गोंदवलेकर महाराज मला समजलेले: ३. आंधळ्याने &
Posted by on Sunday, 21st August 2016
३. आंधळ्याने पाणी भरावे तसे नाम घ्यावे :डॉ. श्रीनिवास कशाळीकर
श्री. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात, "आंधळ्याने पाणी भरावे तसे नाम घ्यावे. भांडे भरले किती आणि रिकामे किती, हे त्याला समजत नाही. तो भरतच राहतो. तसे नाम सतत घेत राहावे. देहाच्या कणाकणातून नामाचा ध्वनी केव्हाही यावा इतके नाम घ्यावे. सुरुवातीला रामनाम असे मुरले की पुन्हा जास्त लक्ष द्यावे लागत नाही. आपोआप देहाचे सारे कण नामजप करतात."
हे अगदी साधे व सहज सांगणे किती पराकोटीचे सत्य आहे याची सहजासहजी कल्पना येत नाही!
स्वत:ला आंधळे समजणे फारच नकोसे वाटते! अहंकार आड येतो! शिवाय, रोजच्या व्यवहारातल्या अनुभवाप्रमाणे अमुक किंमत दिली की अमुक वस्तू मिळते तशी अमुक एवढे नाम घेतले की अमुक परिणाम दिसला पाहिजे असे आतून वाटत असते. आपले नाही तर नाही, किमान, समाजात तरी फरक पडावा आणि पडेल असेल असे वाटत असते! पण ते जेव्हां घडत नाही, तेव्हां विश्वास डळमळू लागतो!
पण म्हणूनच आमच्या कल्याणासाठी सद्गुरुनी हे सांगितले आहे!
खोलात जाऊन नीट विचार केला तर हळूहळू लक्षात येते की; आमच्या सद्गुरुंचाच अनुग्रह आम्हाला का आणि कसा मिळाला, विशिष्ट देशातच आणि विशिष्ट आई-वडिलांच्या पोटीच आमचा जन्म का आणि कसा झाला, काही विशिष्ट व्यक्तीच आमच्या कुटुंबीय का आणि कश्या झाल्या; अश्या अनेक बाबींची कारणे दिसत नाहीत! भिंतीच्या पलिकडे काय चाललेय हे “दिसत” नाही! समोरच्या व्यक्तीच्या मनातले “दिसत” नाही! एवढे कशाला, आमच्या स्वत:च्या शरीराच्या आणि मनाच्या कोनाकोपऱ्यात केव्हां केव्हां, काय काय घडले आता काय चाललेय आणि पुढच्या क्षणी काय होणार हे देखील आम्हाला “दिसत” नाही! शिवाय हे का घडले, कसे घडले किंवा का होणार आणि कसे होणार ह्यातले काहीही दिसत नाही!
मग आम्ही “आंधळे”च नव्हे काय?
आता आमच्याकडून घडणाऱ्या नामस्मरणाचा विचार करू! आपल्या नामस्मरणामध्ये; क्षणोक्षणी इतर विचार, इच्छा, आशा, निराशा, मत्सर, द्वेष, राग, लोभ, चिंता, तिरस्कार, काळजी, खिन्नता इत्यादी कोणत्या भावना, किती तीव्रपणे उत्पन्न होतात, कोणत्या वासना उत्पन्न होतात आणि कोणत्या थरातून उद्भवतात, हे सारे; आम्हाला दिसते का? नाही! आमची जपसंख्या मोजताना आणि नोंदताना आम्ही हे सारे हिशेबात घेऊ शकतो का? नाही!
मग आम्ही “आंधळे”च नव्हे काय?
साहजिकच, आमचे नामस्मरण किती झाले आणि आमचे मन किती शुद्ध झाले हे आम्हाला कळू शकते का? नाही! मग, “आमचे नामस्मरण एवढे झाले तरीआम्हाला अजून अनुभव कसा नाही?” असे म्हणणे योग्य होईल का? अर्थातच नाही ना?
म्हणूनच आम्ही सद्गुरूंची वरील शिकवण अत्यंत नम्रपणे आणि सर्वस्व झोकून देऊन आचरणात आणण्याचा जीवापाड प्रयत्न नको का करायला?
