वेगवेगळी देवस्थाने: डॉ. श्रीनिवास जनार्दन
Posted by on Saturday, 22nd August 2015
वेगवेगळी देवस्थाने: डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकर
विद्यार्थी: केवळ कुंभ मेळ्यामध्येच नव्हे तर आपल्याकडे जी वेगवेगळी देवस्थाने आहेत तिथला भपका देखील पुष्कळदा खटकतो.
शिक्षक: हे अगदी खरे आहे. आपल्या देशात कमालीची गरीबी आहे हे खरे आहे. त्यावर इलाज होणे अत्यावश्यक आहे हे देखील खरे आहे. पण समजा; असा झगमगाट बंद केला तर काय होईल? गरीबी दूर होईल? झगमगाटावरील पैसे गरीबांना वाटले तर ते श्रीमंत होतील? त्यांचे कल्याण होईल? त्यांचे कल्याण होणे म्हणजे तरी काय? केवळ पैसे मिळणे आणि ते वाट्टेल तसे उधळता येणे म्हणजे कल्याण होणे का?
विद्यार्थी: केवळ पैसे मिळणे म्हणजे कल्याण नव्हे. पण जेव्हां परिस्थिती आणीबाणीची आणि गंभीर असते; आणि समस्या जीवनमरणाची असते; तेव्हां गरीबांना ताबडतोब आणि थेट मदत मिळायला नको का? आपली परिस्थिती गंभीर नसल्यामुळे आपण गरीबांच्या हलाखीचा विचार करू शकत नाही! आपण फक्त गरीबीच्या मूळ कारणांचाच आणि केवळ त्यांवरील उपायांचाच विचार करतो.
शिक्षक: केवळ मूळ कारणांचा आणि त्यावरील उपायांचा विचार करणे अवास्तव आहे. पण; गरीबांना ताबडतोब मदत होणे हे जसे महत्वाचे आहे तसे; गरीबीची मूळ करणे दूर करणे देखील अत्यावश्यक आहे. खरे म्हणजे प्रत्यक्षात हे देखील एक चक्र आहे! गरीबीची समस्या केवळ गरीबीपुरती मर्यादित नाही. ती श्रीमंतीशी अविभाज्यपणे निगडीत आहे. आपल्या गरीबी आणि श्रीमंती; दोन्हींच्या मुळाशी तमोगुण आणि रजोगुण असून; त्यामुळे आपली गरीबी आणि आपली श्रीमंती दोन्ही विकृत बनल्या आहेत आणि परस्पर पूरक आणि परस्पर पोषक बनल्या आहेत! आपण सर्वचजण; गरीब असो वा श्रीमंत; दु:स्थितीतच आहोत! म्हणूनच आपल्या दु:स्थितीचे मूळ कारण (तमोगुण आणि रजोगुण) आणि तात्कालिक परिस्थिती या दोन्हींवर एकदमच उपाय करण्यासाठी नामस्मरण आणि तज्जन्य स्वधर्म हेच हवेत! केवळ तात्पुरत्या मदतीची ठिगळे लावून तात्पुरता आणि वरवरचा फायदा होईल खरा; पण केवळ तात्पुरती मदतच करीत राहिले तर तमोगुण आणि रजोगुण फोफावत जातील; आणि आपण आळस, बेपर्वाई, लाचारी, बेशिस्त, लबाडी, निर्दयता, वखवख, दिखाऊपणा, उथळपणा ह्यात तडफडत राहू! किंबहुना आज हेच चालले आहे!
नामस्मरणाने आंतरिक चैतन्याचा अनुभव येईल आणि आंतरिक सामर्थ्याची प्रचीती येईल. त्यातूनच स्वत:च्या आणि इतरांच्या कल्याणासाठी धैर्याने जगण्याचा आणि झटण्याचा उत्साह येईल. स्वधर्म प्रत्यक्षात येईल. जेव्हां जीवनाची सर्व क्षेत्रे आणि सर्व स्थळे; नामस्मरणाने भरून आणि भारून जातील; तेव्हां मंदिरांच्या एकांगी आणि अतिरिक्त झगमगाटाची गरज राहणार नाही.
