गोंदवलेकर महाराज मला समजलेले १३. प्रपंचात
Posted by on Sunday, 21st August 2016
१३. प्रपंचात खरी विश्रांती डॉ. श्रीनिवास कशाळीकर
श्री. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात, “ सगळ्या प्रपंचात खरी विश्रांती असेल तर ती नामस्मरणातच आहे”.
आपल्या परीने कितीही मौजमजा केली किंवा आपल्या स्वत:च्या किंवा आईवडिलांच्या महत्त्वाकांक्षेनुसार अर्थकारण, समाजकारण, राजकारण, धर्मकारण केले, तरी यश मिळो वा अपयश ते तात्कालिक आणि वरवरचे असल्याने आपले समाधान होत नाही! साहजिकच अश्या तऱ्हेने जेव्हा समाधान होत नाही, तेव्हा अस्वस्थता येते!
प्रथम अस्वस्थता, मग अभ्यास, मग शोध, मग नामाची ओळख, मग संशय, मग द्वंद्व, मग चिकित्सा, मग थोडे थोडे नामस्मरण, मग वासना आणि नाम यांच्यातली रस्सीखेच, वासनेमागून फरफट, बळजबरीचे नामस्मरण, हळु हळु नामाच्या महानतेची वाढती समज, मग नामस्मरणाचा सक्रीय प्रचार व प्रसार, मग उत्तेजना, मग वाढते नामस्मरण, मग अधिक उत्तेजना, मग अधिक अभ्यास आणि नामाचा अधिक उत्साहाने प्रसार, पण मधून मधून निराशा आणि उद्वेग, याशिवाय पुन्हा पुन्हा संशय, कधी कधी खिन्नता, मग अधिक नामस्मरण; अशा टप्प्या-टप्प्यानी; आपली प्रगती होते.
पुढे आपले सद्गुरू दिवसाचे १२-१३ तास नामस्मरण करण्यासाठी आपल्याला सक्षम आणि समर्थ बनवतात.
म्हणजेच; अर्थकारण, समाजकारण, राजकारण, धर्मकारण; ह्या सर्वांना सामावणारे आणि सर्वांना आधारभूत असे नामकारण करण्यासाठी (नामस्मरण आणि त्याचा प्रसार करण्यासाठी) आपले सद्गुरू आपल्याला सक्षम आणि समर्थ बनवतात! म्हणजेच शाश्वत समाधानासाठी लायक बनवतात!
आपल्याला जेव्हां हे कळते, तेव्हां आपले सद्गुरू आपल्याला भेटणे आणि नामस्मरणाचा व पर्यायाने नामकारणाचा लाभ होणे याची किंमत आपल्याला थोडीफार कळू लागते आणि नामकारण करता येणे हे आपल्या जन्मोजन्मीचे भाग्य आहे असे आपल्या लक्षात येते!
विशेष हणजे ज्याला आपण विश्रांती समजत होतो तो केवळ आळस होता व म्हणूनच ती खरी विश्रांती नव्हती व खरी विश्रांती नामस्मरणातच आहे हे ध्यानी येते व सद्गुरुंबद्दलची कृतज्ञता शतपटीने वाढते!
Rate It
गोंदवलेकर महाराज मला समजलेले १२. नाम घेणाऱ
Posted by on Sunday, 21st August 2016
१२. नाम घेणाऱ्याचे राम कल्याण करतो डॉ. श्रीनिवास कशाळीकर
श्री. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात, "वाटेल ते झाले तरी भगवंताचे नाम सोडू नका, नाम घेणाऱ्याचे राम कल्याण करतो हे माझे सांगणे शेवटपर्यंत विसरू नका."
वाटेल ते झाले तरी भगवंताचे नाम सोडू नका असे; सद्गुरू का म्हणतात?
कारण नामस्मरण चालू असले तरी, आपले शरीर, मन आणि परिस्थिती सतत आणि वेगाने बदलत असते. अश्या बदलत्या परिस्थितीत क्षणोक्षणी काय होते आहे आणि काय हवे आहे हे कळत नाही! एवढेच नव्हे तर आपल्याला काही कळत नाही हे देखील कळत नाही! बदल नको म्हणून, सतत होत असलेला बदल टाळता येत नाही आणि बदल हवा म्हणून हवा तो बदल घडवताच येतो असेही नाही! बरं हवा तो बदल घडला, तरी पुन्हा तो नकोसा होतो आणि पुन्हा आपण अस्वस्थ ते अस्वस्थच राहतो!
