संजीवक परिणाम: डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळी
Posted by on Wednesday, 19th August 2015
संजीवक परिणाम: डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकर
विद्यार्थी: सर, ह्या कुंभ मेळ्याच्या निमित्ताने; आपल्या संपूर्ण वैयक्तिक आणि सामाजिक जीवनावर होणारे; नामस्मरणरुपी अमृतमंथनाचे संजीवक परिणाम मला तपशीलवार समजावून घ्यायचे आहेत!
शिक्षक: तुझी जिज्ञासा मला फारच कौतुकास्पद वाटते. एरवी; काहीजण कुंभमेळ्याकडे धार्मिक कडवेपणाने पाहतात, काहीजण न्यूनगंडातून पाहतात, काहीजण तुच्छतेने पाहातात, काहीजण भाबड्या भक्तिभावाने पाहतात, काही जण राजकीय फायद्या-तोट्याच्या दृष्टीने पाहतात, तर काहीजण आर्थिक नफ़ा-नुकसानीच्या दृष्टिकोनातून पाहतात. याशिवाय, काहीजण अचंबित होऊन पाहतात तर काहीजण भारावून जाऊन पाहतात. पण निखळ जिज्ञासेने आणि तितक्याच प्रामाणिकपणे क्वचितच कुणी कुंभ मेळ्याचा आणि एकूण समाजकल्याणाचा अभ्यास आणि विचार करतो!
नामस्मरणाने नामाशी म्हणजेच आपल्या अंतरात्म्याशी किंवा ईश्वराशी म्हणजेच अमृताच्या उगमाशी आपले नाते जुडते. किंबहुना आपले विचार, भावना, वासना आणि आपल्या कृती म्हणजेच आपला धर्म किंवा स्वधर्म येथूनच उगम पावतो किंवा प्रगट होतो. परिणामी; आपण आपापल्या क्षेत्रात अत्युत्तम काम करून कृतार्थ होऊ लागतो. ह्या कृतार्थतेमध्ये वैयक्तिक जीवनाचे जसे सार्थक आहे, तसेच वैश्विक सामाजिक जीवनातील सलोखा आणि सुसंवाद आणि सहकार्य आहे. म्हणूनच नामस्मरण, स्वधर्म आणि विश्वधर्म हे अतूटपणे संलग्न आहेत!
नामस्मरणरुपी अमृतमंथनातूनच विश्वकल्याणाची दृष्टी, इच्छा, विचार, योजना, धोरणे आणि कार्यक्रम प्रभावीपणे आविष्कृत होतात. उलटपक्षी, आपण जे जे करतो, ते ते, जर नामस्मरणरुपी अमृताची प्राप्ती करून देत असेल तर खरोखर व्यक्ती आणि समाजाच्या संपूर्ण कल्याणाचे होत असते हे देखील तेवढेच खरे!
विद्यार्थी: तुम्ही जे सांगता आहात, त्यावरून असे जाणवते आहे की, खरोखरच नामस्मरणाइतकी अहिंसक, सर्वतोपरी कल्याणकारी, पवित्रतम आणि त्याचबरोबर सामर्थ्यशाली अशी कृती नाही! विद्यार्थी: एका अर्थाने पाहिले तर; नामस्मरणाची शिकवण हा एक महान अमृतकुंभच आहे!
शिक्षक: नामस्मरण रुपी अमृतमंथन पुन्हा पुन्हा आपल्याला संजीवनी देत राहते आणि आपल्याकरवी अमृताचे सिंचन घडवून आणीत राहते! कुंभमेळ्याच्या मागील कल्याणकारी हेतू जपायचा आणि जोपासायचा असेल तर सर्वंकष कल्याण साधणारऱ्या नामस्मरणाला; अनन्यसाधारण महत्व आहे. ज्या देशात करोडो लोक दारिद्र्यरेषेच्या खाली जगतात त्या देशात तर नामस्मरणरुपी अमृताचे महत्व आणखीच जास्त आहे!