Rate It
होम, हवन, अभिषेक इत्यादींचा विचार : डॉ. श्रीनि
Posted by on Saturday, 22nd August 2015
होम, हवन, अभिषेक इत्यादींचा विचार : डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकर
विद्यार्थी: कुंभ मेळ्यामध्ये होम हवन इत्यादींसाठी किंवा अभिषेकासाठी जी वेगवेगळ्या द्रव्यांची नासाडी होते, ती समर्थनीय आहे का? हा पैसा गोरगरीबांच्या आणि शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी वापरावा असे काही लोकांना वाटते. ते चूक आहे का?
शिक्षक: होम, हवन, अभिषेक इत्यादींचा विचार करताना देखील केवळ पाश्चिमात्य किंवा जडवादी विचारांच्या पगड्यामुळे आपला बुद्धीभेद होतो. अशा विचारांमुळे आपण प्रत्येक गोष्टीकडे वरवरच्या नफानुकसानीच्या उथळ दृष्टीकोनातून पाहतो. पूर्वग्रह विरहित समतोल वृत्तीने आणि सखोल दृष्टीने पाहिले तर; ह्या बाबींचे योग्य मूल्यमापन करता येईल. ते तसे करूनच त्यांविषयीची धोरणे ठरवायला हवीत. होम, हवन, इतर उपासना मार्ग आणि विशेषत: नामस्मरण; ह्यांचा आपले आत्मसामर्थ्य वाढण्यासाठी, आंतरिक समाधानासाठी म्हणजेच उर्ध्वगामी उत्क्रांतीसाठी किती उपयोग होतो हे नीट अभ्यासले पाहिजे. तरच शेतकरी आणि इतर गोरगरीबच नव्हेत तर आपल्या सर्वांनाच आंतरिक चैतन्य आणि बाह्य परिस्थिती; दोन्हींमध्ये प्रगती साधणे शक्य होईल, जे अत्यंत आवश्यक आहे. सरकार आणि आपण सर्वांनी; ह्याच दृष्टीने काम करायला हवे.
होम, हवन, अभिषेक इत्यादी बाबींचा मी सखोल अभ्यास केलेला नाही आणि तसा तो न करता, आपल्या पूर्वजांना मूर्ख, निर्दय वा दुष्ट समजून त्यांची आणि ह्या सर्व पूजा विधींची निंदा, निर्भत्सना व निषेध करणे मला योग्य वाटत नाही. पण त्याचबरोबर; त्यांचे सरसकट समर्थन करणेही योग्य वाटत नाही. ह्या सर्व बाबींचा योग्य तो निवाडा होण्यासाठी नामस्मरण सार्वत्रिक व्हावे असे मला वाटते. तसे झाले तर आपल्यातील अनेकांच्या द्वारे; अनेक गूढ आणि रहस्यमय बाबींचा खुलासा होऊ शकेल असे मला वाटते.
विद्यार्थी: जीवनाच्या विविध अंगांकडे नि:पक्षपाती, सकारात्मक आणि विधायक दृष्टीने पाहण्यासाठी नामस्मरण अत्यंत महत्वाचे आहे हे मला पटते. पण ते वरपांगी भासते तेवढे सोपे नाही; खरे ना?.
शिक्षक: होय. एका दृष्टीने नामस्मरण हे अगदी सोपे आहे. पण त्याबद्दल गोडी आणि निष्ठा उत्पन्न होण्याच्या दृष्टीने पाहता, ते अत्यंत कठीण आहे. कारण, त्याला चव, रंग, सुवास, मुलायम स्पर्श, सुरेल कर्णमधुरता; काहीच नाही. ते असे सोपे आणि उपाधीशून्य असल्यामुळे त्याबद्दल आवड आणि आस्था तयार होणे कठीण असते. एवढेच नव्हे तर नामस्मरणाने आपला अहंकार देखील फुलत नाही! त्यामुळेच नामस्मरण करताना कंटाळा येतो, खूप शंका येतात आणि खूप विकल्प येतात, जे कितीही चर्चा केली तरी नाहीसे होत नाहीत; तर नामस्मरण केल्यानेच नाहीसे होतात.