Rate It
गोंदवलेकर महाराज मला समजलेले: २. आपल्याला ह&
Posted by on Sunday, 21st August 2016
२. आपल्याला हव्या त्या गोष्टी डॉ. श्रीनिवास कशाळीकर
श्री. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात, “आपल्याला हव्या त्या गोष्टी देण्यामध्ये भगवंताची खरी कृपा नसून, असेल त्या परिस्थितीमध्ये आपले समाधान टिकणे ही त्याची खरी कृपा होय.”
सुरुवातीला हे आपल्याला पटत नाही!
कारण?
कारण, आहे ती परिस्थिती स्वीकारणे त्यात समाधान मानणे म्हणजे पराभव स्वीकारणे असेच आपल्याला वाटत असते! साहजिकच, हे आपल्याला क्लेशकारक आणि असह्य होते. जगामध्ये व आपल्या जीवनात काय व कसे असावे (उदा. राज्यव्यवस्था, समाजव्यवस्था, अर्थव्यवस्था इत्यादी आणि आपला व्यवसाय, घरदार, कटुंब, आर्थिक स्थिती इत्यादी) याबाबतच्या, अर्थात हवे-नको पणाच्या कल्पना, वासना आणि ओढ यामुळे आपण कायम अस्वस्थ असतो. असंतुष्ट असतो. किंबहुना तसे राहाणे आपल्याला संवेदनाशील आणि योग्य वाटते!
पण जगामध्ये असो, वां वैयक्तिक जीवनात अनेकदा, आपल्याला हव्या त्या गोष्टी घडल्याने वा मिळाल्याने; कालांतराने मनाला जेव्हां टोचणी लागल्याचा अनुभव येतो आणि अनेकदा, आपल्याला हव्याश्या वाटणाऱ्या अनेक बाबी न घडल्याने वा न मिळाल्याने पुढे जेव्हा “हायसे” वाटल्याचा अर्थात समाधान झाल्याचा अनुभव येतो, तेव्हा नाईलाजाने आणि मोठ्या मुश्किलीने आपला अहंकार विरघळू लागतो आणि “आपल्याला हव्या त्या गोष्टी देण्यामध्ये भगवंताची खरी कृपा नाही” हे पटू लागते आणि मनात ठसु लागते!
जगामध्ये असो, वा वैयक्तिक जीवनात: “आपल्याला हव्या” वाटणाऱ्या गोष्टी; वास्तविक पाहता, आपण आपल्या अहंकारापोटी जोपासलेल्या असतात, आपल्या अंतरंगाला हव्या की नको याचा विचार देखील न करता! म्हणूनच त्यांच्यासाठी स्वत:ला वा इतरांना कळत-नकळत पीडा देणे, किंवा त्या न मिळाल्याने मन मारून हताश होणे, ह्यामुळे वैयक्तिक आणि सामाजिक तणावाचे दुष्टचक्र प्रभावशाली बनत जाते!
प्रत्येक प्रसंगी मनात असो वा नसो, नामस्मरण आचरणात येत जाते तसे तसे, ईश्वरी सत्तेचे म्हणजेच सद्गुरुंच्या सत्तेचे नि:पक्षपाती, अचूक, अखंड, अविरत आणि आपल्या अंतरंगाला समाधान देणारे नियंत्रक कार्य ध्यानात येऊ लागते! घडणारे सर्व काही ईश्वरेच्छेने म्हणजेच आपल्या सद्गुरुंच्या इच्छेने; आणि आपल्या कल्याणासाठीच होत आहे ही आश्वासक जाणीव जेव्हां आपल्याला हव्याश्या वा नकोश्या प्रत्येक प्रसंगात मायेची सावली आणि धीराचा हात देत राहते, तेव्हां सुख दु:खाचे तडाखे मुलायम बनत जातात! साहजिकच मग; असेल त्या परिस्थितीमध्ये आपले समाधान टिकणे ही भगवंताची खरी कृपा होय हे पटते आणि अनुभवाला येते!
Rate It
गोंदवलेकर महाराज मला समजलेले: १. आपण कसे वाग
Posted by on Sunday, 21st August 2016
१. आपण कसे वागावे डॉ. श्रीनिवास कशाळीकर
श्री. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात, “संत सांगतात तसे आपण वागावे. ते वागतात तसे नये वागू!”
