपरांचा उपयोग आहे हे खरेच आहे!
शिक्षक: निश्चित! चैतन्यविस्मृतीच्या अंध:कारातून, गदारोळातून आणि तणावातून मुक्त होण्यासाठी चैतन्य स्मृती हेच उत्तर आहे ह्याची जाणीव अधिकाधिक प्रकर्षाने होत असल्याने कुंभ मेळ्यासारख्या सर्व प्रथांमध्ये देखील अंतरात्म्याचे स्मरण अर्थात नामस्मरण हे प्रधान कर्म बनत आहे. नामस्मरणाला कुणी जप, म्हणतो तर कुणी जाप, कुणी सुमिरन म्हणतो तर कुणी सिमरन, कुणी जिक्र म्हणतो तर कुणी अंतरात्म्याचे स्मरण. पण मथितार्थ एकच!
आनंदाची बाब अशी की; चैतन्यविस्मृतीच्या गडद अंध:काराचा अंत होऊन चैतन्याचा प्रकाश जगभर पसरू लागला आहे!
केवळ भारतच नव्हे तर चीन, पाकिस्तान, बांगला देश वगैरे इतर आशियाई देशात आणि आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, युरोप, अमेरिका आदि सर्व खंडांमध्ये घराघरातून नामस्मरणाविषयी कुतुहूल आणि जागृती वाढताना दिसते आहे. मालक, संचालक आणि व्यवस्थापक कर्मचाऱ्यांना, शिक्षक विद्यार्थ्याना, डॉक्टर रुग्णांना, प्रसिद्ध व्यक्ती त्यांच्या चाहत्यांना आणि नेते अनुयायांना; नामस्मरणाचे महत्व खऱ्या तळमळीने सांगू लागले आहेत. पालक त्यांच्या मुलांना अगदी मनापासून नामस्मरण करायला शिकवू लागले आहेत. आपआपल्या धर्मानुसार आणि परंपरेनुसार नामस्मरण करण्याची जणू काही एक प्रचंड आणि विश्वव्यापी त्सुनामी लाट आली आहे. विश्वचैतन्याचा अनुभव घेणे आणि तो इतरांना सांगणे ही आस्थेची, नित्याची आणि सार्वत्रिक बाब झाली आहे.
मंदिरामंदिरामधून नामजपाचे सप्ताह आणि अनुष्ठाने होऊ लागली आहेत. नामसाधना कशी करावी ह्याचे मार्गदर्शन करणारी नामसाधना शिबिरे होऊ लागली आहेत. केवळ धार्मिक ठिकाणी आणि अध्यात्मिक संस्थांमध्येच नव्हे तर वेगवेगळ्या कंपन्या, कारखाने, दवाखाने, दुकाने, प्रयोगशाळा, अंगणवाड्या, बालवाड्या, आश्रमशाळा, विद्यालये, महाविद्यालये, रुग्णालये, दवाखाने, सरकारी कार्यालये इत्यादी सर्वच ठिकाणी नामस्मरणाचा दिव्य प्रकाश पसरताना दिसत आहे. पोलीसांच्या चौक्यांमधून आणि सैनिकी संस्थांमधून देखील नामस्मरणाची संजीवनी आपले संजीवक काम करताना दिसत आहे.
शेतकरी, कष्टकरी, तंत्रज्ञ, कारागीर, क्रीडापटू, कलाकार, बुद्धीजीवी, व्यवस्थापक, शासनकर्ते, सत्ताधारी असे; सर्वच जण नामस्मरणाकडे आकर्षित होत आहेत. एवढेच नव्हे तर; आज ज्यांच्याकडे पूर्वग्रहदूषितपणामुळे तुच्छतेने किंवा तिरस्काराने पाहिले जाते अशा अनेक व्यवसायांमधले व्यावसायिक देखील नामस्मरण करू लागले आहेत!