Rate It
ह्या म्हणण्याला काय अर्थ आहे? डॉ. श्रीनिवास &
Posted by on Wednesday, 19th August 2015
ह्या म्हणण्याला काय अर्थ आहे? डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकर
विद्यार्थी: खरोखर आपण अमर होऊ शकतो का? की हा एक भ्रम आहे? जर आपण मुळात मर्त्य असू तर अमर कसे होणार? आपल्या अस्तित्वाचा कोणता मर्त्य पैलू अमर होतो? आजपर्यंत अशा तऱ्हेने कोण अमर झाला आहे? उलटपक्षी; मुळात जर आपण “अमर” असू, तर मी “अमर होतो” ह्या म्हणण्याला काय अर्थ आहे?
शिक्षक: वास्तविक पाहता; आपण पूर्णपणे मर्त्यही असत नाही आणि पूर्णपणे अमर देखील असत नाही! आपल्या अस्तित्वाचा काही भाग मर्त्य असतो आणि काही भाग अमर असतो. पण; नामविस्मरणामुळे आपण मर्त्य भागाशी (जडत्वाशी) तद्रुप होऊन राहिल्यामुळे; अमरत्वाच्या (चैतन्याच्या) अनुभवाला मुकलेले असतो! परिणामी; आपण मर्त्य आणि संकुचित बनून संकुचित ध्येय, संकुचित विचार, संकुचित स्वार्थ यांच्या योगे; मर्त्य आणि संकुचित अवस्थेतच (अमरत्वाच्या अनुभवाविना) मरून जातो! नामस्मरणाने आपण आपल्यातील चैतन्याशी जोडले जातो. जडत्व कमी होत गेले की देहबुद्धी कमी होते म्हणजेच संकुचितपणा, क्षुद्रपणा, हीनपणा म्हणजेच पाप कमी होते!
अशा तऱ्हेने होणाऱ्या पापाच्या मुक्तीचेच दुसरे नाव म्हणजे सम्यक उत्क्रांती. अशा उत्क्रांतीमधूनच आपले व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने प्रगल्भ होते. आपले दृष्टिकोन, विचार, भावना, वासना आणि वागणूक कल्याणकारी होतात! म्हणूनच नामस्मरण करीत राहिल्यानेच आणि ते करता करता; आपण नावापुरते आस्तिक किंवा नास्तिक राहत नाही, संकुचित राहत नाही, तर विशाल होतो. आपण; सर्वांचे, संपूर्ण कल्याण साधण्यामध्ये; स्वत:ला झोकून दिलेले प्रकाशयात्री होतो, कल्याणयात्री होतो!
या प्रगल्भतेतूनच आपल्या स्पष्टपणे लक्षात येते; की नामविस्मरणामुळेच आपण संकुचित, उथळ आणि हीन बनलो होतो व नामविस्मरणामुळेच आपल्या जीवनात सर्वत्र आसुरी शक्तींचे थैमान सुरु होते! नामविस्मरण म्हणजे स्वत:ला विसरणे, म्हणजे स्वत:पासून तुटणे म्हणजे एक प्रकारचा आत्मद्रोह आहे. किंबहुना ते एक प्रकारचे मरणच आहे. म्हणूनच नामविस्मरण हा आत्मघात आहे. खरे पाहिले तर नामविस्मरण ही आत्महत्या आहेच; पण त्याहीपेक्षा जास्त म्हणजे नामविस्मरणामुळे स्वत:बरोबरच इतरांचे देखील चैतन्य संपून जाण्यास आणि त्यांचे अध:पतन होत होत; सर्वनाश होण्यास आपण कारणीभूत होतो. ह्या अर्थाने आपल्याला असेही म्हणता येईल की नामविस्मरण ही सर्वात मोठी पण सर्वात नजरेआड झालेली किंवा दुर्लक्षित राहिलेली अशी सर्वंकष हिंसा आहे!
Rate It
व्यक्ती आणि समाज ह्यांचे कल्याण : डॉ. श्रीनि&
Posted by on Wednesday, 19th August 2015
व्यक्ती आणि समाज ह्यांचे कल्याण : डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकर
विद्यार्थी: सर, व्यक्ती आणि समाज ह्यांचे कल्याण परस्परावलंबी आहे?