अश्या वेळी आपण संकुचित बनलेले असल्यामुळे संकुचित स्वार्थ गोंजारणाऱ्या, चुचकारणाऱ्या आणि पोसणाऱ्या बाबींना आपण घट्ट धरून बसलेले असतो! त्यामुळे या बाबी आपल्यापाशी तश्याच सुरक्षित राहतात! पण ज्यातून संकुचित स्वार्थ जपला जात नाही अश्या गोष्टींकडे मात्र आपले दुर्लक्ष होते आणि त्या आपल्या स्मरणातून जाऊ शकतात. संकुचित स्वार्थ न जपणारी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे भगवंताचे नामच! तेच प्रथम आपल्याकडून सुटण्याचा आणि आपण विस्मरणाच्या गर्तेत जाणाचा संभव असतो!
अश्या वेळी आपल्याला विस्मरणरुपी मृत्युच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी सद्गुरूंनी निव्वळ कृपाळूपणे नव्हे तर अगदी कळवळून पुढे केलेला मदतीचा हात म्हणजे सद्गुरूंचे हे सांगणे आहे!
“नाम घेणाऱ्याचे राम कल्याण करतो” म्हणजे काय?
आपले मन उथळ आणि संकुचित असल्यामुळे कल्याण याचा अर्थ केवळ बाह्य परिस्थिती सुधारणे असा वाटतो. पण बाह्य परिस्थिती ही प्रारब्धानुसार ठरत असते आणि खरे म्हणजे ती बाधत नाही. त्यामुळे केवळ बाह्य आणि दृश्य परिस्थितीवरून कल्याण – अकल्याण ठरत नाही! पण आपण हे सत्य लक्षात न घेता केवळ बाह्य व दृश्य परिस्थिती मनाप्रमाणे बदलली नाही की नामावरचा विश्वास गमावतो! हे टाळण्यासाठी कल्याण याचा अर्थ नीट समजायला आणि आंत भिनायला हवा!
कल्याण याचा अर्थ; अपूर्ण, संकुचित आणि भ्रामक अस्वस्थतेतून पूर्ण, उदात्त आणि शाश्वत स्वस्थतेकडे, समाधानाच्या स्थितीत जाणे आणि अश्या शाश्वत स्वस्थतेला व समाधानाला पूरक असे कार्य; जीवनाच्या ज्या क्षेत्रात (शिक्षण, आरोग्य, राजकारण, संरक्षण, समाजकारण, व्यापार, उद्योग, चित्रकला, संगीत, नाटक, सिनेमा इत्यादी) आपण वावरत असू त्या क्षेत्रात आपल्याकडून घडणे!
नाम घेणाऱ्याचे राम कल्याण करतो ते हे असे!
Rate It
गोंदवलेकर महाराज मला समजलेले ११. आनंद हा अत
Posted by on Sunday, 21st August 2016
११. आनंद हा अत्यंत विशाल आहे: डॉ. श्रीनिवास कशाळीकर
श्री. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात, “आनंद हा अत्यंत विशाल आहे. देहबुद्धी मेली म्हणजेच त्याची प्राप्ती होत असते”.
सद्गुरु म्हणजेच ईश्वर. तोच खरा आनंदमय असून अंतर्बाह्य सर्व काही व्यापून आहे. कालातीत आहे. पण आपण आपल्या देहात असताना आपल्यामध्ये देहाच्या मर्यादा येतात. देहाच्या गरजा, वासना, भावना, विचार, कल्पना, दृष्टीकोन यांचे गाठोडे आपल्या उरावर बसते. ह्या गाठोड्यालाच अहंकार म्हणतात. ह्या अहंकारामध्ये आपण बंदिस्त होतो आणि आपल्या विशाल आनंदमय स्वरूपापासून तुटतो आणि वेगळे होतो. ह्या वेगळेपणात अपूर्णता, अस्वस्थता, असुरक्षितता, धडपड, फरपट, दुबळेपणा, दु:ख आणि भीती आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे भ्रम आहे.
