अनुभव नामस्मरणाचे: डॉ. श्रीनिवास कशाळीकर
Posted by on Wednesday, 10th August 2016
अनुभव नामस्मरणाचे: डॉ. श्रीनिवास कशाळीकर
विद्यार्थी: सर, नामस्मरणाचे अनुभव सांगा ना!
शिक्षक: प्राणवायू, अन्न, पाणी इत्यादींमुळे आपले शरीर आणि मन पूर्वार्धाच्या पातळीपर्यंत विकसित होतात. नामस्मरणाने ह्या विकासाची पुढची म्हणजेच उत्तरार्धाची पायरी साध्य होते.
विद्यार्थी: पण सर, तरी देखील काही ना काही अनुभव असतीलच ना?
शिक्षक: होय! असतात! नामस्मरणाने सम्यक विकास होत असताना मूलत: वासना, भावना, विचार आणि दृष्टीकोन प्रगल्भ होत जातात. परिणामी ज्याच्या त्याच्या प्रकृतीधर्मानुसार ही प्रगल्भता व सृजनशीलता; विचार, योजकता, साहित्य, कला, संगीत, नेतृत्व, संशोधन, व्यवस्थापन; अश्या विचिध क्षेत्रांत आविष्कृत होते.
विद्यार्थी: पण अध्यात्मिक अनुभवांचे काय?
शिक्षक: कधी मृत्युच्या जबड्यातून सुटका होणे, कधी अनपेक्षित यश मिळणे, कधी कल्पनातीत लाभ होणे, कधी बिकट समस्यांची उकल होणे, कधी उत्कट काव्य स्फुरणे, कधी असामान्य कार्य हातून घडणे; इत्यादी अनेक प्रकारे नामस्मरणाचे अनुभव येतात! संवेदनाशीलता, हळुवारपणा, सहिष्णुता, क्षमाशीलता, नि:पक्षपातीपणा, आत्मपरीक्षण इत्यादी अनेक अंगानी साधकाची वाढ होते. ही वाढ अर्थातच रोजच्या व्यवहारात साधक आणि त्याच्या आजूबाजूचे लोक अनुभवतात..
विद्यार्थी: ह्या साऱ्या अनुभवांमध्ये एकादी समान बाब असते का?
शिक्षक: होय! प्रत्येक अनुभवागणिक साधक; भ्रमाच्या पलिकडे आणि सत्याच्या जवळ जातो!
विद्यार्थी: आपले सद्गुरू श्री. ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर काय सांगतात?
शिक्षक: त्यांच्या म्हणण्याचा आशय असा आहे की, अनुभवांच्या मागे लागू नये!
हे मला अगदी मनापासून पटतं! कारण, वरील प्रकारचे किंवा अन्य अनुभव निश्चितपणे, अमुक एका व्यक्तीमध्ये व अमुक एका वेळेला येतीलच असे सांगता येत नाही! मात्र, आमच्या सारख्या सामान्यांकडून नामस्मरण होणे व वाढत राहाणे हीच आपल्या सद्गुरूंची सर्वश्रेष्ठ कृपा आणि हाच नामस्मरणाचा सर्वश्रेष्ठ अध्यात्मिक अनुभव असं मला वाटतं!
Rate It
नामात रंगणे: डॉ. श्रीनिवास कशाळीकर
Posted by on Tuesday, 9th August 2016
नामात रंगणे: डॉ. श्रीनिवास कशाळीकर
नामस्मरण करता करता समजू लागते की नामस्मरण हे सोपे साधन आहे; पण “नामात रंगणे” व “समाधानी होणे” हे शब्द सोपे असले तरी प्रत्यक्षात तसे होणे ते वाटते तितके सोपे नाही!
नामात रंगणे आणि समाधानी होणे म्हणजे वास्तविक पाहता; आत्मसाक्षात्कार होणे, कालातीत व अजरामर अश्या पूर्णत्वाला जाणे, परमेश्वराच्या वा सद्गुरुंच्या म्हणजेच आपल्या अंतरात्म्याच्या इच्छेशी आणि सत्तेशी समरस होणे; म्हणजेच मुक्त होणे होय!
एकवेळ कावीळ झालेल्याला स्वच्छ दिसणे सोपे, पण नामात रंगणे व समाधानी होणे हे आमच्यासारख्या देहबुद्धीने जखडलेल्यांना अशक्यप्राय आहे! पण तरीही गुरुकृपेने हे शक्य होते ह्याबद्दल मात्र मुळीच शंका वाटत नाही!
Rate It
जगाची सर्वश्रेष्ठ सेवा: डॉ. श्रीनिवास कशाळ
Posted by on Tuesday, 9th August 2016
जगाची सर्वश्रेष्ठ सेवा: डॉ. श्रीनिवास कशाळीकर
“तुमचा स्वत:चा आत्मसाक्षात्कार हीच तुमच्याकडून होऊ शकणारी जगाची सर्वश्रेष्ठ सेवा होय” असे श्री. रमण महर्षि म्हणाल्याचे वाचनात आले. नक्की खरे की खोटे माहीत नाही.
पण जर हे खरे असेल, तर ते मनाला पटते. शंका वाटत नाही. कारण आत्मसाक्षात्कार हीच जीवनाची सर्वश्रेष्ठ उपलब्धी आहे असे अगदी मनापासून वाटते.