शिक्षक: होय तर! व्यक्ती आणि समाजव्यवस्था हे एक अखंड असे चक्रच आहे. व्यक्तीपासून सुरुवात केली तर; व्यक्तीचे शरीर, संवेदनाशीलता, वासना, भावना, कलात्मकता, सर्जनशीलता, उद्यमशीलता विचार, दृष्टिकोन, विचारप्रणाली, नेतृत्व, सत्ता, धोरणे, कायदे, नियम, योजना, कार्यक्रम, प्रत्यक्ष अंमलबजावणी; तसेच प्रथा, रूढी, संकेत, आणि ह्या सर्वांचे यांचे व्यक्तीवर होणारे परिणाम; म्हणजे अखेर व्यक्तीपर्यंत आपण येऊन पोचतो! असे हे एक अखंड चक्र आहे! नामस्मरणामुळे व्यक्ती आणि समाजव्यवस्थेचे अखंड चक्र नवचैतन्याने संजीवित होते! नामस्मरण हे सर्वांना सुलभ आहे. सर्वांना स्वीकारार्ह आहे. किंबहुना नामस्मरण हे संपूर्ण आरोग्याचे, संपूर्ण विकासाचे, संपूर्ण उत्क्रांतीचे आणि संपूर्ण कल्याणाचे गमकही आहे आणि लक्षण देखील आहे!
विद्यार्थी: हे सर्व ठीक आहे. पण, नामस्मरणाने आपण व्यक्तीश: समाधानी होऊ शकतो हे पटकन अंगवळणी पडत नाही!
शिक्षक: खरे आहे! कोणत्याही वस्तूचा उपयोग आणि उपभोग आपल्या नेहमीच्या अनुभवातला असला, तर समजणे सोपे असते. कुंभ मेळ्यामध्ये जाणे, देवदर्शन करणे, साधुदर्शन करणे, तेथे स्नान करणे, पूजा करणे, प्रसाद खाणे, एकमेकांना भेटणे, परस्परांशी बोलणे; अशा बाबी नेहमीच्या अनुभवातल्या असल्यामुळे पटकन समजतात आणि पटतात.
पण नामस्मरणाचे तसे नाही. नामस्मरणाचा अनुभव “समजत” नाही! नामस्मरण करूनच तो घेता येतो. वर्णन करून तो देता-घेता येत नाही! नामस्मरण करता करता आपली संवेदना, वासना, भावना आणि बुद्धी स्वत:च्या क्षुद्र गरजा, मागण्या, आवडी, छंद, लहरी, अभिनिवेश, पूर्वग्रह यातून सुटतात आणि नामाशी म्हणजेच सच्चिदानंदाशी निगडित होत जातात म्हणजेच मुक्त होत जातात.
विद्यार्थी: या विवेचनाचा शरीक्रियाशास्त्राशी काही संबंध आहे का?
शिक्षक: तुझा प्रश्न एकदम रास्त आहे! होय! ह्या विवेचनाचा शरीक्रियाशास्त्राशी निश्चित संबंध आहे! शरीरक्रियाशास्त्राच्या दृष्टीने पाहिल्यास; आपल्या वासना, भावना, विचार हे सर्व (आपण); नामाशी निगडित होत जाता जाता आपल्या शरीरातील वेगवेगळ्या रासायनिक आणि अंतस्त्रावी क्रिया-प्रतिक्रिया, चयापचयाच्या क्रिया, मज्जासंस्थेतील घडामोडी आणि व्यक्ती-व्यक्तीमधील परस्पर संबंध यांच्या प्रभावातून मुक्त होतात. यालाच देहबुद्धीचा प्रभाव कमी होणे म्हणतात. देहबुद्धी कमी होणे म्हणजेच पाप कमी होणे!