Rate It
आपापली मते: डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकर
Posted by on Saturday, 22nd August 2015
आपापली मते: डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकर
विद्यार्थी: कुंभ मेळ्याविषयी बोलताना; नामस्मरणात केलेले कार्य सत्कारणी लागते आणि नामविस्मरणात केलेले वाया जाते; असे आपण म्हणालात. पण पुष्कळदा सामान्य माणसे यासंदर्भातील सरकारी धोरणांच्यावर आपापली मते प्रदर्शित करतात, टीका-टिप्पणी करतात. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
शिक्षक: आपण सर्वच जण सामान्य आहोत. आपल्याला कोणत्याही गोष्टीची थोडीफार जरी झळ लागली तरी आपण तक्रार करतो आणि थोडासा जरी फायदा झाला तरी सरकारचा उदो-उदो करतो. आपली मुले-बाळे, आपले आप्त-स्वकीय, आपले मान-अपमान, आपला फायदा-तोटा; ह्यांभोवती आपली मते फिरतात. त्यामुळे; आपणा सर्वांना लोकशाही कितीही श्रेष्ठ वाटत असली तरी; आपण व्यक्त केलेली प्रत्येक टीका-टिपण्णी आणि व्यक्त केलेले प्रत्येक मत विचारात घ्यायच्या लायकीचे असतेच असे नाही, हे इतरांप्रमाणेच आपल्याला देखील पक्के माहीत असते.
विद्यार्थी: याचा अर्थ; सामान्यांची मते लक्षात घेतली जाऊ नयेत असा घ्यायचा का?
शिक्षक: सामान्यांची मते नक्कीच लक्षात घेतली जायला हवीत. पण त्यांच्या कल्याणाच्या दृष्टीने; त्यांच्या मतांना किती महत्व द्यायचे हे नामस्मरण करणाऱ्या शासकांना बरोबर कळते. ते लोकापवाद किंवा लोकप्रियता यांनी दबून वा बहकून जात नाहीत. लोकप्रतारणा करीत नाहीत आणि लोकानुनय देखील करीत नाहीत. कारण; नामस्मरणाद्वारे; चित्त शुद्ध होत चाललेले वा झालेले शासक; जेव्हां एखादे धोरण आंखतात, एखादा विचार करतात, एखादा संकल्प करतात, एखादी योजना आखतात, किंवा एखाद्या योजनेची अंमलबजावणी करतात, तेव्हां ते सारे नि:स्वार्थ भावनेतून, भेदभाव रहित वृत्तीतून होत असते. ते सारे थेट गुरुमार्फत, विश्वचैतन्याच्या जननीमार्फत वा ईश्वरामार्फत घडत असते. त्यामुळे ते चैतन्याकडे वा ईश्वराकडे नेणारे असते. आणि म्हणून ते विश्वकल्याणाचेच असते. जेव्हा असे लोक; शस्त्रसत्ता, राजसत्ता, अर्थसत्ता, आरोग्यसत्ता, उद्योगसत्ता, शिक्षणसत्ता अशा सर्व सत्तास्थानी येतात आणि राज्य करतात, तेव्हां त्या राज्यालाच रामराज्य म्हणतात.
कुंभ मेळाच नव्हे तर इतर यात्रा व उत्सवांबद्दल निस्वार्थपणे टीका-टिप्पणी करण्यासाठी व लोकशाही खऱ्या अर्थाने लोककल्याणकारी आणि बळकट करण्यासाठी, आपल्यासारख्या सामान्य लोकांचे विचार देखील नामस्मरणाच्या योगाने; संकुचित कोशातून बाहेर आले पाहिजेत. अशा तऱ्हेने आपण निस्वार्थी आणि विशाल बनलो तरच; चांगल्या नेतृत्वाला समजून घेऊन बळ देऊ शकू किंवा स्वत: चांगले नेते बनू शकू!