Rate It
मधाचे बोट: डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकर
Posted by on Saturday, 22nd August 2015
मधाचे बोट: डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकर
विद्यार्थी: लहान मुलाने औषध घ्यावे म्हणून ज्याप्रमाणे मधाचे बोट लावतात तसेच नामस्मरणामध्ये गोडी निर्माण व्हावी म्हणून; कुंभ मेळ्यासारखे मेळे, तीर्थयात्रा, वाऱ्या, उत्सव, सण, व्रते, महापूजा, नैवेद्य, महाप्रसाद, भोग, भजने, आरत्या; इत्यादींची योजना केली गेली आहे का?
शिक्षक: निश्चित! “देव”, “परमात्मा”, “ब्रह्म”, परमेश्वर; “राम”, “कृष्ण”, “शिव”, इत्यादी वेगवेगळ्या शब्दांचा किंवा नावांचा गर्भितार्थ एकच आहे आणि तो म्हणजे नामाच्या द्वारे जी वस्तू ओळखली जाते ती अनादी आणि अनंत वस्तू. ह्या अर्थाने “नाम” हे अनादी आणि अनंत आहे. ते सर्वव्यापी आहे. सर्वांच्या अंतर्यामी आणि सर्वांच्या बाहेर आहे. त्याची सत्ता बलवत्तर आहे असे संत म्हणतात.
परंतु; धर्म हा सर्वांच्यासाठी असल्यामुळे; आणि आपण सर्वसामान्य लोक; विषय सुखात रमत असल्यामुळे; अखंड नामस्मरण करणे प्रत्येकाला शक्य नाही. हे लक्षात घेऊनच धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ ठरवले गेले आणि स्वीकारले गेले. त्याअनुरोधानेच; कुंभ मेळ्यासारखे मेळे, तीर्थयात्रा, वाऱ्या, उत्सव, सण, व्रते, महापूजा, नैवेद्य, महाप्रसाद, भोग, भजने, आरत्या; इत्यादीं प्रत्येक मनोवेधक, रंजक, आकर्षक आणि भव्य दिव्य बाबीत नामस्मरण ठेवून; क्रमाक्रमाने जीवनातले सर्व रस उपभोगत अखेर; अंतीम सत्य अनुभवण्याची सोय केली गेली.
एक लक्षात ठेवणे जरूर आहे. अंतीमत: नामस्मरणात रमलेले साधू; पराकोटीचे निस्पृह असून वस्तुनिरपेक्ष आनंदच उपभोगत असतात. त्यांना कोणत्याही बडेजावाची आणि बाह्य उपचारांची गरज नसते. आंतरिक चैतन्याने ओतप्रोत भरल्याने आणि सर्व सामर्थ्य अंगी असल्याने; ते कोणाचेच मिंधे नसतात. त्यांना कसलीच गरज नसते! ह्या परमोच्च अवस्थेला “नामात गोडी येणे”, किंवा “नामात रमणे” म्हणतात!
विद्यार्थी: याचा अर्थ; सर्वात श्रेष्ठ आणि मुख्य जर काही असेल तर नामस्मरण आहे, नामाची गोडी लागणे आणि नामात रमणे आहे. पण हे विधान सर्वांना लागू पडते का? जरा समजावून सांगा ना!
शिक्षक: अर्थातच! वीजपुरवठा खंडित झाला की ज्याप्रमाणे सर्वच बल्ब प्रकाशहीन आणि निरुपयोगी बनतात त्याप्रमाणे चैतन्यविस्मृतीमुळे; आपण सर्वच जण त्या चैतन्याला पारखे होतो आणि निस्तेज आणि दुबळे बनतो. विशेष म्हणजे; त्या चैतन्याची तहान आपल्या सर्वांना लागलेली असताना देखील; त्याच्या विस्मृतीमुळे आपण तृषाक्रांत राहून “रडत” असतो, किरकिरत असतो! चैतन्य प्रत्येकात आहे, त्याची तहान सर्वांना आहे आणि त्याच्या विस्मृतीची बाधाही सर्वांना आहे; म्हणूनच चैतन्यस्मरणाचा वा नामस्मरणाचा मार्ग आपल्या सर्वांसाठी आहे!
Rate It