Rate It
कुंभमेळ्याच्या निमित्ताने : डॉ. श्रीनिवास
Posted by on Wednesday, 19th August 2015
कुंभमेळ्याच्या निमित्ताने : डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकर
विद्यार्थी: सर, नामस्मरण हा सर्वांच्या कल्याणाचा पर्यायी मार्ग आहे असे गृहीत धरले तरी, कुंभमेळ्याच्या निमित्ताने त्या त्या ठिकाणी वेगवेगळी साधने, योगाचे प्रकार, यज्ञ, होम, हवन, पूजा-अर्चा, अनुष्ठाने, व्रत-वैकल्ये ह्यांची माहिती सामान्य लोकांनाही होते हे देखील खरे आहे ना?
शिक्षक: होय! कुंभ मेळ्याच्या निमित्ताने अंतीम सत्याचा किंवा अमरत्वाचा अनुभव घेण्यासाठी वेगवेगळे साधन मार्ग अवलंबणारे साधू, साधक, बैरागी, योगी, महंत एकत्र जमतात हे अगदी खरे आहे. त्यांच्याकडून बरेच काही शिकायला मिळते हे देखील खरे आहे. पण हे सगळे शिकत असताना आपली सदसद्विवेकबुद्धी जागी असणे अत्यावश्यक असते. त्याचप्रमाणे तरतमभाव ठिकाणावर असणे महत्वाचे असते. त्याच बरोबर कुंभ मेळ्यामध्ये देखील काय श्रेयस्कर आहे आणि काय हानिकारक आहे हे नीट समजले पाहिजे. खरे ना?
विद्यार्थी: होय. खरे आहे.
शिक्षक: आपली बुद्धी नि:पक्षपाती आणि निस्वार्थी होण्यासाठी नामस्मरण अत्यंत महत्वाची भूमिका बजावते. नामस्मरणाने आपला संकुचितपणा, क्षुद्र स्वार्थ, पूर्वग्रह, अभिनिवेश, द्वेष, अहंकार इत्यादी दुर्गुण हळूहळू पण निश्चित गळून पडतात. अशा तऱ्हेने बुद्धी आणि दृष्टी स्वच्छ झाल्यामुळे सत्य जाणून घेणे आणि अनुभवणे शक्य होते! त्यामुळे कुंभ मेळाच नव्हे तर जीवनातली प्रत्येक गोष्ट यथार्थपणे समजण्याची आणि कुवत नामस्मरणाने येते. त्याद्वारेच अखेर सत्य समजणे आणि अनुभवणे शक्य होते! फार काय सांगू? आपण सतत नामस्मरण केल्याने अशी विधायक उर्जा तयार होते की तिच्यामुळे कुंभ मेळ्यामधील असंख्य लोकांना देखील उन्नत होण्यासाठी जोर मिळू शकतो!
विद्यार्थी: नामस्मरण केल्यामुळे अंतीमत: अमरत्वाचा अनुभव येत असला तरी नामस्मरण करता करता; संपूर्ण समाजाचे कल्याण होते असे आपण जे म्हणता ते मला अधिक स्पष्ट करून सांगा.
शिक्षक: नामस्मरणाने समाजाचे कल्याण कसे होते ह्याला जीवशास्त्रातील एक उदाहरण घेतले तर समजायला सोपे जाईल.
ज्याप्रमाणे आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीच्या उत्तम आरोग्यातून आपले म्हणजे संपूर्ण व्यक्तीचे आरोग्य सिद्ध होते, त्याचप्रमाणे नामस्मरणाने आपल्या वैयक्तिक जीवनात जे सच्चिदानंद वैभव प्रगट होते ते वैभव संपूर्ण समाजात देखील आविष्कृत होते. उलटपक्षी; ज्याप्रमाणे आपल्या संपूर्ण वैयक्तिक आरोग्याने आपल्या शरीरातील पेशी आरोग्यसंपन्न होतात, त्याचप्रमाणे समाजात जे सच्चिदानंद वैभव आविष्कृत होते, ते प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात देखील अवतरते!