Rate It
खरी सत्ता कुणाकडे असते? डॉ. श्रीनिवास जनार्&
Posted by on Saturday, 22nd August 2015
खरी सत्ता कुणाकडे असते? डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकर
विद्यार्थी: पुष्कळदा असा प्रश्न पडतो, की कुंभ मेळ्यामधील साधू सरकारच्या सहानुभूतीवर अवलंबून असतात. जर ते सत्याचे पुजारी असतात, तर मग त्यांच्याकडे एवढे सामर्थ्य का नसते? सत्यमेव जयते असे म्हणण्याला काय अर्थ आहे? खरी सत्ता कुणाकडे असते? त्यांच्याकडे की सरकारकडे?
शिक्षक: कुंभ मेळ्यातील साधक आणि साधू; सत्याचे पुजारी असतात, पथिक असतात. ते साक्षात्कारी असतात असे नव्हे. पण म्हणून सरकारच्या हातात सत्ता असते असे थोडेच आहे?
आपल्यापैकी काहीजणांनी राष्ट्रपतींचे निवासस्थान, पंतप्रधानाचे निवासस्थान, लोकसभा, इतर शासकीय कार्यालये इत्यादी सत्तेची केंद्रे पाहिली असतील. पण बाहेरून कितीही बडेजाव आणि भपका दिसला तरी त्या सत्ताकेंद्रामध्ये खरी सत्ता कुणाची चालते? ज्यांना आपण सर्वसत्ताधीश समजतो त्यांची? ते खरोखर सर्वसत्ताधीश असतात का?
राष्ट्रपती, पंतप्रधान आणि इतर उच्चपदस्थांचे देह, त्यांची बुद्धी, त्यांचे विचार, त्यांच्या कल्पना, त्यांचे मन, त्यांच्या वासना हे सारे त्यांच्या अधीन असते का? त्यांची सत्ता त्यांच्या स्वत:च्या विचारांवर, भावनांवर आणि वासनांवर तरी चालते का? नाही! रोग, अपघात, वृद्धत्व, मृत्यू इत्यादिंवर त्यांची सत्ता चालते का? त्यांच्या शरीरातील हजारो प्रक्रियांवर त्यांचे नियंत्रण असते का? नाही! समाजातील वेगवेगळ्या प्रथा, रूढी, परंपरा, रीतिरिवाज किंवा एकूण समाजाच्या सामुहिक भावना, त्यांचे उद्रेक, समाजाचे आचार, यांवर त्यांचा अंमल चालतो का? नाही! भूकंप, वादळे, महापूर, दुष्काळ यांवर त्यांचा अंमल चालतो का? नाही! पृथ्वीबाहेरील विश्वात घडणाऱ्या असंख्य घडामोडींवर त्यांचे नियंत्रण असते का? नाही!
मग आपल्यावर, आपल्या सर्वांवर आणि ह्या अखिल विश्वावर कुणाची सत्ता चालते?
जे चैतन्य अजरामर आणि सर्वान्तर्यामी आहे त्याच्या जननीची! ही विश्वाची गुरुमाऊलीच व्यावहारिक दृष्ट्या भिन्न अशा वेगवेगळ्या रुपांनी आपल्याला पाळते, पोसते, सांभाळते आणि सर्वार्थांनी नियंत्रित करते!
नामस्मरण करता करता आपला संकुचित स्वार्थ कमी कमी होत जातो पण खूप खूप आणि अजरामर समाधान देणारा महान स्वार्थ साधतो! म्हणून ह्या मार्गाला परमार्थ मार्ग म्हणतात! ही सारी लीला चैतन्यसत्तेनेच घडून येते!
नामरूप असलेल्या आपल्या गुरुमाउलीशी अशा तऱ्हेने झालेल्या समाधानरूप समरसतेमध्ये समजते की; सदा सर्वदा आणि सर्वत्र; केवळ आपल्या गुरूची, ईश्व्रराची, अंतरात्म्याची,
परमात्म्याची, आंतरिक चैतन्याचे म्हणजेच नामाची ईच्छा आणि सत्ताच काम करते! यालाच आपण राम कर्ता असे म्हणतो.