आपल्या भ्रमामुळे आपण हे विसरतो, की आपली वृत्ति सारखी बदलत आहे. आपली स्वप्ने, आपले संकल्प, आपले आराखडे हे सारे आपल्या इच्छे–अनिच्छे पलिकडे बदलत आहेत. त्याचप्रमाणे जगही आपल्या इच्छे-अनिच्छेपलिकडे; सारखे बदलत आहे. आपण विसरतो, की सतत बदलत असल्यामुळे, अमुक परिस्थितीमुळे सुख आणि अमुक परिस्थितीमुळे दु:ख होते हे आपले वाटणे अजिबात खरे नव्हे. कारण ते सुखदु:ख अस्थिर आणि म्हणून भ्रामक आहे! साहजिकच आपण हे देखील विसरातो, की स्वत:चे असो वा जगाचे; भ्रामक दु:ख घालवण्यासाठी आपण जे तळमळतो आणि धडपडतो तो केवळ जीवनप्रवासातला एक अपरिपक्वतेचा आणि आकुंचित अवस्थेचा टप्पा आहे!
सद्गुरुंच्या सत्तेने आणि आमच्या प्रारब्धानुसार आणि देहबुद्धीपायी आलेल्या अहंकाराने धडपडता धडपडता आणि तळमळता तळमळता; सद्गुरुकृपेनेच आम्हाला नामस्मरणाचा मार्ग मिळतो आणि सद्गुरुकृपेनेच नामस्मरण वाढत जाऊन देहबुद्धी आणि अहंकाराच्या भिंती ढासळू लागतात. अश्या तऱ्हेने सद्गुरूकृपेमुळे आमचा आकुंचितपणा आणि संकुचितपणा जसा जसा कमी होत जातो आणि विशालत्व येऊ लागते तशी तशी आम्हाला आमच्या स्वत:च्या सच्चिदानंदस्वरूपाची म्हणजेच विशाल आणि परिस्थितीनिरपेक्ष अशा नामानंदाची अधिकाधिक प्रचीती येत जाते!
Rate It
गोंदवलेकर महाराज मला समजलेले : १०. देवाची (खर
Posted by on Sunday, 21st August 2016
१०. देवाची (खरी) कृपा डॉ. श्रीनिवास कशाळीकर
श्री. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात “देवाची ज्याच्यावर कृपा आहे त्याला तो पोटापुरता पैसा देतो, पण ज्याची परीक्षा पाहायची त्याला भगवंत जास्त पैसा देतो”.
आपल्यातल्या बहुतेकांना तर याच्या उलट वाटत असते! आपला समज असा असतो की जेवढा पैसा जास्त मिळेल, तेवढे आपण जास्त सुख मिळवू शकतो! त्यामुळे गडगंज पैसा मिळणे हेच भाग्याचे लक्षण आणि हीच देवाची कृपा असेच आम्हाला वाटत असते! अगदी मनापासून विचार केला तरी, पोटापुरत्या पैशाने सुख मिळू शकत नाही आणि म्हणून गरीबी हा शापच आहे असेच आम्हाला वाटत असते!
मग खरं काय? सद्गुरू की आपण?
उत्तर सोपं आहे!
पण सद्गुरूंच्या अनंत, परिपक्व आणि नि:पक्षपाती सर्वज्ञतेचा अभिप्राय असा की “जास्त पैसा” मिळाला की आपण भरकटू शकतो! आपल्या आकांक्षा वाढतात, वासना भडकतात, इर्षा उसळते, काळजी पोखरते, असंतोष खदखदू लागतो! ह्या सर्व बाबी सुख द्यायचे सोडाच, समाधानाच्या आडच येतात! जास्त पैशामुळे अश्या तऱ्हेने आपली अस्वस्थता वाढते. असमाधान वाढते. ह्या सर्व बाबी नियंत्रणात ठेवणे ही अत्यंत कठीण आणि कसोटीचीच बाब असते! भल्याभल्याना जास्त पैशामुळे स्वत:वर नियंत्रण ठेवणे अशक्य होते! अनेक छंद, व्यसने आणि हितशत्रू यामुळे संकटे वाढतात!
जास्त पैशामुळे आपण सहज मार्गभ्रष्ट होऊ शकतो आणि रसातळाला जाऊ शकतो!