पण आत्मसाक्षात्कार हा आम्हाला फक्त ऐकून किंवा वाचून माहीत आहे. फार तर तहानलेल्याने जशी तहानेवरून पाण्याची कल्पना करावी तशी आम्ही त्याची कल्पना करू शकतो!
मग आम्ही काय करावे? जगाची सेवा कशी करावी?
आमचे सद्गुरू श्री. ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांनी त्याचे उत्तर पूर्वीच दिले आहे. ते म्हणतात, "गुरुकडून घेतलेले नाम, पावन करील जगास, हा ठेवावा विश्वास, राम कृपा करील खास."
आम्ही नामस्मरण (आत्मसाक्षात्काराचे सर्वांना शक्य आणि सुलभ असे साधन) अंगिकारावे आणि स्वत:ला कळत जाणारे नामाचे विश्वकल्याणकारी महत्व इतरांना सांगत जावे.
श्रीराम समर्थ!
Rate It
नम्रता आणि लाचारी: डॉ. श्रीनिवास कशाळीकर
Posted by on Sunday, 7th August 2016
नम्रता आणि लाचारी: डॉ. श्रीनिवास कशाळीकर
विद्यार्थी: सर, लोकांनी अपमान व छळ केला, शिव्या दिल्या किंवा अगदी मारझोड जरी केली तरी संत शांत राहिल्याची उदाहरणे आहेत. पण त्याचप्रमाणे भित्रे व लाचार लोक देखील अश्या प्रसंगी गप्प बसतात हे देखील खरे नाही का? मग, लीनता व नम्रपणा आणि भित्रेपणा व लाचारी यामध्ये काय फरक आहे?
शिक्षक: बाह्यत: दोन्ही सारखेच वाटतात हे खरे आहे. पण, अपमान आणि मृत्युला न घाबरता शांत असणे म्हणजे लीनता व नम्रपणा. याउलट, नुकसान, दुखापत, संकट किंवा मृत्यू यांचा धसका घेऊन अपमान व छळ गिळून गप्प बसणे म्हणजे भित्रेपणा व लाचारी.
विद्यार्थी: पण पुष्कळदा, अन्यायाच्या विरोधात काही न करता शांत राहणे असह्य होते! आपण भित्रे, लाचार आणि नामर्द बनल्याची भावना मनात येते. याला काय करावे?
शिक्षक: हे खरे आहे. आपण ना धड निर्भय असतो, ना आपण पूर्णपणे भित्रे व लाचार. खऱ्या निर्भय लोकांचा अहंकार ईश्वर चरणी लीन झालेला असतो. भित्र्या लोकांचा अहंकार, भीती आणि गरजा यामुळे खच्ची झालेला असतो. आपला अहंकार ना ईश्वरचरणी लीन झालेला असतो, ना भीती आणि गरजांपोटी पूर्णपणे खच्ची झालेला असतो. त्यामुळे आपली गुदमर होते, घुसमट होते, ओढाताण होते.
नामस्मरण करता करता कोणत्याही परिस्थितीच्या अंतरंगाशी किंवा मुळाशी जाण्याची व परिस्थितीचे यथार्थ स्वरूप कळण्याची व त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत शांतता न भंगता योग्य निर्णय घेण्याची व कृती करण्याची क्षमता आपल्यामध्ये येते. अश्या निर्णयक्षमतेला आणि कृतीशीलतेलाच आपण लीनता व नम्रपणा म्हणतो.
अन्यायाच्या विरोधात भीतीच्या आहारी जाऊन शांत राहणे म्हणजे भित्रेपणा व लाचारी तर, भितीचेच दुसरे रूप असलेल्या रागाच्या आधीन होऊन अविचाराने स्वत:चा वा दुसऱ्याचा घात करणे हा अविवेक होय. लाचारी व अविवेक ह्या दोन्हीमुळे आपल्याला पश्चात्ताप करावा लागतो, तर लीनता व नम्रपणामुळे समाधान आणि कृतार्थता वाढतच जाते!
Rate It
नामस्मरणाची रीत: डॉ. श्रीनिवास कशाळीकर
Posted by on Sunday, 7th August 2016
नामस्मरणाची रीत: डॉ. श्रीनिवास कशाळीकर
विद्यार्थी: सर, एका जागी बसून नामस्मरण करणे अधिक श्रेयस्कर आहे का? असे नामस्मरण कसे वाढवता येईल?
शिक्षक: हा प्रश्न फारच छान आहे! माझ्या समजुतीप्रमाणे सद्गुरू ब्रह्मचैतन्य श्री. गोंदवलेकर महाराज आपल्याकडून आपल्या प्रकृतिधर्माला योग्य अश्या पद्धतीने, आणि प्रमाणात त्यांच्या इच्छेप्रमाणे नामस्मरण आणि त्याचा प्रसार करून घेतात. त्याचप्रमाणे नामात गोडी वाढवितात आणि तज्जन्य सद्बुद्धीद्वारे सुयोग्य कर्म (स्वधर्म) देखील करून घेतात.
त्यांच्या कृपेने आपल्या नामस्मरणात आणि स्वधर्मात निश्चित आणि सुयोग्य अशी प्रगती होत जाईल. आपण जमेल तेवढे आणि जमेल तसे नामस्मरण करत राहायचे!
विद्यार्थी: धन्यवाद सर! मला उत्तर मिळाले!
Rate It