संत किंवा आपले सद्गुरू जसे वागताना दिसतात, त्याच्या कितीतरी वेगळे आणि विलक्षण आणि आपल्या कल्पनेच्या अतीत असे त्यांचे अंतरंग असतात आणि ते असल्याशिवाय तसे वागणे म्हणजे वाघाचे कातडे पांघरून वाघाप्रमाणे मिरवणे! अर्थात त्यामुळे फजितीच फजिती होऊ शकते!
आपण कसे असावे आणि कसे वागावे ह्याबद्दल अनेक मते आहेत. आपल्यालाही; पुस्तके, नियतकालिके वा वृत्तपत्रे वाचून; चित्रपट, नाटके पाहून; कीर्तने, निरुपणे आणि कथा ऐकून आणि आजूबाजूला पाहून अनेकदा अनेक विचार आणि उर्मि येतात.
पण कसेही होण्याचा किंवा कसेही वागण्याचा प्रयत्न केला किंवा आपण कसेही झालो आणि कसेही वागलो तरी ते वेषांतर केल्याप्रमाणे केवळ बाह्यस्वरूप बदलणे असल्यामुळे आपले समाधान होत नाही!
फक्त आपल्या सद्गुरुना म्हणजेच आपल्या अंतरात्म्याला जे आवडते, तसे होण्याचे वा वागण्याचे प्रयत्नच आपल्याला समाधानाच्या मार्गावर नेतात! त्यामुळे तेच श्रेयस्कर आहेत! म्हणूनच संत म्हणजेच आपले सद्गुरू सांगतात तसे वागावे. ते वागतात तसे नये वागू हे अक्षरश: खरे आहे!
पण असे प्रयत्न करायचे म्हणजे काय?
सर्व मते आणि मतांतरे बाजूला ठेवून; त्यांनी सांगितल्याप्रमाणे नामस्मरण सुरु करणे, करीत राहणे, ते वाढवण्याचा प्रयत्न करणे; आणि दरम्यान; आपल्याला कळलेली आणि अनुभवाला आलेली नामस्मरणाची महती इतराना सांगण्याचा प्रयत्न करणे; हेच ते प्रयत्न! ह्या प्रयत्नांनीच आपले अधिकाधिक समाधान होत जाते आणि त्या अनुरोधाने आपले बाह्य स्वरूप आकाराला येते आणि आपली व्यवहारातील वागणूक देखील आपोआपच योग्य प्रकारे विकसित होते!
Rate It
गोंदवलेकर महाराज मला समजलेले : मनोगत डॉ. श्र
Posted by on Sunday, 21st August 2016
मनोगत: डॉ. श्रीनिवास कशाळीकर
नामाचा महिमा अगाध आणि शब्दातीत आहे. नामस्मरण करावे तेवढे थोडेच आहे. पण हे कळत असून सुद्धा पुरेसे वळत नाही. नामावरची निष्ठा आणि नामामधील प्रेम म्हणावे तसे वाढलेले नसल्यामुळे नामात रमून जाणे होत नाही आणि नामस्मरण अखंड चालत नाही. त्यात खंड पडतो!
पण ह्या दरम्यान पुष्कळदा कळत नकळत; नामाविषयी विचार मात्र चालू असतात. आजवर न जाणवलेले नामस्मरणाचे विविध कल्याणकारी पैलू नव्याने जाणवत जात असतात. अर्धवट जाणवलेले पैलू अधिक स्पष्ट होत जात असतात.
इतर सर्व बाबींप्रमाणे ह्यामागे देखील नामरूप असलेल्या सद्गुरू ब्रह्मचैतन्य श्री. गोंदवलेकर महाराजांचीच प्रेरणा आहे. खरे सांगायचे तर; नामरूप असलेल्या त्यानी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आणि अनेकानेक प्रकारे नामाचा शब्दातीत महिमा प्रगट करणे साहजिकच असल्यामुळे त्यांनी तसा तो प्रगट केला आहे आणि अजूनही करत आहेत!
पण आमच्यातल्या प्रारब्धवश त्रुटीमुळे आम्हाला जे प्रश्न पडतात आणि ज्या शंका येतात, त्यांची आम्हाला पटतील अशी उत्तरे जेव्हां मिळतात, तेव्हां नवीन शोध लागल्यासारखे वाटते! ही उत्तरे देखील त्यांच्या बोधवचनांमध्ये त्यांनी अत्यंत सोप्या आणि साध्या भाषेत पूर्वीच देऊन ठेवली आहेत! पण ती; त्यांच्या भाषेच्या सोपेपणामध्ये आणि साधेपणामध्ये लपल्यामुळे आणि कालानुरूप परिस्थिती बदलल्यामुळे ज्या नवनवीन समस्या तयार झाल्या त्यामुळे आम्हाला मिळत नव्हती वा कळत नव्हती!