Rate It
लोककल्याणाचा पर्यायी मार्ग : डॉ. श्रीनिवास
Posted by on Wednesday, 19th August 2015
लोककल्याणाचा पर्यायी मार्ग : डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकर
शिक्षक: कुंभ मेळ्यामध्ये पोचणे कोट्यावधी गरीब, आजारी, वृद्ध, अपंग व नाजूक स्थितीतील लोकांना शक्य होत नाही हे अगदी खरे आहे! त्याचप्रमाणे कोट्यावधी लोकांची कुंभ मेळ्याच्या जागी सोय करणे हे सरकारला देखील वेगवेगळ्या राजकीय, सामाजिक व आर्थिक परिस्थितीत शक्य असेलच असे नाही. साहजिकच कुंभ मेळ्यामध्ये आणि इतर तीर्थक्षेत्रांमध्ये देखील अन्न, पाणी, निवारा, शौचालये, स्नानगृहे, सुरक्षा इत्यादिंची सोय करणे सरकारला शक्य होईलच असे नाही! अशा वेळी लोककल्याणाचा पर्यायी मार्ग तयार असणे आणि माहीत असणे अत्यंत महत्वाचे आहे!
विद्यार्थी: तुमच्या मते नामस्मरण हा असा पर्यायी मार्ग आहे?
शिक्षक: होय! नक्कीच! ह्या सर्व बाबींचा विचार केला तर, नामस्मरण हा निव्वळ पर्यायी मार्गच नव्हे तर, नामस्मरण स्वीकारणे, आचरणात आणणे, आणि त्याचा प्रसार करणे ही आज आपल्या सर्वांसाठी एक दैवदुर्लभ अशी सुवर्ण संधी आहे. किंवा अन्य शब्दांत सांगायचे तर ही खरोखर ईश्वराची अजिंक्य, अजेय आणि सर्वसत्ताधीश अशी कृपाच आहे!
विद्यार्थी: तुम्ही म्हणता ते मी नाकारत नाही. पण नामस्मरण हे संपूर्ण समाजाचे कल्याण कसे करते?
शिक्षक: सर्वसामान्यपणे (नामविस्मरणामुळे) आपली उर्जा, आपले संकल्प, आपली कृती ही आपल्यातील जडत्वाकडे म्हणजेच वैयक्तिक आणि संकुचित स्वार्थाकडे खेचली जात असते. अशा तऱ्हेने लाखो लोकांची उर्जा, संकल्प आणि कार्य जेव्हां संकुचित स्वार्थाच्या दिशेला वळतात, तेव्हां त्यातून स्वार्थांध आणि समाजद्रोही धोरणे, रूढी, परंपरा, कायदे, नियम, संकेत, योजना, कार्यक्रम इत्यादी तयार होतात! यातूनच सामूहिक अवनती होते. याउलट नामस्मरणाच्याद्वारे आपले विचार, आपल्या भावना, आपल्या वासना, आपली शक्ती आणि आपले संकल्प; उदात्त बनतात आणि आणि सामुहिक कल्याणाच्या दिशेने वळतात! अशा तऱ्हेने लाखो लोकांचे विचार, भावना, वासना, शक्ती आणि संकल्प; एकत्र काम करू लागले, की समष्टीच्या कल्याणाचे भव्य दिव्य पर्व सुरु होते!
अणुबॉम्ब किंवा हैड्रोजनबॉम्ब ह्या विनाशक बॉम्बनी एकाच वेळी लाखो लोक मरतात; तर नामस्मरण ह्या “विधायक बॉम्बने” एकाच वेळी लाखो लोक उन्नत होतात!
युद्धाच्यावेळी रणभेरी वाजू लागल्या की योद्ध्यांच्या अंगात जशी एकदम वीरश्री संचारते, तसे, नामस्मरणाने लाखो जीवांच्या आंत कळत-नकळत एकदम चैतन्य संचारते! आपण नामस्मरण करू लागलो की आपल्यालाच नव्हे तर संपूर्ण समाजाला अंतर्बाह्य व्यापणारी; उर्ध्वगामी उत्क्रांती सुरु होते.
Rate It