Rate It
कोणत्या गोष्टी सत्कारणी लागतात? डॉ. श्रीनि
Posted by on Saturday, 22nd August 2015
कोणत्या गोष्टी सत्कारणी लागतात? डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकर
विद्यार्थी: कुंभ मेळ्यावर विनाकारण वेळ, पैसा आणि शक्ती यांचा अपव्यय होतो असे म्हटले जाते. तुमचे काय मत आहे? किंबहुना; आपण ज्या ज्या गोष्टी करतो, त्यातल्या कोणत्या गोष्टी सत्कारणी लागतात आणि कोणत्या वाया जातात; हे कसे ठरवायचे?
शिक्षक: ज्या लोकांना ह्या प्रश्नाचे उत्तर सापडले, त्यांना; संत, साधू, महात्मा, ऋषी, मुनी, तत्ववेत्ते, योगी, महायोगी, ज्ञानी इत्यादी म्हणतात. सत्याचा साक्षात् अनुभव घेतलेल्या लोकांना सद्गुरू म्हणतात. त्यांनी मोठ्या उदार अंत:करणाने आणि आत्मीयतेने त्यांना सापडलेले उत्तर आपल्याला सांगितले आहे.
सत् म्हणजे सत्य. “सत्कारणी” लागणाऱ्या गोष्टी म्हणजे; सत्याकडे नेणाऱ्या आणि सत्यामध्ये समरस होण्यामध्ये उपयोगी पडणाऱ्या गोष्टी!
आपण रोज प्रातर्विधी करतो, आंघोळ करतो, पूजा करतो, कपडे धुतो, घरातली साफसफाई करतो, व्यायाम करतो, स्वयंपाक करतो, नोकरी-धंदा करतो, नफा कमावतो, नाव कमावतो, राजकारण करतो, सत्ताकारण करतो, मनोरंजन करतो आणि ह्याशिवाय असंख्य बऱ्या-वाईट गोष्टी करतो. ह्यातल्या कोणत्या गोष्टी आपल्याला सत्याकडे पोचवतात; म्हणजेच “सत्कारणी” लागतात? शिक्षण, क्रीडा, करमणूक, व्यापार, उद्योग, शेती, आरोग्यसेवा, संगीत, नाट्य; अशा कोणत्याही बाबीकडे पहा. ह्यातल्या ज्या ज्या गोष्टी आपण नामविस्मरणात करतो, त्या त्या आपल्याला आपल्या अंतरात्म्यापासून म्हणजेच सत्यापासून परावृत्त करतात आणि दूर लोटतात! म्हणजेच त्यांत घातलेले पैसे, श्रम आणि वेळ वाया जातात, व्यर्थ जातात, फुकट जातात!
वास्तविक; आपले अंतर्बाह्य व्यापणारे चैतन्य आपल्या अंत:करणातल्या आकाशात निरंतर बरसत असते. मनुष्य कोणत्याही धर्माचा, पंथाचा, जातीचा, देशाचा, वंशाचा, व्यवसायाचा वा वयाचा असो, याला अपवाद असत नाही. त्याचप्रमाणे मनुष्य व्याधीग्रस्त असो वा निरोगी, अपंग असो वा धडधाकट, अशक्त असो वा सशक्त, व्यसनी असो वा निर्व्यसनी, अपराधी असो वा निरपराधी आणि गरीब असो वा श्रीमंत याला अपवाद असत नाही. अगदी जगभरातल्या बलाढ्य देशांचे अध्यक्ष, पंतप्रधान आणि सेनानी देखील याला अपवाद असत नाहीत! पण आपण; आपल्याच हृदयात बरसणाऱ्या ह्या चैतन्याच्या विस्मृतीमुळे ते इतके नजीक असतानाही त्याला ओळखत नाही आणि त्याचे महत्व जाणत नाही! उलट; त्याला पारखे होऊन चैतन्यतृष्णाक्रांत होऊन चैतन्याच्या एका एका थेंबासाठी कासावीस होत असतो, तडफडत असतो!
नामस्मरण म्हणजेच चैतन्याचे, सत्याचे स्मरण. त्याची जोड मिळाली की, आपली प्रत्येक कृती सत्कारणी लागते आणि त्याची जोड मिळाली नाही तर; म्हणजेच नामाच्याविस्मरणात; आपली प्रत्येक कृती वाया जाते!
Rate It