नामाच्या महिम्याचा हा अंश जाणवण्याने मन हर्षभरित होते, मनामध्ये हुरूप येतो, मनाला विस्मय वाटतो आणि तो लिहून झाल्याशिवाय चैन पडत नाही! त्यामुळे, हे सारे पूर्वी कुणी लिहिलेले आहे की नाही, ह्या लिहिण्याने इतर कुणाला लाभ होईल की नाही; ह्यापेक्षा, नामाचा हा महिमा स्वत:का अधिक स्पष्ट होईल ह्या भावनेने, स्वत:च्या तो मनात घोळवता येईल ह्या तीव्र ओढीने आणि त्याचप्रमाणे तो मनामध्ये मावत नसल्याने नामाविषयीच्या लिखाणाला सुरुवात झाली! नामस्मरणात पुरेसे रंगून जाण्यापूर्वीच नामाचा हा अंशमात्र मला जाणवणे आणि तो लिहिला जाणे ही देखील सद्गुरुंचीच इच्छा आहे यात शंका नाही! किंबहुना, नामाची निष्ठा आणि नामाचे प्रेम येण्यासाठी आवश्यक असल्यामुळेच की काय सद्गुरुनी वर्षानुवर्षे करून घेतलेला हा गृहपाठ असावा! त्यातले असली अर्थातच त्यांचे आणि नकली ते माझे यात मुळीच शंका नाही!
म्हणूनच, जीवनातील इतर सर्व बऱ्यावाईट आणि योग्य-अयोग्य बाबींप्रमाणे हे आणि आत्तापर्यंत झालेले नामाविषयीचे अल्पसे लिखाण जसे आहे तसे; त्याबद्दल कोणताही दावा न करता मनापासून विनम्रपणे आणि कृतज्ञतापूर्वक सद्गुगुरुंच्या चरणी सादर समर्पण!
Rate It
भक्ती आणि नामस्मरण: डॉ. श्रीनिवास कशाळीकर
Posted by on Wednesday, 10th August 2016
भक्ती आणि नामस्मरण: डॉ. श्रीनिवास कशाळीकर
भक्ती म्हणजे अस्सल आणि सर्वोत्तम आरोग्य! जीवाच्या पूर्णतेची, उत्कट, निस्वार्थी विश्वकल्याणकारी आणि अजरामर अवस्था म्हणजे भक्ती. वैयाक्तिक, मर्यादित आणि संकुचित भ्रम गळून जाण्याची अवस्था म्हणजे भक्ती. भेदभाव, पक्षपातीपणा, पूर्वग्रह, द्वेष, सूडबुद्धी, भीती, काळजी, हाव, अपेक्षा विरघळून जाण्याची अवस्था म्हणजे भक्ती. प्रतिक्षणी सद्भावना संप्रेरित करणारी जीवाची अवस्था म्हणजे भक्ती. भक्ताची निव्वळ उपस्थिती देखील आपल्याला सच्चिदानंदाकडे खेचून घेते.
म्हणूनच परमात्मस्वरूप सद्गुरुंच्या परम कृपेने आपण सर्वजण उथळ आणि संकुचित अस्तित्वातून प्रगत होत, भक्तिमार्गाला लागतो! सद्गुरुकृपेनेच जीवनात घडलेली आणि घडत जाणारी प्रत्येक बाब शरणागतीमध्ये आणि भक्तीमध्ये परिणत होऊ लागते. अश्या तऱ्हेने हळूहळू नामात रंगण्याचा म्हणजेच भक्तीचा अल्पसा देखील अनुभव येणे ही सद्गुरूंची परम कृपाच होय!
म्हणूनच “तुम्ही नुसते नाम घ्या; बाकीचे सर्व मी करतो” हे सद्गुरू ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराजांचे वाक्य सतत आठवत राहून, जमेल तेवढे आणि जमेल तसे नामस्मरण चिकाटीने करीत राहणे आणि आपल्याला समजलेले व्यक्त करत जाणे ह्यालाच आपण आपल्या जीवनात सर्वोच्च प्राधान्य द्यायला हवे!
श्रीराम समर्थ!
Rate It