उलट पोटापुरता पैसा मिळाला तर आपल्या वासना आणि हाव ह्यांच्यावर आणि स्वैराचारावर आपसूक बंधने येतात! सुरुवातीला ही बंधने त्रासदायक वाटली तरी, नामस्मरणाची जगोडी वाढण्यासाठी ह्या बंधनांचा आपल्याला फायदाच होतो!
म्हणूनच सद्गुरू म्हणतात तेच खरे आहे! पोटापुरता पैसा मिळणाऱ्या आपल्यातल्या बहुसंख्यांवर देवाची कृपा आहे!
Rate It
गोंदवलेकर महाराज मला समजलेले ९. तर जीवनाचे
Posted by on Sunday, 21st August 2016
९. तर जीवनाचे सोने होते डॉ. श्रीनिवास कशाळीकर
श्री. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात, "जगात कुठलीही गोष्ट अती केली की माती होते पण नामस्मरण ही ऐकमेव गोष्ट आहे की ती अती केले की माती नाही तर जीवनाचे सोने होते. नामामुळे परमेश्वराला तुमच्या बरोबर रहावे लागते"
मला कळलेला याचा अर्थ असा की नाम म्हणजेच ब्रह्म आणि नाम म्हणजेच भगवंत आहे. नाम आपल्या अस्तित्वाचा गाभाच आहे. त्यामुळे, नामस्मरणाने आपण आपल्या आत, आपल्या अस्तित्वाच्या गाभ्याकडे, जिथे परमेश्वराची म्हणजेच सद्गुरूंची वस्ती असते तिथे जातो! त्यामुळे नामस्मरण अती झाले तर त्यामुळे काहीही बिघडण्याचा (माती होण्याचा) प्रश्नच येत नाही! अती नामस्मरणाने फार तर आपण परमेश्वराच्या म्हणजेच सद्गुरुंच्या म्हणजेच स्वत:च्या सच्चिदानंदस्वरूपाच्या (कालातीत, अजरामर चैतन्याच्या आणि शाश्वत समाधानाच्या) अधिक निकट पोचू! तद्रूप होऊ; नाही का? पण ही तर सर्वश्रेष्ठ उपलब्धी आहे! नामस्मरण हे अमृत आहे असे जे म्हणतात ते ह्याच कारणासाठी! अमृत म्हणजे मृत्युच्या पलिकडे नेणारे, अमर करणारे. हा अनुभव आपल्याच अस्तित्वाच्या गाभ्याचा असतो, म्हणून, ह्याला कोणी आत्मानुभूती, कोणी आत्मसाक्षात्कार. तर कोणी आत्मज्ञान म्हणतात. मर्त्य जीवनाच्या कोंडवाड्यातून वा तुरुंगातून सुटका होऊन अमर अस्तित्वाचे स्वातंत्र्य मिळते म्हणून कोणी ह्यालाच खरे स्वातंत्र्य, कोणी मोक्ष, तर कोणी मुक्ती म्हणतात. सगुण भक्ती करणारे भक्त ह्याच अनुभवाला भगवंताचे दर्शन म्हणत असल्यामुळे, ह्याच अलौकिक अनुभवाचे वर्णन; सद्गुरू, "परमेश्वराला तुमच्या जवळ राहावे लागते" असे करतात.
त्याचप्रमाणे, ह्या एका परीने अत्यंत आतल्या आणि अत्यंत खाजगी अश्या अनुभवातच आपले, आपल्या कुटुंबाचे आणि संपूर्ण विश्वाचेही शाश्वत कल्याण असते. कारण नाम घेणारी व्यक्ती, तिची इच्छा असो वा नसो, कधीही स्वत:चे संकुचित कल्याण साधू शकत नाही. म्हणून, असे सार्वत्रिक कल्याण नामस्मरणात असल्याने, ह्यालाच "जीवनाचे सोने होते" असे सद्गुरू म्हणतात! वाचन लेखनाने; नामस्मरण करण्याचा आपला निर्धार बळकट होऊ शकतो, पण केवळ तेवढा पुरत नाही! सद्गुरुंच्या सांगण्याचा प्रत्यक्ष अनुभव सतत नामस्मरण केल्यानेच येऊ शकतो!
Rate It